पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी पश्चिम आशिया क्षेत्रातील बिकट परिस्थिती आणि इस्रायल-हमास संघर्षावर विचार विनिमय केला.
दहशतवादी घटना, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र खंत व्यक्त केली. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
अध्यक्ष रायसी यांनी परिस्थितीबाबतचे त्यांचे आकलन सामायिक केले.
युद्धजन्य तणाव रोखण्याच्या, मानवतावादी दृष्टिकोनातून निरंतर मदत, शांतता आणि सुरक्षितता त्वरित पुनर्संचयित करण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
नेत्यांनी बहुआयामी द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि सकारात्मक मूल्यांकन केले. त्यांनी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इराणमधील चाबहार बंदराला दिलेले महत्व आणि प्राधान्याचे स्वागत केले.
प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यामध्ये सामायिक हित लक्षात घेऊन संपर्कात राहण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले.