पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले.विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना त्यांनी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले नवनियुक्त भारत सरकारच्या अंतर्गत विविध पदांवर/ हुद्द्यांवर जसे की ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर ड्रॉफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस, इत्यादी विविध पदांवर रुजू होतील. विविध सरकारी विभागांमधील नवनियुक्त कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमाद्वारे, स्वयं प्रशिक्षण घेऊ शकतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान 45 ठिकाणे मेळ्याशी जोडली गेली होती.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी बैसाखीच्या पावन प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. नियुक्तीपत्र मिळाल्याबद्दल त्यांनी उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी तरुणांच्या कलागुणांना आणि उर्जेला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी नोंदवली. एनडीए शासित राज्यांमध्ये गुजरात ते आसाम आणि उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र या राज्यांमध्ये सरकारी भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की कालच मध्य प्रदेशात 22,000 हून अधिक शिक्षकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. "हा रोजगार मेळा देशाच्या तरुणांप्रति असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे."
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, मंदी आणि महामारीच्या जागतिक आव्हानांमध्ये जग भारताकडे एक उज्ज्वल स्थान म्हणून पाहत आहे. "नवीन शक्यतांची द्वारे खुली करणाऱ्या धोरणे आणि रणनीतींसह आजच्या नवीन भारताची वाटचाल सुरू आहे ”, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, 2014 नंतर भारताने पूर्वीच्या प्रतिक्रियात्मक भूमिकेच्या विरोधात एक सक्रिय दृष्टीकोन स्वीकारला. “याचा परिणाम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की भारतात याआधी अशक्य वाटणाऱ्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी 21 व्या शतकातील तिसऱ्या दशकात शक्य झाल्या आहेत”. तरुणांना अशी क्षेत्रे गवसत आहेत जी दहा वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती,” पंतप्रधान म्हणाले. स्टार्टअप्स आणि भारतीय तरुणांच्या उत्साहाची उदाहरणे देताना, पंतप्रधानांनी एका अहवालाचा संदर्भ दिला ज्यामध्ये स्टार्टअप्सने 40 लाखांहून अधिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्याचे म्हटले आहे पंतप्रधानांनी रोजगाराचे नवे मार्ग खुले करणारी क्षेत्रे म्हणून ड्रोन्स आणि क्रीडा या क्षेत्रांचा देखील उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले, “आत्मनिर्भर भारत अभियानाचा विचार आणि दृष्टीकोन स्वदेशी आणि ‘व्होकल फॉर लोकल’यांचा स्वीकार करण्याच्याही पलीकडचा आहे. आत्मनिर्भर अभियान हे देशाच्या ग्रामीण ते शहरी भागांतून करोडो रोजगारसंधी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु केलेले अभियान आहे.” यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी पद्धतीने निर्मित आधुनिक उपग्रह आणि निम-वेगवान गाड्यांचे उदाहरण दिले. गेल्या 8-9 वर्षांमध्ये भारतात 30,000 हून अधिक एलएचबी प्रकारच्या रेल्वे डब्यांचे उत्पादन करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. या डब्यांच्या निर्मिती कार्यात वापरलेले तंत्रज्ञान तसेच कच्चा माल यांच्यामुळे भारतात हजारो रोजगार निर्माण झाले असे ते म्हणाले.
भारतातील खेळणी उद्योगाचे उदाहरण देत पंतप्रधानांनी असा उल्लेख केला की गेल्या काही दशकांच्या काळात भारतातील लहान मुलांनी खेळण्यासाठी केवळ आयात केलेली खेळणीच वापरली आहेत. या खेळण्यांचा दर्जा तर चांगला नव्हताच पण त्यांची रचना करताना भारतीय मुलांच्या गरजा देखील ध्यानात घेण्यात आल्या नव्हत्या असे देखील त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने, देशात आयात होणाऱ्या खेळण्यांच्या दर्जाच्या बाबतीत ठराविक मानके आखली तसेच भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यास देखील सुरुवात केली अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतातील खेळणी निर्मिती उद्योगांचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून गेला आणि या उद्योगाने असंख्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावली.
