पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला (ISC) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.
या वर्षीच्या भारतीय विज्ञान काँग्रेसची (ISC) ची मध्यवर्ती संकल्पना "महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" आहे. यात शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा होईल. या काँग्रेसमध्ये सहभागी, महिलांना एसटीइएम (STEM) अर्थात (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) शिक्षण, संशोधनात संधी आणि आर्थिक सहभाग यात समान संधी मिळवून देण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच शिक्षण, संशोधन तसेच उद्योगाच्या उच्च श्रेणींमध्ये महिलांची संख्या वाढवण्याच्या विविध पर्यायांवर चर्चा आणि विचारविनिमय करतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील महिलांचे योगदान दर्शविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल, ज्यामध्ये नामवंत महिला शास्त्रज्ञांची व्याख्याने देखील होतील.
भारतीय विज्ञान काँग्रेस(ISC)सोबत इतरही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. मुलांमध्ये वैज्ञानिक रुची आणि जिज्ञासा वाढवण्यासाठी चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेसचेही आयोजन केले जाईल. शेतकरी विज्ञान काँग्रेस जैव-अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. यावेळी आदिवासी विज्ञान काँग्रेस देखील आयोजित केली जाईल, जे आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच स्थानिक प्राचीन ज्ञान प्रणाली आणि अभ्यासाचे वैज्ञानिक प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ असेल.
भारतीय विज्ञान काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1914 मध्ये आयोजित करण्यात आले होते. आयएससी (ISC) चे 108 वे वार्षिक अधिवेशन नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात होणार आहे, जे या वर्षी शताब्दी साजरे करत आहे.