पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिकी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष माटामला सिरिल रामाफोसा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचे सकारात्मक दृष्टिकोनातून मूल्यमापन केले. 2023 मध्ये द्विपक्षीय मुत्सद्दी संबंधांच्या प्रारंभाला तीस वर्षे पूर्ण होत असल्याचाही यात समावेश होता.
22-24 ऑगस्ट 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत भरवण्यात येत असलेल्या ब्रिक्स शिखरपरिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले. सदर परिषदेच्या तयारीची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारत, या परिषदेत भाग घेण्यासाठी जोहान्सबर्ग येथे भेट देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
परस्पर स्वारस्याच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
भारताच्या विद्यमान जी-ट्वेंटी अध्यक्षतेअंतर्गत भारत हाती घेत असलेल्या उपक्रमांना राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तसेच जी-20 शिखर परिषदेसाठी भारतभेटीवर येण्याविषयी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
परस्पर संपर्कात राहण्याचे उभय नेत्यांनी मान्य केले.