आजच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. कोरोना विरुद्ध देशाच्या लढाईला आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या काळात भारतीयांनी कोरोनाचा ज्याप्रकारे सामना केला आहे, जगभरात त्याची उदाहरण म्हणून चर्चा होत आहे. लोक ते उदाहरण म्हणून सादर करतात. आज भारतात 96 टक्क्यांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्युदराच्या बाबतीतही भारत जगात त्या देशांच्या यादीत आहे जिथे हा दर सर्वात कमी आहे.
देश आणि जगातली कोरोनाची स्थिति मांडताना इथे जे सादरीकरण करण्यात आले, त्यातूनही अनेक महत्वपूर्ण पैलू समोर आले आहेत. जगातील बहुतांश कोरोना प्रभावित देश असे आहेत , ज्यांना कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना करावा लागला आहे. आपल्या देशातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर अचानक वाढ व्हायला लागली आहे. तुम्ही सगळे याकडे लक्ष देत आहात , मात्र तरीही काही राज्यांचा उल्लेख झाला, उदा महाराष्ट्र , पंजाब ; तुम्ही मुख्यमंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली आहे, केवळ मी सांगतो आहे असे नाही. आणि विशेष चिंता तुम्ही करत देखील आहात आणि करण्याची गरज देखील आहे. आपण हे देखील पाहत आहोत की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात रुग्ण सकारात्मकता दर खूप जास्त आहे. आणि नवीन रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.
यावेळी असे अनेक विभाग, अनेक जिल्ह्यांमध्ये ही वाढ दिसून येत आहे, जे आतापर्यन्त स्वतःला यापासून दूर ठेवत होते. एक प्रकारे सुरक्षित क्षेत्र होते, आता तिथे आपल्याला काही गोष्टी आढळून येत आहेत. देशातील सत्तर जिल्ह्यांमध्ये तर गेल्या काही आठवड्यांमध्ये ही वाढ 150 टक्क्यांहून अधिक आहे. जर आपण या वाढत्या महामारीला इथेच रोखले नाही तर देशव्यापी प्रादुर्भावाची स्थिति उद्भवू शकते. आपल्याला कोरोनाची ही दुसरी लाट त्वरित थोपवावीच लागेल. आणि यासाठी आपल्याला वेगाने आणि निर्णायक पावले उचलावी लागतील. अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे की मास्कच्या वापरा संदर्भात आता स्थानिक प्रशासनाकडून देखील तेवढे गांभीर्याने घेतले जात नाही. माझी विनंती आहे की स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या बाबतीत ज्या काही अडचणी आहेत, त्यांचे विश्लेषण, त्यांचा आढावा घेणे आणि त्या अडचणी दूर करणे हे सद्यस्थितीत खूप गरजेचे आहे असे मला वाटते.
हा मंथनाचा विषय आहे की काही क्षेत्रांमध्येच चाचण्या कमी प्रमाणात का होत आहेत? अशा क्षेत्रांमध्येच लसीकरण देखील का कमी प्रमाणात होत आहे ? मला वाटते की हा सुशासनाच्या कसोटीचा देखील काळ आहे. कोरोना विरुद्ध लढाईत आपण आज जिथवर पोहचलो आहोत, त्यात आणि त्यामधून जो आत्मविश्वास मिळाला आहे, तो आत्मविश्वास, आपला विश्वास फाजील आत्मविश्वास ठरू नये , आपले हे यश बेपर्वाईत बदलता कामा नये. आपल्याला जनतेला घाबरून सोडायचे नाही. भीतीचे साम्राज्य पसरेल अशी स्थिति देखील आणायची नाही आणि त्याचबरोबर सावधानता बाळगत काही बाबतीत पुढाकार घेऊन आपल्याला जनतेला या त्रासापासून मुक्ती देखील मिळवून द्यायची आहे.
