नमस्कार!
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र जी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत जी, राजस्थान पत्रिकाचे गुलाब कोठारी जी आणि पत्रिका समुहाचे इतर कर्मचारी वर्ग, प्रसार माध्यमातील सहकारी, भगिनी आणि सद्गृहस्थ !!
गुलाब कोठारी जी आणि पत्रिका समूह यांना संवाद उपनिषद आणि अक्षरयात्रा या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा. ही पुस्तके म्हणजे साहित्य आणि संस्कृती, या दोन्हींसाठी अनुपम भेट आहे. आज मला राजस्थानच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले ‘पत्रिका व्दार’ही समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. हे व्दार स्थानिक नागरिकांबरोबरच जयपूरमध्ये येणा-या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. या कार्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन!
मित्रांनो,
कोणत्याही समाजामध्ये समाजातला बुद्धिवंत वर्ग, समाजातले लेखक किंवा साहित्यिक हे मार्गदर्शकाप्रमाणे असतात. हे विचारवंत समाजाचे शिक्षक असतात. शालेय शिक्षण तर आता घेवून संपते परंतु आपल्या शिक्षणाची प्रक्रिया संपूर्ण आयुष्यभर सुरू असते, प्रत्येक दिवसाला आपण शिकत असतो. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पुस्तके आणि लेखकांचीही असते. आपल्या देशामध्ये तर लेखनाचा निरंतर विकास हा भारतीयत्व आणि राष्ट्रीयत्व यांच्याबरोबरीने झाला आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या- लढ्याच्या काळामध्ये तर जवळपास प्रत्येक मोठ्या नेत्याचे नाव, कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लेखनकार्याशी जोडले गेले होते. आपल्याकडे महान संत, मोठ-मोठे वैज्ञानिकही लेखक आणि साहित्यिक होवून गेले आहेत. ही परंपरा कायम ठेवण्याचा आपण सर्वजण सातत्याने प्रयत्न करीत आहात, याचा मला आनंद होत आहे. आणखी एक मोठी गोष्ट अशी आहे की, ‘आम्ही विदेशींचे अंधानुकरण करण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी नाही’, असे स्वतःहून म्हणण्याचे धाडस राजस्थान पत्रिका समूह करीत आहे. हा समूह भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता आणि मूल्यांचे संरक्षण करून त्यांना पुढे नेण्यासाठी प्राधान्य देत आहे.
गुलाब कोठारीजींची ही पुस्तके- संवाद उपनिषद आणि अक्षर यात्रा म्हणजे त्यांच्या या भूमिकेचे जीवंत प्रमाण आहे. गुलाब कोठारीजी आज ज्या परंपरा पुढे नेत आहेत, त्याच संस्कारांच्या मुशीतून पत्रिकेचा प्रारंभ झाला होता. कर्पूर चंद्र कुलिश जी यांनी भारतीयत्व आणि भारत सेवेचे संकल्प करून पत्रिकाने परंपरेचा प्रारंभ केला होता. पत्रकारितेमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचे आम्ही सर्वजण स्मरण करतो, परंतु कुलिश जी यांनी वेंदांचे ज्ञान ज्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला, ते कार्य खरोखरीच अद्भूत होते. स्वर्गिय कुलिशजी यांची अनेकवेळा व्यक्तिगत स्वरूपामध्ये भेट घेण्याची संधी मला मिळाली. त्यांना माझ्याविषयी खूप आत्मियता होती. ते नेहमी म्हणत होते, ‘‘ पत्रकारिता सकारात्मकतेनेच सार्थकतेपर्यंत पोहोचू शकते.’’
मित्रांनो,
समाजाला काही सकारात्मक देण्याचा विचार केवळ पत्रकार किंवा लेखक म्हणून आवश्यक आहे, असे अजिबात नाही. ही सकारात्मकता, असे विचार एक व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तित्वासाठी अतिशय गरजेचे आहेत. कुलिश जी यांचा हा विचार, त्यांचे संकल्प पत्रिका समूह आणि गुलाब कोठारी जी सातत्याने पुढे नेत आहेत, याचा मला आनंद आहे. गुलाब कोठारी जी, आपल्याला आठवत असेल, ज्यावेळी कोरोना या विषयावर छापील प्रसार माध्यमातल्या सहका-यांना मी मुलाखत दिली होती, त्यावेळीही आपण केलेल्या शिफारसी, दिलेल्या सल्ल्याविषयी मी म्हणालो होतो, ‘तुमचे शब्द मला आपल्या पितांजींचे स्मरण करून देत आहेत. संवाद उपनिषद आणि अक्षर यात्रा ही पुस्तके पाहूनही असेच वाटतेय की, तुम्ही आपल्या वडिलांची वैदिक परंपरा किती दृढतेने पुढे नेत आहात.‘
मित्रांनो,
ज्यावेळी मी गुलाबजींची पुस्तके पहात होतो, त्यावेळी मला त्यांच्या एका संपादकीय लेखाची आठवण झाली. 2019मध्ये निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मी पहिल्यांदाच देशातल्या लोकांशी संवाद साधला होता. त्यावेळी कोठारी जींनी त्यावर लिहिलेले होते- ‘‘स्तुत्य संकल्प’’! त्यांनी लिहिले होते की, माझे बोलणे ऐकून त्यांना असे वाटले की, मी 130 कोटी देशवासियांसमोर जणू त्यांच्याच मनातली गोष्ट बोललो आहे. कोठारी जी, आपल्या पुस्तकांमध्ये ज्या ज्यावेळी उपनिषदांमध्ये ज्ञान आणि वैदिक गोष्टींची माहिती मिळते, ती वाचून बरेचदा मलाही असेच वाटते की, जे काही वाचतोय, ते माझ्या मनातलेच भाव आहेत.
वास्तवामध्ये मानवाच्या कल्याणासाठी, सामान्य मानवाची सेवा करण्यासाठी शब्द मग कोणाचेही असोत, त्यांचा संबंध प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेला असतो. म्हणूनच आपल्या वेदांना, वेदांमध्ये सांगितलेल्या विचारांना कालातीत असे म्हटले आहे. वेद मंत्रांचे दृष्टा मग कोणी ऋषी असो, परंतु त्यांची भावना, त्यांचे दर्शन मानवजातीसाठीच असते. म्हणूनच आमचे वेद, आमची संस्कृती संपूर्ण विश्वासाठी आहे. उपनिषद संवाद आणि अक्षर यात्रा सुद्धा त्याच भारतीय चिंतनाच्या शृंखलेमधली एक कडी म्हणून लोकांपर्यंत पोहोचेल, अशी मला अपेक्षा आहे. आज टेक्स्ट आणि व्टिट यांच्या काळामध्ये हे जास्त गरजेचे आहे. आमची नवीन पिढी गंभीर ज्ञानापासून दूर जावू नये.
मित्रांनो,
आमच्या उपनिषदांमधले हे ज्ञान, वेदांविषयीचे चिंतन, हे केवळ आध्यात्मिक किंवा दार्शनिक आकर्षणाचे क्षेत्र नाही. वेद आणि वेदांत यामध्ये सृष्टी आणि विज्ञान यांचेही दर्शन आहे. कितीतरी वैज्ञानिकांना वेदांनी आकर्षित केले आहे. कितीतरी वैज्ञानिकांनी याविषयी गांभिर्याने रूची दाखवली आहे. आपण सर्वांनी निकोला टेस्ला हे नाव ऐकलंच असेल. आधुनिक विश्व आज जसे आपण पाहतो आहे, तसे कदाचित नसते, त्यामुळे टेस्ला यांचे नाव न घेता आधुनिक विश्वाकडे पाहताच येणार नाही. शतकांपूर्वी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांची आणि निकोला टेस्ला यांची भेट झाली. स्वामी विवेकानंद यांनी टेस्ला यांना ज्यावेळी उपनिषदांमधले ज्ञान, वेदान्तामध्ये ब्रह्मांडाची असलेली व्याख्या यांच्याविषयी माहिती दिली. त्यावेळी ते हतप्रभ झाले होते.
आकाश आणि प्राण यासारख्या संस्कृत शब्दांनी ब्रह्मांडाविषयी अतिशय सखोल चर्चा उपनिषदांमध्ये करण्यात आली आहे. टेस्ला यांनी सांगितले की, ही तर आधुनिक विज्ञानाची भाषा आहे, या भाषेमध्ये गणितीय समीकरणे आणूया. त्यांना वाटले होते की, या ज्ञानामुळे विज्ञानातल्या सर्वात गूढ गोष्टी, आकलन न झालेले प्रश्न, कोडी सोडविता येतील. वास्तविक याविषयी अनेक प्रकारे संशोधन झाले. जी चर्चा स्वामी विवेकानंद आणि निकोला टेस्ला यांच्यामध्ये झाली होती, त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आल्या. आजही खूप संशोधन होत आहे. परंतु कुठे ना कुठे तरी एका प्रसंगामध्ये आपण आापल्या ज्ञानाविषयी पुन्हा चिंतन करण्यासाठी प्रेरणा मिळत राहते. आज आपल्या युवकांनी या दृष्टीनेही जाणून घेतले पाहिजे, विचार केला पाहिजे आणि आपल्या वेदांचे ज्ञान त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच संवाद उपनिषद यासारखे पुस्तक, अक्षर यात्रेविषयी सखोल मंथन करणे हे आमच्या युवकांसाठी एक नवीन आयाम देणारे ठरणार आहे. त्यांना वैचारिक खोली देणारी ही पुस्तके आहेत.
मित्रांनो,
अक्षर म्हणजे आपल्या भाषेची, आपली अभिव्यक्तीची पहिली पायरी असते. संस्कृतमध्ये अक्षर याचा अर्थ आहे, ज्याचे क्षरण कधीच होत नाही ते अक्षर! म्हणजेच जे काही शाश्वत राहते ते! ही विचारांची शक्ती आहे. हेच सामर्थ्य आहे. हजारो वर्षांपूर्वी जो विचार, जे ज्ञान कोणी महान ऋषी, महर्षी, वैज्ञानिक, दार्शनिक यांनी आपल्याला दिले, तेच ज्ञान आजही हा संसार पुढे नेत आहे. म्हणूनच आपल्या उपनिषदांमध्ये, आपल्या शास्त्रांमधले ज्ञान हे ‘अक्षर ब्रह्म’ आहे, असे मानले जाते. ‘अक्षरम् ब्रह्म परमम्’ हा सिद्धांत मांडण्यात आला आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की – ‘‘ शब्द ब्रह्माणि निष्णातः परम् ब्रह्माधि गच्छति’’ याचा अर्थ असा आहे की, शब्द हे ब्रह्म आहेत. जो कोणी शब्द ब्रह्म पूर्णपणे जाणून घेतो, तो ब्रह्मत्वाला, ईश्वराला प्राप्त करतो.
शब्दाचा महिमा, शब्दाला ईश्वर मानणे, असे उदाहरण आणखी इतरत्र कुठेही मिळत नाही. म्हणूनच शब्दांनी सत्य सांगण्याचे धाडस, शब्दांनी सकारात्मकता देण्याची शक्ती, शब्दांनी सृजन करण्याचा विचार, हा भारतीयत्वाचे मानस आहे, स्वभाव आहे. आपली ही प्रकृती आहे. ज्यावेळी आपल्याला ही शक्ती जाणवते, त्यावेळी एक साहित्यिक म्हणून, एक लेखक म्हणून आपले महत्व लक्षात येते. समाजाविषयी आपली असलेली जबाबदारी, दायित्व जाणवू शकते.
