जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून आसियान (ASEAN) संबंधित बैठकींमध्ये सहभागी होण्यासाठी मी इंडोनेशिया मधील जकार्ता येथे रवाना होत आहे.
माझा पहिला सहभाग विसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेत असेल. चौथ्या दशकात प्रवेश करणाऱ्या आपल्या भागीदारीच्या पुढील रुपरेषेबाबत आसियान नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. आसियान देशांसमवेत संबंध भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. गेल्या वर्षी सुरु झालेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीने आमच्या संबंधांना नवा आयाम दिला आहे.
त्यानंतर मी अठराव्या पूर्व आशिया परिषदेत सहभागी होणार आहे. हा मंच, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या या प्रदेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची उपयुक्त संधी प्रदान करतो. या जागतिक आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी व्यावहारिक सहकार्याच्या उपायांबाबत पूर्व आशिया परिषदेच्या इतर नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मी उत्सुक आहे.
गेल्या वर्षी बाली येथे झालेल्या जी-20 परिषदेसाठी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीचे मी स्मरण करतो, या भेटीमुळे आसियान प्रदेशाबरोबरचे आमचे संबंध अधिक दृढ होतील याचा मला विश्वास आहे.