“इतिहासात अशा अनेक कथा आहेत, ज्यांचे आपल्याला विस्मरण झाले आहे”
“आपल्या वारशांविषयी असलेली उदासीनता देशाचे मोठे नुकसान करणारी ठरली आहे.”
“लोथल हे सिंधू संस्कृतीतील केवळ एक महत्त्वाचे व्यापारी केंद्रच नव्हते, तर ते भारताच्या सागरी शक्तीचे आणि समृद्धीचे प्रतीकही होते.”
“आपल्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान असलेले लोथल, आता भविष्यातील पिढ्यांनाही आकार देईल”
“जेव्हा आपण आपल्या वारशाचे जतन करत असतो, त्यावेळी आपण त्यांच्याशी संबंधित भावनांचीही जपणूक करत असतो”
“गेल्या आठ वर्षांत भारतात निर्माण झालेली वारसा स्थळे आपल्याला भारताच्या समृद्ध वारसा-परंपरांची ओळख करुन देतात”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ड्रोन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, गुजरातच्या लोथल इथे, सुरु असलेल्या “राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या’ बांधकामाचा आढावा घेतला.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी, या प्रकल्पाच्या जलद विकासाबद्दल आनंद व्यक्त केला. लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात, त्यांनी उल्लेख केलेल्या ‘पंच प्रणाचे त्यांनी स्मरण केले. आपल्या ‘वारसा स्थळाविषयीचा अभिमान’ त्यांनी अधोरेखित केला. आणि सांगितले की, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जो समृद्ध वारसा ठेवला आहे, त्यात सागरी वारसा अतिशय महत्वाचा आहे. “आपल्या इतिहासात अशा अनेक कथा आहेत, ज्या आज विस्मरणात गेल्या आहेत.  त्यांचे जतन करण्याचे, आणि त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काहीही मार्ग शोधले गेले नाहीत. खरे तर इतिहासातील अनेक गोष्टींपासून आपण बरेच काही शिकू शकतो. भारताचा सागरी वारसा हा देखील एक असाच दुर्लक्षित विषय आहे, ज्याविषयी फारसे बोलले गेले नाही.” असे पंतप्रधान म्हणाले. प्राचीन काळी भारताचा व्यापार आणि व्यवसाय किती दूरपर्यंत पसरले होते, आणि भारताचे त्या काळात अस्तित्वात असलेल्या सर्व संस्कृतींशी कसे संबंध होते. हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मात्र, हजारो वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारताच्या या समृद्ध परंपरा खंडीत झाल्या आणि आपण आपल्याच वारशाविषयी, आपल्या क्षमतांविषयी उदासीन झालो, अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.

भारताचा हजारो वर्षांचा उज्ज्वल आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा अधोरेखित करून, पंतप्रधानांनी दक्षिण भारतातील चोल साम्राज्य, चेर राजघराणे आणि पांड्या राजघराणे यांनी सागरी स्रोतांचे महत्व ओळखून ते अभूतपूर्व उंचीवर नेले, असे सांगितले. यामुळे देशाची नौदल शक्ती तर वाढलीच, त्यासोबतच भारताचा जगभरातील व्यापार देखील वाढला, असेही पंतप्रधान म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मजबूत आरमार उभारले आणि परदेशी आक्रमकांना थोपवले, असेही त्यांनी सांगितले.  “हे भारताच्या इतिहासातील गौरवास्पद पान आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,” अशी खंत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त कली.  त्यांनी, एके काळी कच्छ मध्ये मोठमोठी जहाजे बांधण्याचा उद्योग कसा भरभराटीला आला होता, या आठवणींना उजाळा दिला आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या स्थळांच्या पुनरुज्जीवनासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. “भारतात बनलेली मोठी जहाजे, जगभरात विकली जात असत. आपल्या वारशाविषयी असलेल्या उदासीनतेमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.

पुरातत्व उत्खननात ऐतिहासिक महत्त्वाची अनेक ठिकाणे सापडली आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.   भारताची शान असलेली धोलाविरा आणि लोथल ही केंद्रे ज्या रूपात एके काळी प्रसिद्ध होती ,तेच रूप पुन्हा प्राप्त करून देण्याचे  आम्ही निश्चित केले आहे. या मोहिमेत  वेगाने काम होत असल्याचे आम्ही पाहत आहोत,” असे ते म्हणाले. लोथल हे , भारताच्या सागरी क्षमतेच्या  समृद्धीचे केंद्र होते. अलीकडेच वडनगरजवळ उत्खननादरम्यान सिकोतर मातेचे मंदिर सापडले आहे.प्राचीन काळातील सागरी व्यापाराची माहिती देणारे पुरावे देखील सापडले आहेत. याचप्रकारे  सुरेंद्रनगरच्या झिंझुवाडा गावात दीपगृह असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लोथलच्या उत्खननात सापडलेल्या शहरांचे , बंदरांचे आणि बाजारपेठांच्या  अवशेषांवरून  त्याकाळच्या शहरी नियोजनासंदर्भात आज बरेच काही शिकता येते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. "लोथल हे केवळ सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख व्यापारी केंद्र नव्हते तर ते भारताच्या सागरी सामर्थ्याचे आणि समृद्धीचे प्रतीक देखील होते", असे ते म्हणाले.  लक्ष्मी आणि देवी सरस्वती या दोघींचीही  कृपा या क्षेत्रावर आहे आणि  एक काळ होता जेव्हा लोथल बंदर 84 देशांच्या ध्वजांनी चिन्हांकित होते आणि वलभी येथे 80 देशांतील विद्यार्थी राहत होते, असे त्यांनी सांगितले.

लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुल भारताचा वैविध्यपूर्ण सागरी इतिहास शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एक केंद्र म्हणून काम करेल, असे   पंतप्रधानांनी सांगितले. लोथल येथील वारसा संकुल  भारतातील सामान्य माणसाला त्याचा इतिहास सहज समजेल अशा पद्धतीने बांधले  जात आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच युगाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले. लोथलचे वैभव परत आणण्याचे प्रयत्न केवळ संकुलापुरते  मर्यादित नसून गुजरातच्या किनारपट्टी भागात अनेक आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प येत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. आगामी सेमीकंडक्टर प्रकल्पाचाही  त्यांनी उल्लेख केला. “हजारो वर्षांपूर्वी विकसित झालेल्या या भागाचा पुनर्विकास  करण्यासाठी आमचे सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. आपल्याला अभिमान वाटणारे लोथल आता त्याच्या इतिहासामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य घडवेल,”असे पंतप्रधान म्हणाले.

संग्रहालय हे केवळ वस्तू किंवा दस्तऐवज ठेवण्याचे आणि प्रदर्शित करण्याचे साधन नाही  असे सांगत जेव्हा आपण आपला वारसा जपतो तेव्हा त्याच्याशी निगडित भावना आपण जपत असतो, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. भारताचा  आदिवासी वारसा अधोरेखित करत मोदी यांनी  देशभरात बांधल्या जाणाऱ्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयांवर प्रकाश टाकला आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा उल्लेख केला.भारताच्या युद्धवीरांनी दिलेल्या बलिदानाचेही पंतप्रधानांनी स्मरण केले आणि देशाच्या रक्षणासाठी  आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या  शूर वीर  आणि वीरांगणांच्या  बलिदानाची साक्ष देणाऱ्या   राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय पोलीस स्मारक यांचा उल्लेख केला. भारतातील लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे ओझरते दर्शन घडवणाऱ्या  पंतप्रधान संग्रहालयाचा उल्लेख केला.केवडिया मधील  एकता नगर येथील एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी ) भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी केलेल्या प्रयत्नांची, चिकाटीची आणि तपश्चर्येची  आठवण करून देतो  असेही पंतप्रधान  म्हणाले. “गेल्या 8 वर्षात देशात विकसित झालेला वारसा भारताच्या वारशाच्या भव्यतेची  झलक प्रदर्शित करतो ”, असे पंतप्रधान म्हणाले.

जेव्हा देशाच्या सागरी वारशाचा मुद्दा उपस्थित होईल तेव्हा लोथल येथे साकारत असलेले राष्ट्रीय सागरी वस्तुसंग्रहालय देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा विषय असेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले, “लोथल त्याच्या गतवैभवासह जगासमोर स्वतःला सादर करेल याची मला खात्री वाटते.”

या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि सर्वानंद सोनोवाल यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला.

पार्श्वभूमी

लोथल हे हडप्पा संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाच्या शहरांपैकी एक होते. सर्वात  प्राचीन मानवनिर्मित गोदीच्या अवशेषांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. सध्या उभारण्यात येत असलेले सागरी वारसा संकुल म्हणजे या शहराचा ऐतिहासिक वारसा आणि ठेवा यांचा अतिशय सुयोग्य गौरव आहे.

लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुल हा अशा प्रकारचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प म्हणून विकसित केला जात असून त्यात केवळ भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारशाचे दर्शन घडणार नसून त्यासोबतच लोथल शहराला जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येण्यासाठी देखील त्याची मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तेथील पर्यटन क्षेत्राला मिळालेली चलना या भागातील आर्थिक विकासाला देखील गती देईल.

सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येत असलेल्या या संकुलाच्या उभारणीचे काम मार्च 2022 मध्ये सुरु झाले. या संकुलामध्ये हडप्पा वास्तुरचनेचे आणि जीवनशैलीचे दर्शन घडविणारे लोथल मिनी रिक्रीएशन केंद्र तसेच स्मारक थीम पार्क, सागरी आणि नौदल थीम पार्क,हवामानविषयक थीम पार्क आणि साहसी खेळ तसेच मनोरंजन थीम पार्क असे चार विशिष्ट संकल्पनांवर आधारित पार्क यांच्यासह अनेक नाविन्यपूर्ण आणि विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. या संकुलात इतर अनेक गोष्टींसह, जगातील सर्वात अधिक उंचीवरील दीपगृह वस्तुसंग्रहालय, हडप्पा संस्कृतीपासून आजपर्यंतच्या भारताच्या सागरी वारशाचे ठळकपणे दर्शन घडविणारी चौदा दालने तसेच सागरकिनारी भागातील राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वैविध्यपूर्ण सागरी वारशाचे दर्शन घडविणारे कोस्टल स्टेट्स पॅव्हिलीयन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi