इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती निवळण्याच्या गरजेवर भर दिला. पंतप्रधानांनी सर्व ओलिसांची तात्काळ सुटका करण्याच्या तसेच पीडितांपर्यंत मानवतावादी मदतीचा ओघ सुरु ठेवण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.त्यांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या संघर्षावर लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर आणि भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.
एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.