माझ्या यु ट्युबर (YouTuber) मित्रांनो, आज एक यु ट्युबर म्हणून तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे. मीही तुमच्या सारखाच आहे, कोणी वेगळा नाही. गेली पंधरा वर्ष मी ही देशाशी आणि जगाशी यु ट्युबच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्याकडेही अनेक सब्स्क्रायबर्स आहेत .
मला असे सांगण्यात आले आहे की, जवळजवळ 5,000 निर्मात्यांचा, इच्छुक उमेदवारांचा मोठा समुदाय या ठिकाणी आज उपस्थित आहे. काही गेमिंगवर काम करतात, काही तंत्रज्ञानाचे शिक्षण देतात, काही फूड ब्लॉगिंग करतात, तर काही ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत किंवा जीवनशैली प्रभावित करतात.
मित्रहो, तुमच्या आशयसंपन्न मजकुराचा आपल्या देशातील लोकांवर कसा प्रभाव पडतो, हे मी अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. आणि हा प्रभाव आणखी वाढवण्याची संधी आज आपल्याकडे चालून आली आहे. आपण एकत्र येऊन आपल्या देशाच्या अफाट लोकसंख्येच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकतो. आपण एकत्र येऊन आणखी अनेक जणांना सक्षम आणि बळकट करू शकतो. आपण एकत्र येऊन सहज शिकवू शकतो आणि कोट्यावधी लोकांना महत्वाच्या बाबी समजावू शकतो. आपण त्यांना आपल्याशी जोडू शकतो.
मित्रहो, माझ्या चॅनेलवर हजारो व्हिडिओ आहेत. मात्र , आपल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांशी मी परीक्षेचा ताण, अपेक्षा व्यवस्थापन, उत्पादकता यासारख्या विषयांवर यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधला, ही गोष्ट मला सर्वात जास्त समाधान देणारी होती.
देशातील एवढ्या मोठ्या सृजनशील समुदायामध्ये असताना, मला आपल्याशी काही विषयांवर बोलावेसे वाटते. हे विषय जनआंदोलनाशी जोडलेले आहेत, देशातील जनतेची शक्ती हाच त्यांच्या यशाचा आधार आहे.
पहिला विषय आहे, स्वच्छता- गेल्या नऊ वर्षांमध्ये स्वच्छ भारत हे खूप मोठे अभियान ठरले. त्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले, लहान मुलांनी त्यामध्ये भावनिक शक्तीची भर घातली. सेलिब्रिटींनी त्याला नवी उंची दिली, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी याला मिशनमध्ये रूपांतरित केले आणि तुमच्या सारख्या यु ट्युबर्सनी स्वच्छतेला अधिक ‘कूल’ बनवले.
पण आपण थांबायचे नाही. जोपर्यंत स्वच्छता ही भारताची ओळख बनत नाही तोपर्यंत आपण थांबायचे नाही. त्यामुळे स्वच्छतेला तुमच्यापैकी प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे.
दुसरा विषय म्हणजे - डिजिटल पेमेंट्स. युपीआय च्या यशामुळे आज जगभरातील डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा 46 टक्के इतका आहे. तुम्ही देशातील अधिकाधिक लोकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रेरित करा, त्यांना तुमच्या चित्रफीतीद्वारे सोप्या भाषेत डिजिटल पेमेंट करायला शिकवा.
आणखी एक विषय आहे - वोकल फॉर लोकल. आपल्या देशात स्थानिक पातळीवर अनेक उत्पादने बनवली जातात. आपल्या स्थानिक कारागिरांचे कौशल्य अद्वितीय आहे. तुम्ही तुमच्या कामातून त्यांना प्रोत्साहित करू शकता आणि भारताची स्थानिक उत्पादने जागतिक बनवण्यासाठी मदत देखील करू शकता.
आणि माझी आणखी एक विनंती करु इच्छितो. इतरांनाही प्रेरित करा, आपल्या मातीचा सुगंध असणारे, आपल्या देशातील मजूर किंवा कारागिराच्या घामाचे उत्पादन आपण खरेदी करू असे भावनिक आवाहन करा. मग ती खादी असो, हस्तकला असो, हातमाग असो किंवा इतर काही असो. राष्ट्र जागृत करा, यासाठी चळवळ सुरू करा.
आणि आणखी एक गोष्ट मला माझ्या बाजूने सुचवायची आहे. यु ट्युबर म्हणून तुमच्या ओळखीसोबत, तुम्ही एक उपक्रम जोडू शकता. तुमच्या चित्रफीतीच्या प्रत्येक भागाच्या शेवटी प्रश्न टाकण्याचा विचार करा किंवा काहीतरी उपक्रम करण्यासाठी प्रेक्षकांना प्रोत्साहित करा. प्रेक्षक तो उपक्रम पूर्ण करतील आणि ते तुमच्यासोबत सामाईक करतील. अशा प्रकारे, तुमची लोकप्रियता देखील वाढेल आणि लोक नुसते ऐकण्यात नाहीत तर काहीतरी करण्यात सहभागी होतील.
तुम्हा सर्वांशी बोलून मला खूप आनंद झाला. तुमच्या प्रत्येक चित्रफीतीच्या शेवटी तुम्ही काय म्हणता... मी देखील तेच पुन्हा सांगेन: माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.