सौराष्ट्र तमिळ संगममच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
पाहुण्यांचे स्वागत करणे हा एक विशेष अनुभव आहे परंतु दशकांनंतर घरी परतण्याचा अनुभव आणि आनंद अतुलनीय आहे. सौराष्ट्रातील लोकांनी तमिळनाडूतील मित्रांसाठी लाल गालिचा अंथरला आहे, ते ही त्याच उत्साहाने राज्याला भेट देत आहेत याकडे मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री या नात्याने 2010 मध्ये सौराष्ट्रातील 50,000 हून अधिक सहभागींसह मदुराई येथे असाच एक सौराष्ट्र तमिळ संगमम आयोजित केला होता याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. सौराष्ट्रात आलेल्या तामिळनाडूतील पाहुण्यांमध्येही हाच स्नेह आणि उत्साह असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पाहुणे पर्यटनात रमले असून केवडियातील स्टॅच्यू ऑफ युनिटीला त्यांनी यापूर्वीच भेट दिल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, भूतकाळातील मौल्यवान आठवणी, वर्तमानातील आत्मीयता आणि अनुभव तसेच सौराष्ट्रात भविष्यासाठी संकल्प आणि प्रेरणा तमिळ संगमममधे पाहिली जाऊ शकते. त्यांनी यानिमित्ताने सौराष्ट्र आणि तामिळनाडूमधील सर्वांचे अभिनंदन केले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये, आपण सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे साक्षीदार झालो आहोत. हा केवळ तामिळनाडू आणि सौराष्ट्राचा संगम नाही तर देवी मीनाक्षी आणि देवी पार्वतीच्या रूपातील शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. तसेच, हा भगवान सोमनाथ आणि भगवान रामनाथ यांच्या रूपातील शिवाच्या आत्म्याचा उत्सव आहे. त्याचप्रमाणे हा सुंदरेश्वर आणि नागेश्वराच्या भूमीचा संगम आहे, हा श्रीकृष्ण आणि श्री रंगनाथाचा संगम आहे, नर्मदा आणि वागाई, दांडिया आणि कोलाथमचा संगम आहे. द्वारका आणि पुरीसारख्या पवित्र परंपरेचा संगम आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “तमिळ सौराष्ट्र संगमम हा सरदार पटेल आणि सुब्रमण्यम भारती यांच्या देशभक्तीच्या संकल्पाचा संगम आहे. आपल्याला हा वारसा घेऊन राष्ट्र उभारणीच्या मार्गावर पुढे जायचे आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
“भारत हा एक असा देश आहे जो आपल्या विविधतेला एक वैशिष्ट्य म्हणून पाहतो”, असे सांगत, देशभरातील विविध भाषा आणि बोली, कला प्रकार आणि शैलींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारतात आपल्या आस्था आणि अध्यात्म पद्धतीमध्ये विविधता आढळते यावर पंतप्रधानांनी भर दिला. भगवान शिव आणि ब्रह्मदेवाची पूजा करण्याचे आणि विविध पद्धतीने भूमी, पवित्र नद्या यापुढे नतमस्तक होण्याचे त्यांनी उदाहरण दिले. ही विविधता आपल्याला विभाजित करत नाही तर आपले बंध आणि नातेसंबंध घट्ट करते. विविध प्रवाह एकत्र आल्यावर संगम निर्माण होतो हे त्यांनी अधोरेखित केले. भारत शतकानुशतके कुंभसारख्या कार्यक्रमात नद्यांचा संगम ते कल्पनांचा संगम या कल्पनेचे पालनपोषण करत आहे असे त्यांनी सांगितले. "ही संगमाची शक्ती आहे, सौराष्ट्र तमिळ संगमम आज ती एका नव्या रूपात पुढे नेत आहे", असे पंतप्रधान म्हणाले. सरदार पटेल साहेबांच्या आशीर्वादाने देशाची एकात्मता अशा महान उत्सवांच्या रूपाने आकार घेत असल्याचे त्यांनी विशद केले. आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत'चे स्वप्न पाहणाऱ्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांची पूर्तताही हीच आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी वारशाचा अभिमान असलेल्या ‘पंच प्राण’चे स्मरण करून सांगितले की, “आपल्या वारशाबाबत जेंव्हा आपण अधिक जाणून घेऊ तेंव्हा त्याबद्दलचा अभिमान आणखी वाढेल, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होऊन स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करू तेंव्हाच वारशाबाबतचा अभिमान वाढेल.” काशी तमिळ संगमम आणि सौराष्ट्र तमिळ संगमम यासारखे समारंभ या दिशेने एक प्रभावी चळवळ बनत आहेत, असे ते म्हणाले. गुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील खोल रुजलेल्या संबंधांकडे दुर्लक्ष करण्यावर त्यांनी भाष्य केले. “पूराण काळापासून या दोन राज्यांमध्ये खोलवर रुजलेले संबंध आहेत. पश्चिमेतील सौराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडूचा हा सांस्कृतिक विलय म्हणजे हजारो वर्षांपासून वाहत असलेला निर्झर आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