आपण पहा, गरीबांना शौचालय देण्याचे असो, अनेक रोगांपासून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान असो, माता- भगिनींची लाकडाच्या धुरांपासून सुटका करणारी उज्ज्वला गॅस योजना असो, प्रत्येकाच्या घरापर्यंत पेयजल पोहोचविण्यासाठी सुरू केलेल जल जीवन मिशन असो, सर्व प्रसार माध्यामांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केले आहे. महामारीच्या काळामध्ये कोरोनाच्या विरोधात जागरूकता अभियानामध्ये भारतीय प्रसार माध्यमांनी अभूतपूर्व सेवा केली आहे. सरकारच्या कामाचे विवेचन, सरकारच्या योजनेमध्ये असलेली जमिनी स्तरावरची कमतरता, दृष्टीस आणून देणे, टीका करणे, ही कामेही आमच्या माध्यमांकडून चांगली होत आहेत. अर्थात, अनेकवेळा अशीही स्थिती निर्माण होते की, प्रसार माध्यमांवरही टीका होत असते, समाज माध्यमांच्या काळामध्ये तर अशा गोष्टी जास्त होणे स्वाभाविक झाले आहे. परंतु होत असलेल्या टीकेमध्ये शिकणे, धडा घेणे आम्हा सर्वांसाठी तितकेच स्वाभाविक होत आहे. म्हणूनच आज आमची लोकशाही इतकी सशक्त झाली आहे, मजबूत झाली आहे.
मित्रांनो,
ज्याप्रमाणे आज आपण आपला वारसा, आपले विज्ञान, आपली संस्कृती, आपले सामर्थ्य पुढे घेवून जात आहोत, ज्याप्रमाणे आपण त्याचा स्वीकार करीत आहोत, तितक्याच आत्मविश्वासाने यापुढची वाटचाल आपण करायची आहे. आज ज्यावेळी आपण आत्मनिर्भर भारत याविषयी बोलतो, आज ज्यावेळी ‘लोकलसाठी व्होकल’ असे बोलले जात आहे, त्या संकल्पाला आमच्या प्रसार माध्यमांकडून एका मोठ्या मोहिमेचे स्वरूप दिले जात आहे, याचा मला आनंद होत आहे. आपल्याला हे व्हिजन आता अधिक व्यापक करण्याची आवश्यकता आहे.
भारतातली स्थानिक उत्पादने आता वैश्विक होत आहेत. परंतु भारताचा आवाजही आता जास्त वैश्विक होत आहे. संपूर्ण जग, विश्व आता भारताचे म्हणणे काय आहे, हे लक्ष देवून ऐकत आहे. आज जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारत अतिशय दृढतेने आपली उपस्थिती दाखवत आहे. अशा स्थितीमध्ये भारतीय प्रसार माध्यमांनीही वैश्विक होण्याची गरज आहे. आपल्या वर्तमानपत्रांना, नियतकालिकांना वैश्विक प्रतिष्ठा दिली पाहिजे. डिजिटल युगामध्ये डिजिटली आपण संपूर्ण दुनियेमध्ये पोहोचले पाहिजे. जगामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे साहित्यिक पुरस्कार दिले जातात, भारतातल्या संस्थांनीही तसे पुरस्कार दिले पाहिजेत. ही आजच्या काळाची मागणी आहे. हेही देशासाठी आवश्यक आहे.
मला माहिती आहे की, कर्पूरचंद्र कुलिश यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रिका समूहाने आंतरराष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी मी पत्रिका समूहाचे अभिनंदन करतो. आपण करीत असलेल्या प्रयत्नांमुळे भारताला वैश्विक माध्यम मंचावर एक वेगळी, नवी ओळख मिळू शकेल, असा मला विश्वास आहे. कोरोना काळामध्ये ज्याप्रमाणे जनतेमध्ये जागरूकतेचे काम पत्रिका समुहाने केले आहे, त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. या अभियानाला आता आणखी गती आणण्याची आवश्यकता आहे. आपले देशवासी स्वस्थ, निरोगी रहावेत आणि अर्थव्यवस्थेला ही गती मिळावी, या दोन्हीला देशाच्या दृष्टीने प्राधान्य आहे. देश लवकरच हे युद्ध जिंकेल आणि देशाची यात्राही अक्षर यात्रा बनेल, असा मला विश्वास आहे
या शुभेच्छांसह, आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद !