माझे प्रिय मित्र स्कॉट, नमस्कार!
होळीच्या सणासाठी आणि निवडणुकीतील विजयासाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी तुमचा आभारी आहे.
क्वीन्सलँड आणि न्यू साउथ वेल्समधील पुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो.
आपल्या मागील आभासी शिखर परिषदे दरम्यान, आपण आपले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले. आणि मला आनंद आहे की, आज आपण दोन्ही देशांदरम्यान वार्षिक शिखर परिषदेची यंत्रणा स्थापन करत आहोत. यामुळे आपल्या संबंधांच्या नियमित आढाव्याची रचनात्मक यंत्रणा तयार होऊ शकेल.
महामहीम,
गेल्या काही वर्षांत आमच्या संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, शिक्षण आणि नवसंशोधन , विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये आपले निकटचे सहकार्य आहे. महत्वपूर्ण खनिजे, जल व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा आणि कोविड-19 संशोधन यासारख्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य वेगाने वाढले आहे.
बंगळुरूमध्ये महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान धोरणासाठी सर्वोत्कृष्ट केंद्र स्थापनेच्या घोषणेचे मी मनापासून स्वागत करतो. सायबर तसेच महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये आपल्यात चांगले सहकार्य असणे अत्यावश्यक आहे. या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये योग्य जागतिक मानकांचा अवलंब ही आपल्यासारख्या समान तत्वे असलेल्या देशांची जबाबदारी आहे.
महामहीम,
आपला सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार - "CECA", यावर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, मला देखील सांगायचे आहे की फार कमी कालावधीत उल्लेखनीय प्रगती झाली आहे. उर्वरित मुद्द्यांवरही लवकरच सहमती होईल, असा मला विश्वास आहे. "CECA" लवकर पूर्ण होणे हे आपले आर्थिक संबंध, आर्थिक पुनरुज्जीवन आणि आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
क्वाडमध्येही आपल्यात चांगले सहकार्य आहे. आपले सहकार्य खुल्या , मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आपली वचनबद्धता दर्शवते. प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी क्वाडचे यश अत्यंत महत्त्वाचे आहे.
महामहीम,
प्राचीन भारतीय कलाकृती परत करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी विशेषतः तुमचे आभार मानू इच्छितो. आणि तुम्ही पाठवलेल्या कलाकृतींमध्ये राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच इतर अनेक भारतीय राज्यांमधून अवैधरित्या तस्करी केलेल्या शेकडो वर्षे जुन्या मूर्ती आणि चित्रांचा समावेश आहे. आणि यासाठी मी सर्व भारतीयांच्या वतीने तुमचे विशेष आभार मानतो. आता तुम्ही आम्हाला दिलेल्या सर्व मूर्ती आणि इतर कलाकृती त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवल्या जातील. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. शनिवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली असली तरी स्पर्धा अजून संपलेली नाही. दोन्ही देशांच्या संघांना माझ्या शुभेच्छा.
महामहीम,
पुन्हा एकदा, आज तुमच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो.
आता मी माध्यमातील मित्रांचे आभार मानून या खुल्या सत्राचा शेवट करतो. यानंतर, काही क्षणांच्या विरामानंतर, मी पुढील विषयपत्रिकेवर माझे विचार मांडेन.