आपल्या प्रयत्नांना आपल्या जुन्या अनुभवांची जोड देत धोरण आखावे लागेल. प्रत्येक राज्याचे आपापले प्रयोग आहेत, चांगले प्रयोग आहेत , उत्तम उपक्रम आहेत , अनेक राज्ये इतर राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत देखील आहेत. मात्र आता एका वर्षात आपली सरकारी यंत्रणा , त्यांना अशा स्थितीत खालच्या स्तरापर्यंत कसे काम करायचे याचे जवळपास प्रशिक्षण मिळाले आहे. आता आपण अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. जिथे आवश्यक असेल तिथे .. आणि हे मी आग्रहपूर्वक सांगत आहे ...सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्याचा पर्याय देखील आहे, कुठल्याही परिस्थितीत ढिलाई नको, यावर निग्रहाने काम करायला हवे. जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या महामारी प्रतिसाद दलांना "प्रतिबंध आणि देखरेख मानक कार्यप्रणाली " पुन्हा नव्याने आणण्याची गरज भासत असेल तर ते देखील करायला हवे. पुन्हा एकदा चार तास, सहा तास बसून चर्चा व्हावी, प्रत्येक स्तरावर चर्चा व्हायला हवी. जनजागृती देखील करू, जुन्या गोष्टींचे स्मरण करून देऊ आणि गती देखील आणू. आणि त्याचबरोबर 'टेस्ट, ट्रैक आणि ट्रीट' या संदर्भात देखील आपण तितकेच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे जसे आपण गेले वर्षभर करत आहोत. प्रत्येक संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा कमीत कमी वेळेत शोध घेणे आणि RT-PCR चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर ठेवणे खूप महत्वपूर्ण आहे.
आपण हे देखील पाहत आहोत की अनेक राज्यांमध्ये रॅपिड एंटीजेन टेस्टिंग वरच अधिक भर दिला जात आहे.. त्याच भरवशावर गाडी चालली आहे. जसे केरळ आहे, ओदिशा आहे, छत्तीसगढ़ आहे आणि उत्तर प्रदेश आहे. मला वाटते हे खूप लवकर बदलायला हवे. या सर्व राज्यांमध्ये, माझी तर इच्छा आहे देशातील सर्वच राज्यांमध्ये आपल्याला RT-PCR चाचणी आणखी वाढवण्यावर भर द्यावा लागेल. एक गोष्ट ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे यावेळी आपली श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरे जी सुरुवातीला प्रभावित झाली नव्हती , त्याच्या आसपासचा परिसर अधिक प्रभावित होताना दिसत आहे. हे पहा, या लढाईत आपण यशस्वीपणे वाचू शकलो आहोत त्याचे एक कारण होते की आपण गा गावांना यापासून मुक्त ठेवू शकलो होतो. मात्र आता श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरात पोहचला आहे तर तो गावात पसरायला वेळ लागणार नाही. गावांना सांभाळणे .... यासाठी आपली यंत्रणा खूप कमी पडेल. आणि म्हणूनच आपल्याला छोट्या शहरांमध्ये चाचण्या वाढवाव्या लागतील.
आपल्याला छोट्या शहरांमध्ये "रेफरल सिस्टम" आणि "एम्बुलेंस नेटवर्क" वर विशेष लक्ष द्यावे लागेल. सादरीकरणात ही गोष्ट देखील मांडण्यात आली की आता विषाणूचा प्रसार विखुरलेल्या स्थितीत होत आहे. याचे खूप मोठे कारण हे देखील आहे की आता देश फिरण्यासाठी खुला आहे, परदेशातून आलेल्यांची संख्या देखील वाढली आहे. म्हणूनच आज प्रत्येक रुग्णाच्या प्रवासाची, त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती सर्व राज्यांनी आपापसात सामायिक करणे देखील आवश्यक बनले आहे. परस्परांमध्ये माहिती सामायिक करण्यासाठी एखाद्या नव्या यंत्रणेची गरज असेल तर त्यावर देखील विचार व्हायला हवा. त्याचप्रमाणे, परदेशातून येणारे प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या देखरेखीसाठी प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन करण्याची जबाबदारी देखील वाढली आहे. आता आपल्यासमोर कोरोना विषाणूचे mutants ओळखण्याचा आणि त्याच्या प्रभावाचे विश्लेषण करण्याचा देखील प्रश्न आहे. तुमच्या राज्यांमध्ये तुम्हाला विषाणूच्या प्रकाराची माहिती व्हावी यासाठी जीनोम सैंपल देखील चाचणीसाठी पाठवणे तेवढेच महत्वपूर्ण आहे.
