इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणाला मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 06 आणि 07 सप्टेंबर 2023 या कालावधीत इंडोनेशियामधील जकार्ता शहराला भेट देणार आहेत.
या भेटीदरम्यान आसियानचा विद्यमान अध्यक्ष म्हणून इंडोनेशियाने आयोजित केलेल्या 20व्या आसियान-भारत शिखर परिषद तसेच 18 व्या पूर्व आशियाई शिखर परिषद यांमध्ये देखील पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.
आगामी आसियान-भारत शिखर परिषद, व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या संदर्भात वर्ष 2022 मध्ये भारत-आसियान संबंधांचा उदय झाल्यानंतर आयोजित झालेली पहिलीच शिखर परिषद असणार आहे.या परिषदेमध्ये, भारत-आसियान संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल तसेच सहकार्याची पुढील दिशा निश्चित केली जाईल.
पूर्व आशियाई शिखर परिषदेमुळे आसियान देशांच्या प्रमुखांना तसेच भारतासह त्यांच्या आठ संवादात्मक भागीदारांना प्रादेशिक आणि जागतिक दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होईल.