2047 चे उद्दिष्ट, गुलामगिरीची आव्हाने आणि 7 दशके यांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की विध्वंसक आणि विपर्यास करणाऱ्या शक्तींविरुद्ध सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. “कठीण परिस्थितीतही नवनवीन शोध घेण्याची ताकद भारताकडे आहे, सौराष्ट्र आणि तामिळनाडूचा सामायिक इतिहास आपल्याला याची खात्री देतो.” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी सोमनाथवरील हल्ला आणि याचा परिणाम म्हणून अनेक स्थानिक लोक तामिळनाडूमध्ये स्थलांतरित झाल्याची आठवण करून दिली. देशाच्या एका भागातून दुस-या भागात स्थलांतर करणाऱ्या लोकांनी नवीन भाषा, नवे लोक आणि नवे पर्यावरण याची कधीही चिंता केली नाही, असे ते म्हणाले. लोक आपला विश्वास आणि अस्मिता जपण्यासाठी मोठ्या संख्येने सौराष्ट्रातून तामिळनाडूमध्ये स्थलांतरित झाले आणि तामिळनाडूच्या लोकांनी त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले आणि त्यांना नवीन जीवनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, यांचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या उक्तीचे यापेक्षा मोठे आणि उदात्त उदाहरण काय असू शकते?”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
थोर संत थिरुवल्लावार यांचे विचार उद्धृत करून पंतप्रधान म्हणाले की, जे आपल्या घरात इतरांचे आनंदाने स्वागत करतात, त्यांनाच आनंद, समृद्धी आणि भाग्य लाभते. सामंजस्य बाळगून आणि सांस्कृतिक संघर्ष टाळण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी जोर दिला. “आम्हाला संघर्ष पुढे नेण्याची गरज नाही, तर संगम आणि समागम पुढे न्यावे लागतील. आम्हाला मतभेद शोधायचे नाहीत, आम्हाला भावनिक संबंध जोडायचे आहेत”, असे त्यांनी सांगितले. तमिळनाडूमध्ये स्थायिक होण्यासाठी आलेल्या सौराष्ट्र वंशाच्या लोकांचे तामिळ जनतेन स्वागत केले, असे पंतप्रधानांनी तामिळ जनतेच्या चांगूलपणाचे वर्णन करताना सांगितले. सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशकतेने वाटचाल करणारी भारताची अजरामर परंपरा तमिळ संस्कृती अंगीकारणाऱ्यांनी दाखवून दिली, पण त्याचबरोबर ते सौराष्ट्रातील भाषा, खाद्यपदार्थ आणि चालीरीतीही विसरले नाहीत असे ते म्हणाले. आपल्या पूर्वजांचे योगदान कर्तव्याच्या भावनेने पुढे नेले जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. स्थानिक स्तराप्रमाणेच देशाच्या विविध भागातील लोकांना आपल्याकडे आमंत्रित करून त्यांना भारत जगण्याची आणि श्वास घेण्याची संधी द्या, असे आवाहन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात केले. सौराष्ट्र तमिळ संगमम हा या दिशेने एक ऐतिहासिक उपक्रम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पार्श्वभूमी
देशाच्या विविध भागांतील लोकांमधील ऐतिहासिक दुवे शोधून काढणाऱ्या आणि त्यांच्यात पुन्हा मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणार्या यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारतच्या भावनेला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानूसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन, याआधी काशी तमिळ संगमम आयोजित करण्यात आला होता, आणि आता गुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील सामायिक संस्कृती आणि वारसा साजरा करण्याच्या उद्देशाने सौराष्ट्र तमिळ संगम आयोजित करुन पंतप्रधानांचा दृष्टिकोन पुढे नेला जात आहे.
अनेक शतकांपूर्वी सौराष्ट्र प्रदेशातून अनेक लोक तामिळनाडूत स्थलांतरित झाले होते. सौराष्ट्र तमिळ संगममने सौराष्ट्रीय तमिळांना त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडण्याची संधी दिली. 10 दिवस चाललेल्या या संगमाद्वारे 3000 हून अधिक सौराष्ट्रीय तामिळ लोकांनी विशेष रेल्वेमधून सोमनाथला भेट दिली. या उपक्रमाचा प्रारंभ 17 एप्रिल रोजी झाला होता, तर त्याचा समारोप सोहळा 26 एप्रिल रोजी सोमनाथ येथे होणार आहे.
आज आजादी के अमृतकाल में हम सौराष्ट्र-तमिल संगमम् जैसे सांस्कृतिक आयोजनों की एक नई परंपरा के गवाह बन रहे हैं। pic.twitter.com/YEybyX7sZb
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
भारत विविधता को विशेषता के रूप में जीने वाला देश है। pic.twitter.com/xcU41P34xD
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
देश ने अपनी ‘विरासत पर गर्व’ के ‘पंच प्राण’ का आवाहन किया है। pic.twitter.com/fWfJka9Dqu
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
भारत कठिन से कठिन हालातों में भी कुछ नया करने की ताकत रखता है। pic.twitter.com/iVHtCgemJ4
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
भारत की अमर परंपरा है - सबको साथ लेकर समावेश के साथ आगे बढ़ने की, सबको स्वीकार करके आगे बढ़ने की। pic.twitter.com/LIJzKnlpwL
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023