भारतात संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या साधनांची केवळ आयात केली जाऊ शकते या अनेक दशकांपासून प्रचलित असलेल्या मानसिकतेला विरोध करत पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की सरकारने स्वदेशी उत्पादकांवर विश्वास ठेवून हा पूर्वीचा दृष्टीकोन बदलून टाकला. ते म्हणाले की या प्रयत्नांमुळे केवळ भारतात निर्मिती होऊ शकणाऱ्या 300 संरक्षण विषयक साधने आणि शस्त्रांची सूची तयार करण्यात सशस्त्र दलांनी यश मिळवले. आता देशाने सुमारे 15,000 कोटी रुपये मूल्याच्या संरक्षण विषयक साधनांची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
गेल्या काही वर्षांत, मोबाईल फोन निर्मिती क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रयत्नांचा देखील पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, स्थानिक पातळीवरील मोबाईल निर्मितीला प्रोत्साहन देऊन तसेच त्यासाठी मदत अनुदानाची सोय करून भारताने मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत केली आहे कारण आता भारत मोबाईल फोनची देशांतर्गत मागणी पूर्ण करून त्यांची निर्यात देखील करु लागला आहे.
पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीच्या रोजगार निर्मिती प्रक्रियेत असलेल्या भूमिकेवर देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना अधिक भर दिला. रस्ते, रेल्वे, बंदरे आणि इमारती यांसारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणी म्हणजेच भांडवली खर्चावर भर असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या उभारणीत असलेल्या रोजगार निर्मितीच्या क्षमतेचा ठळक उल्लेख करत ते म्हणाले की सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात भांडवली खर्च चौपटीने वाढला आहे.
वर्ष 2014 पूर्वी आणि नंतर देशात झालेल्या विकासकामांचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय रेल्वेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 2014 पूर्वीच्या सात दशकांमध्ये केवळ 20,000 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले तर गेल्या 9 वर्षांमध्ये 40,000 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले. 2014 पूर्वी दर महिन्याला 600 मीटर्स लांबीच्या मेट्रो रेल्वे मार्गांच्या उभारणीचे काम होत असे, आता मात्र दर महिन्याला 6 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या उभारणी काम होत आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, 2014 च्या आधीच्या काळात देशात गॅसच्या सुविधेचे जाळे केवळ 70 जिल्ह्यांपुरते मर्यादित होते, तर आजघडीला 630 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रामीण भागात बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या लांबीबाबत बोलताना पंतप्रधानांनी, 2014 पूर्वी ग्रामीण भागात 4 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले होते तर 2014 नंतर त्याचा विस्तार 7 लाख किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे या बाबीकडे निर्देश केला.
हवाई उड्डाण क्षेत्राबाबत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वर्ष 2014 मध्ये देशात 74 विमानतळ कार्यरत होते, या संख्येत वाढ होऊन आज देशात 148 विमानतळ कार्यरत आहेत. विमानतळ परिचालन क्षेत्रामध्ये असलेल्या रोजगार क्षमतेकडे देखील पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले.
