पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दुपारी 4 वाजता जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट उपक्रमाच्या अंतिम सत्राला संबोधित करणार आहेत.
जी 20 जन भागीदारी आंदोलनात देशभरातील विविध शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास संस्थांमधील 5 कोटींहून अधिक तरुणांनी विक्रमी सहभाग नोंदवला होता. भारतातील तरुणांमध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत धारणा निर्माण करण्यासाठी तसेच विविध जी 20 आयोजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतभरातील विविध विद्यापीठांमधील 1 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिन दिनानिमित्त सुरुवातीला 75 विद्यापीठांसाठी हा कार्यक्रम नियोजित केला गेला होता, मात्र हा उपक्रम विस्तारत जाऊन त्यात भारतातील 101 विद्यापीठे सामिल झाली होती.
जी -20 युनिव्हर्सिटी कनेक्ट उपक्रमांतर्गत देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात उच्च शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच . जो उपक्रम सुरुवातीला केवळ विद्यापीठांसाठी सुरू करण्यात आला होता, त्याची पुढे झपाट्याने वाढ होऊन त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयेही समाविष्ट झाली आणि अधिक व्यापकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले कार्यक्रमात सुमारे 3000 विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि सहभागी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित राहतील. याशिवाय देशभरातील विद्यार्थीही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहणार आहेत.