जी-20 समूह सदस्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
यावेळी पंतप्रधानांनी, जी-20 अध्यक्षपदासाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी संकल्पना भारताने का निवडली हे अधोरेखित केले. ही संकल्पना वैश्विक पातळीवरील उद्दिष्टे आणि कृती या दोन्हीसाठी एकत्र येण्याची गरज दर्शवणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या या बैठकीतून सामाईक आणि ठोस उद्दिष्टांसाठी एकत्रित येण्याची भावनाच व्यक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज जगात, बहूराष्ट्रीयत्वाचे तत्व संकटात आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धोत्तर काळानंतर जागतिक नियामक संस्थांच्या संस्थापकांनी दोन महत्वाची कार्ये करणे अपेक्षित होते. त्यातील पहिले कार्य म्हणजे, स्पर्धात्मक हितसंबंधात समतोल राखून, भविष्यातील युद्धे रोखणे आणि दुसरे कार्य म्हणजे, सामाईक हितांच्या मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोपासना करणे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जगात जे वित्तीय संकट, हवामान बदलाचे संकट, महामारी, दहशतवाद आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, ती बघता, असे दिसते की वर उल्लेख केलेल्या दोन्ही कार्यात या संस्था अपयशी ठरल्या. आणि या अपयशाचे सर्वाधिक वाईट परिणाम विकसनशील देशांना भोगावे लागले असून, इतक्या वर्षांच्या प्रगतीनंतरही जग आज शाश्वत विकासासाठी चाचपडते आहे. अनेक विकसनशील देश, आज आपल्या नागरिकांना अन्न आणि ऊर्जा सुरक्षा देण्याच्या प्रयत्नात, अनिश्चित कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. श्रीमंत देशांच्या धोरण आणि कृतीमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या संकटाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतो आहे. “भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात आम्ही दक्षिणेकडील देशांना आवाज देण्याचा प्रयत्न केला आहे” असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही निर्णयांचा ज्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे, अशा घटकांचा आवाज ऐकल्याशिवाय, कोणताही गट आपण जागतिक नेतृत्व करत असल्याचा दावा करु शकत नाही”
पंतप्रधानांनी हेही अधोरेखित केले की, आजची बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा जग विभागले गेले आहे आणि परराष्ट्र मंत्री म्हणून या चर्चांवर आजच्या भूराजकीय परिस्थितीचे सावट असणे स्वाभाविक आहे. “हा तणाव दूर करण्यासाठी आपणा सर्वांची आपली एक भूमिका आणि दृष्टीकोन आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, या ठिकाणी उपस्थित नसलेल्यांची जबाबदारी देखील आपल्यावर आहे, हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. “विकास, आर्थिक बळकटी, संकटांशी सामना करण्याची शक्ती, आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अन्न तसेच उर्जा सुरक्षा, या साठी संपूर्ण जग जी 20 कडे डोळे लावून बसले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. जी 20 कडे या मुद्द्यांवर एकमत घडवून आणण्याची आणि ठोस परिणाम देण्याची क्षमता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक संकटांच्या बाबतील जे मुद्दे आपण एकत्र बसून सोडवू शकतो त्यात, जे मुद्दे सोडवता येऊ शकत नाहीत त्यांचा अडथळा व्हायला नको, यावर त्यांनी भर दिला. ही बैठक गांधी आणि बुद्ध यांच्या देशात होत आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांना भारताच्या सांस्कृतिक भावनेतून प्रेरणा घेऊन, आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींकडे न बघता, ज्या गोष्टी आपल्याला एकत्र आणू शकतात, याकडे लक्ष देण्याची त्यांनी विनंती केली.
नैसर्गिक आपत्तीत गमावलेले हजारो जीव आणि जगाने बघितलेली भीषण जागतिक महामारी, आणि या कठीण काळात कोलमडून पडलेली जगतिक पुरवठा साखळी याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्या प्रकारे स्थिर अर्थव्यवस्था देखील अचानक कर्ज आणि आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडल्या, हे बघता, आता आपण आपला समाज, आपल्या अर्थव्यवस्था, आरोग्य सुविधा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, हे पंतप्रधानांनी अधोरेखीत केले. “जी 20 ला एकीकडे विकास आणि कार्यक्षमता यात योग्य समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका पार पाडायची आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम करायचे आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यासाठी, एकत्र काम करून हा समन्वय अधिक सहजतेने साधता येऊ शकेल, असे त्यांनी सुचवले.
आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी सर्वांच्या एकत्रित ज्ञान आणि क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आणि आजची बैठक महत्वाकांक्षी, सर्वसमावेशक आणि कृतीशील ठरेल, आणि सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन काही निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला.
India's theme of ‘One Earth, One Family, One Future’ for its G20 Presidency, signals the need for unity of purpose and unity of action. pic.twitter.com/ZfaRaqAUtH
— PMO India (@PMOIndia) March 2, 2023
We must all acknowledge that multilateralism is in crisis today. pic.twitter.com/5PZooUANTY
— PMO India (@PMOIndia) March 2, 2023
India’s G20 Presidency has tried to give a voice to the Global South. pic.twitter.com/lDg6gjvgxX
— PMO India (@PMOIndia) March 2, 2023
G20 has capacity to build consensus and deliver concrete results. pic.twitter.com/gKJdpvb0kF
— PMO India (@PMOIndia) March 2, 2023