कोविड लसीकरण उत्सव कोरोनाविरूध्दच्या दुसऱ्या मोठ्या लढाईचा प्रारंभ आहे,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासोबतच, कोविड संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक स्वच्छतेबरोबर वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे, यावरही त्यांनी भर दिला. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला आज आरंभ झाला असून, तो 14 एप्रिल म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत सुरू राहील.
यानिमित्ताने दिलेल्या संदेशात या मोहिमेतील चार ठळक मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भर दिला.
पहिला, प्रत्येकाचे लसीकरण, याचा अर्थ जे स्वतः लसीकरणासाठी जाऊ शकत नाहीत उदाहरणार्थ अशिक्षित आणि जेष्ठ नागरीकांना मदत करायला हवी .
दुसरा, प्रत्येकाला-उपचार. यात, ज्यांना संसाधने आणि माहिती मिळू शकत नाही, त्यांना कोरोना उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे.
तिसरा,प्रत्येकाने -प्रत्येकाला वाचविणे, याचा अर्थ मी मास्क घालणार आणि मला तसेच इतरांनाही सुरक्षित करणार, यावर भर दिला पाहिजे.
अखेरीस, समाजाने आणि नागरीकांनी लघु प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.एखादा जरी पाँझिटीव्ह रूग्ण आढळला तरी , कुटुंबातील सदस्यांनी आणि समाजातील सदस्यांनी छोटे छोटे प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करावेत. लघु प्रतिबंधात्मक विभाग हे दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात महत्वाचा घटक ठरतात, असेही पंतप्रधान म्हणाले.
चाचण्या आणि जनजागृती यांची गरज आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीला लस घेण्याचे आवाहन केले. समाज आणि प्रशासन या दोघांनीही यासाठी प्रयत्न करायला हवेत,अशी आग्रही सूचना त्यांनी केली.
लसीची एकही मात्रा फुकट जाणार नाही, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण वाटचाल करायला हवी यावर पंतप्रधानांनी भर दिला. लसीच्या मात्रांचा अधिकाधिक वापर हा आपल्या लसीकरण क्षमतेत वाढ करण्याचा मार्ग आहे ,असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
लघु प्रतिबंधक क्षेत्रांविषयी जनजागृती,अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडणे ,सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण ,मास्क घालण्यासह इतर कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन यावरच आपले या लढाईतील यश अवलंबून आहे.
लसीकरण उत्सवाच्या या चार दिवसांत वैयक्तिक, सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर ध्येयनिश्चिती करून ते साध्य करण्यासाठी अथकपणे परीश्रम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
लोकसहभागातून हे शक्य आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जागरुकता आणि जबाबदारीपूर्ण वर्तन याद्वारे आपण पुन्हा एकदा कोरोनाला प्रतिबंध करू.
"दवाई भी ,कडाई भी" (औषध ही, प्रतिबंध ही) या मंत्राची त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना आठवण करुन दिली.
टीका उत्सव पर देशवासियों से आग्रह। pic.twitter.com/GvGV3OCnP7
— PMO India (@PMOIndia) April 11, 2021