'भारतीय विद्यापीठ संघटनेच्या (AIU)' 95 व्या वार्षिक संमेलनाला तसेच कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेला 14 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, संबोधित करणार आहेत. किशोर मखवाना यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत. अहमदाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
AIU बैठक आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेविषयी-
देशातील उच्चशिक्षणविषयक एक प्रमुख शीर्ष संस्था म्हणजेच भारतीय विद्यापीठ संघटना (AIU), 14-15 एप्रिल 2021 रोजी 95 वी वार्षिक बैठक घेत आहे. गेल्या वर्षी संघटनेने संपादन केलेले यश, संघटनेचे आर्थिक अंदाजपत्रक आणि आगामी वर्षासाठीचे नियोजन याबद्दलची माहिती प्रसारित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम AIU साठी महत्त्वाचा आहे. प्रांतिक कुलगुरू बैठकांच्या शिफारशी आणि वर्षभरात झालेल्या अन्य चर्चा याबद्दल सदस्यांना माहिती देण्यासाठीही या मंचाचा उपयोग होणार आहे.
या बैठकीत AIU चा 96 वा स्थापनादिन साजरा होईल. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या छत्रछायेत 1925 साली या संघटनेची स्थापना झाली होती.
‘भारतातील उच्च शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची अंमलबजावणी’ या मध्यवर्ती विषयावर आधारित अशी कुलगुरूंची राष्ट्रीय परिषदही या बैठकीदरम्यान आयोजित केली जाणार आहे. नुकत्याच सुरु झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त रणनीती आखण्याचा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे. धोरणातील प्राथमिक महत्त्वपूर्ण घटक- म्हणजेच विद्यार्थी- त्यांच्या हिताला प्राधान्य देणारी रणनीती आखण्यासाठी यात विचारविनिमय होणार आहे.
प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांविषयी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी श्री.किशोर मखवाना यांनी लिहिलेल्या पुढील चार पुस्तकांचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे:-
डॉ.आंबेडकर जीवन दर्शन,
डॉ.आंबेडकर व्यक्ती दर्शन,
डॉ.आंबेडकर राष्ट्र दर्शन, आणि
डॉ.आंबेडकर आयाम दर्शन