एअर इंडियाने विमानांसाठी नोंदवलेली विक्रमी मागणी आणि इतर काही कंपन्यांच्या अशा स्वरूपाच्या योजनांचा देखील त्यांनी उल्लेख केला. पूर्वीच्या तुलनेत माल हाताळणी दुप्पट झाली आहे आणि वाहतुकीचा वेळ निम्म्याने कमी झाला आहे, त्यामुळे बंदरे क्षेत्रातही अशीच प्रगती होत असल्याचे ते म्हणाले. हा विकास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की 2014 पूर्वी देशात 400 पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती, आज 660 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्याचप्रमाणे, पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा 2014 मध्ये 50 हजारांवरून 1 लाखांच्या वर नेण्यात आल्या आहेत आणि या वैद्यकीय महाविद्यालयांमधून आज पूर्वीच्या तुलनेत दुपटीहून अधिक डॉक्टर पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात एफपीओ आणि बचत गटांना लाखो कोटींची मदत मिळत आहे, साठवण क्षमता वाढवली जात आहे, 2014 नंतर 3 लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत, 6 लाख किलोमीटरहून अधिक ऑप्टिकल फायबरचे जाळे गावांमध्ये टाकण्यात आले आहे, पीएम आवास योजने (PMAY) अंतर्गत 3 कोटी घरांपैकी 2.5 कोटी पेक्षा जास्त घरे गावांमध्ये बांधण्यात आली आहेत, 10 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली, 1.5 लाखांहून अधिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आणि कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढवण्यात आले आहे. “या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत”, ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी वाढती उद्योजकता आणि छोट्या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या पाठबळाचाही उल्लेख केला. त्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उल्लेख केला, जिने नुकतीच आठ वर्षे पूर्ण केली आहेत. या योजने अंतर्गत 23 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याची तारणरहित कर्जे वितरित करण्यात आली असून, योजनेच्या 70 टक्क्यांहून अधिक लाभार्थी, या महिला आहेत. “या योजनेमुळे 8 कोटी नवीन उद्योजक निर्माण झाले आहेत. हे असे लोक आहेत ज्यांनी मुद्रा योजनेच्या मदतीने पहिल्यांदाच आपला व्यवसाय सुरू केला आहे,” पंतप्रधान म्हणाले. तळागाळातील अर्थव्यवस्थेला उर्जा देणाऱ्या सूक्ष्म-वित्त सहाय्याचे सामर्थ्यही त्यांनी अधोरेखित केले.
आज ज्यांना त्यांची नियुक्ती पत्रे मिळाली आहेत त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचे ध्येय घेऊन देश पुढे जात असताना, देशाच्या विकासामध्ये योगदान देण्याची हीच संधी आहे. “आज एक सरकारी सेवक म्हणून तुम्ही आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहात, या प्रवासात तुम्ही अशा गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात, ज्याची जाणीव तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून झाली होती”, पंतप्रधान म्हणाले.
नव-नियुक्तांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हे अधोरेखित केले की आता इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. “तुमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या कामातून सामान्य माणसाच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पाडेल”, ते म्हणाले.
आपल्या कामावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जावेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नव-नियुक्तांना त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला विराम न देण्याचे आवाहन केले, आणि ते म्हणाले की काहीतरी नवीन जाणून घेण्याच्या किंवा शिकण्याच्या प्रवृत्तीचे प्रतिबिंब, काम आणि व्यक्तिमत्त्व या दोन्हीमध्ये दिसून येते. ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म iGoT कर्मयोगीमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपली कौशल्ये आणखी सुधारावीत अशी सूचनाही त्यांनी दिली.
पार्श्वभूमी
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळा यापुढील रोजगार निर्मितीला गती देणारा ठरेल, आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागी होण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा आहे.
Our government is committed to give the right opportunities to the talent and energy of youth to fulfill the vision of a developed India. pic.twitter.com/1Of7N73Vr0
— PMO India (@PMOIndia) April 13, 2023
आज भारत, दुनिया की सबसे तेज रफ्तार से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है। pic.twitter.com/x5vlp0TB5u
— PMO India (@PMOIndia) April 13, 2023
आज का नया भारत, अब जिस नई नीति और रणनाति पर चल रहा है, उसने देश में नई संभावनाओं और नए अवसरों के द्वार खोल दिए हैं। pic.twitter.com/NXbPOCEvTs
— PMO India (@PMOIndia) April 13, 2023
The scope of 'Aatmanirbhar Bharat Abhiyan' goes beyond 'Vocal for Local.'
— PMO India (@PMOIndia) April 13, 2023
It is helping create new opportunities for the talented youth. pic.twitter.com/3H0Cto5kkq