पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मार्च रोजी नवी दिल्लीतल्या आयएआरआय पुसा मधल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेत वार्षिक ‘कृषी उन्नती मेळ्याला’ संबोधित करतील. यावेळी ते शेतकऱ्यांना संबोधित करतील, तसेच 25 कृषी विज्ञान केंद्रांचा शिलान्यासही करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कृषी कर्मन’ तसेच ‘दिन दयाळ उपाध्याय कृषी विज्ञान प्रोत्साहन’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येईल.
‘वर्ष 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे’ ही या मेळ्याची संकल्पना आहे. कृषी तसेच संबंधित क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान विकासाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हे कृषी उन्नती मेळ्याचे लक्ष्य आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सूक्ष्म-सिंचनाबाबत थेट प्रात्यक्षिकं, सांडपाण्याचा वापर, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय या संकल्पनांवर आधारीत दालने या मेळ्याचे मुख्य आकर्षण असतील. तसेच बी-बियाणे, खते, किटकनाशकं आदींची दालनही असतील.