मित्रांनो,
लसीकरण अभियानाबाबत अनेक सहकाऱ्यांनी आपली मते मांडली . निश्चितपणे या लढाईत आता एक वर्षानंतर आपल्या हातात लसीचे हत्यार आले आहे, हे प्रभावी हत्यार आहे. देशात लसीकरणाचा वेग निरंतर वाढत आहे. आपण एका दिवसात 30 लाख लोकांचे लसीकरण करण्याचा टप्पा एकदा तर पार केलाच आहे. मात्र त्याचबरोबर आपल्याला लसीच्या मात्रा वाया जाण्याच्या समस्येकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात 10 टक्क्यांपेक्षा जास्त लस वाया गेली आहे. उत्तरप्रदेश मध्ये देखील लस वाया जाण्याचे प्रमाण जवळजवळ एवढेच आहे. लस का वाया जातेय याबाबत राज्यांनी समीक्षा करणे गरजेचे आहे. दररोज संध्याकाळी या लसींच्या साठ्याचा आढावा घेण्यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे असे मला वाटते आणि आमच्या प्रणालीतील सक्रीय लोकांशी संपर्क साधून एकावेळी अधिकाधील लोकं लस घेण्यासाठी उपस्थित राहतील जेणेकरून लस वाया जाणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे. कारण जेवढ्या लसी वाया जातील आपण तितकाच कोणाचा तरी आपण हक्क नाकारत आहोत. कोणाचा हक्क नाकारण्याचा अधिकार आपल्याला नाही.
स्थानिक पातळीवर नियोजन आणि कारभारामधील त्रुटींमध्ये त्वरित सुधारणा केली पाहिजे. लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करायला हवे , राज्यांनी तर शून्य लस वाया जाण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यापासून कामाला सुरुवात करावी अशी माझी इच्छा आहे… आम्ही लस वाया जाऊ देणार नाही. एकदा प्रयत्न केला तर नक्कीच सुधारणा होईल. यामुळे आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कामगार आणि इतर पात्र लोकांपर्यंत लसीच्या दोन्ही मात्रा पोहचविण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या या सामूहिक प्रयत्नांचा आणि धोरणांचा परिणाम आपल्याला लवकरच दिसून येईल याचा मला विश्वास आहे.
शेवटी मला काही मुद्दे पुन्हा एकदा सांगायचे आहेत जेणेकरुन आपण सर्वजण या विषयांकडे लक्ष देऊ आणि पुढे जाऊ. एक मंत्र जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा –“दवाई भी और कडाई भी”. औषध घेतले म्हणजे आजार नाहीसा झाला असे नाही. समजा एखाद्याला सर्दी झाली आहे आणि त्याने त्यासाठी औषध घेतले तर याचा अर्थ असा होत नाही की त्याने योग्य काळजी न घेता लोकरीचे कपडे न घालता थंड ठिकाणी जावे, पावसात भिजण्यासाठी जावे. ठीक आहे, तुम्ही औषध घेतले पण तुम्हाला बाकीच्या गोष्टींची देखील काळजी घ्यावी लागेल. हा आरोग्याचा नियम आहे आणि तो फक्त याच आजारासाठी नाही तर प्रत्येक आजारासाठी लागू होतो. आपल्याकडे टायफाइड असल्यास ... हे सर्व झाले आहे, तरीही डॉक्टर म्हणतात की या गोष्टी खाऊ नका. ती तशीच आहे. आणि म्हणूनच मला वाटते की लोकांना अशा सामान्य गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. आणि म्हणूनच “दवाई भी और कडाई भी,” याविषयी लोकांना पुन्हा पुन्हा सांगा.
दुसरा विषय म्हणजे, नवीन रुग्णांची ओळख त्वरित पटण्यासाठी RT-PCR चाचण्यांचे प्रमाण वाढविणे अत्यावश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म (लहान) प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करण्याच्या दिशेने युद्ध पातळीवर काम केले पाहिजे. त्यांनी अशा क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित केले तर आपण यावर जलद गतीने नियंत्रण मिळवू जेणेकरून संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी याची मदत होईल. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे, खाजगी असो, सरकरी असो, तुम्ही नकाशावर पहिलेच असेल की ते तुमच्यासाठी राज्यनिहाय तयार केले आहेत. तुम्ही सुरुवातीला जो हिरवा बिंदू पाहिला आणि तो पाहताच तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की असे खूप विभाग आहेत जिथे हिरवी लाईट लागतेय, याचाच अर्थ असा की या ठिकाणी लसीकरण केंद्रांची संख्या कमी आहे किंवा तिथे लसीकरण केंद्र कार्यरत नाहीत. या सगळ्यात आपल्याला तंत्रज्ञान खूप मदत करत आहे. आपण अगदी सहजगत्या दैनंदिन गोष्टींचे व्यवस्थापन करू शकतो. याचा आपल्याला लाभ तर घ्यायचाच आहे परंतु याच्या आधारे आपल्याला सुधारणा देखील करायच्या आहेत. आपली जितकी केंद्रे सक्रीय असतील, मिशन-मोडवर काम करतील तेवढ्या कमी लसी वाया जातील, आकडा वाढेल आणि विश्वास देखील वृद्धिंगत होईल. ही व्यवस्था अधिक मजबूत केली पाहिजे असे मला वाटते.
तसेच, लसीचे उत्पादन सतत सुरु असल्याने आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि यातून जेवढे लवकर बाहेर पडू तितके चांगले आहे. अन्यथा हे सर्व एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे असेच चालू राहील. एक मुद्दा म्हणजे लसीची मुदत संपण्याची तारीख. ज्याचे उत्पादन आधी झाले आहे ते आधी वापरले पाहिजे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे; ज्याचे उत्पादन नंतर झाले आहे ते नंतर वापरले पाहिजे. जर आपण नंतर उत्पादन केलेली लस आधी वापरली तर लस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असेल. आणि म्हणूनच मला असे वाटते की आपण टाळण्यायोग्य अपव्यय टाळले पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या लसीच्या साठ्याची वापराची मुदत आपल्याला माहित असणे गरजेचे आहे, त्यानुसार आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. आणि या सर्व गोष्टींसह, या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी या मूलभूत उपाययोजनांसोबतच जसे मी नेहमी सांगतो, ‘’दवाई भी और कड़ाई भी.” मास्क घालायचा आहे, सहा फुट अंतर राखायचे आहे, स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे, मग ती वैयक्तिक स्वच्छता असो किंवा सामाजिक स्वच्छता यावर पूर्णपणे जोर द्यावा लागेल. गेल्या एक वर्षापासून ज्या उपाययोजन आम्ही करत आहोत त्यांना पुन्हा एकदा जोर देण्याची गरज आहे. या सगळ्याचा पुन्हा एकदा आग्रह करण्याची वेळ आली आहे, यासाठी सक्ती करावी लागली तरी चालेल. जसे आमचे कॅप्टन म्हणत होते की आम्ही कालपासून मोठ्या प्रमाणात सक्ती सुरु केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. मला वाटते की आपण सर्वांनी या सगळ्याचा सामना हिमतीने केला पाहिजे.
मला खात्री आहे की या विषयांबाबत लोकांमध्ये असणारी जागरूकता कायम ठेवण्यात आम्हाला यश मिळेल. तुम्ही केलेल्या सूचनांसाठी मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. तुम्हाला जर आणखी काही सूचना करायच्या असतील तर त्या तुम्ही नक्की करू शकता. आज रुग्णालया संदर्भात जी चर्चा झाली आहे त्यासंदर्भात तुम्ही दोन-चार तासात मला सर्व माहिती द्या म्हणजे संध्याकाळी सहा-सात वाजेपर्यंत मी माझ्या विभागाच्या लोकांसमवेत यासंदर्भात चर्चा करून जर काही अडथळे असतील तर ते त्वरित दूर करण्यासाठी काही आवश्यक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्यास आरोग्य मंत्रालय त्या दृष्टीने पावले उचलेल. मी देखील त्यामध्ये लक्ष देईल. आपण आतापर्यंत जी लढाई जिंकली आहे, त्यामध्ये सर्वांचे सहकार्य आहे, आमच्या प्रत्येक कोरोन योद्धयाचे सहकार्य आहे, जनतेने देखील खूप सहकार्य केले आहे. यासाठी आम्हाला जनतेबरोबर संघर्ष करावा लागला नाही. आम्ही जे काही सांगितले त्यावर लोकांनी विश्वास ठेवला, जनतेने पाठिंबा दर्शविला आहे आणि 130 कोटी देशवासियांच्या जागरूकतेमुळे, 130 कोटी नागरिकांच्या सहकार्यामुळे भारत विजयी होत आहे. आता देखील या विषयी आपण जनतेला जेवढे यासगळ्यामध्ये सहभागी करून घेऊ, त्यांना याची माहिती देऊ, मला विश्वास आहे की आता जे काही नकारात्मक बदल दिसून येत आहेत त्या सगळ्याला यामुळे आळा घालण्यात आपण यशस्वी होऊ. आपण रुग्ण संख्या कमी करण्यात पुन्हा एकदा यशस्वी होऊ यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही सर्वांनी खूप परिश्रम घेतले आहेत, तुमच्याकडे यासाठी कौशल्य पथक तयार आहे. हळूहळू दिवसातून एक ते दोन वेळा त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात करा, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बैठका घ्या, गोष्टी आपोआप सुरुळीत होतील.
मी ही बैठक आयोजित केल्यानंतर इतक्या कमी वेळात तुम्हाला सूचित केल्यानंतर तुम्ही या बैठकीसाठी आपल्या अमुल्य वेळ दिला आणि मला सविस्तर माहिती दिली यासाठी मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.
खूप खूप धन्यवाद!!