पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे पंतप्रधान महामहिम बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आभासी शिखर परिषदेनंतरच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला आणि आभासी शिखर परिषदेदरम्यान स्वीकारलेल्या रोडमॅप 2030 अंतर्गत यापूर्वीच उचलल्या पावलांवर समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी वाढलेल्या व्यापार सहकार्य प्रगतीचाही आढावा घेतला आणि दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा वेगाने विस्तार करण्याच्या संभाव्यतेवर सहमती दर्शविली.
नोव्हेंबर 2021 च्या प्रारंभी ग्लासगो येथे होणाऱ्या आगामी यूएनएफसीसीसी सीओपी-26 (UNFCCC COP-26) बैठकीच्या संदर्भात हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी विस्तृत चर्चा केली. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या विस्तारासाठी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय हायड्रोजन अभियानासाठी भारताच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांमध्ये समाविष्ट हवामानासंबंधित कार्यवाहीच्या दृष्टीने भारताची वचनबद्धता पंतप्रधानांनी सांगितली.
उभय नेत्यांनी प्रादेशिक घडामोडी, विशेषत: अफगाणिस्तानमधील परिस्थितीवरही विचारविनिमय केला. या संदर्भात, त्यांनी कट्टरतावाद आणि दहशतवाद, तसेच मानवी हक्क आणि महिला आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांशी संबंधित समस्यांवर एक सामान्य आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित करण्याच्या गरजेवर सहमती दर्शविली.