महोदय,
ब्रिक्स व्यवसाय समुदायाच्या नेतेमंडळींनो,
नमस्कार.
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाऊल ठेवताच आमचा कार्यक्रम ब्रिक्स व्यवसाय मंचाने सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.
सुरुवातीला मी राष्ट्रपती रामफोसा यांचे, या बैठकीसाठी आमंत्रण दिल्याबद्दल आणि ही बैठक आयोजित केल्याबद्दल आभार मानतो.
ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे, दहाव्या वर्धापनदिनानिमित्त खूप खूप अभिनंदन करत शुभेच्छा देतो.
गेल्या दहा वर्षात ब्रिक्स व्यवसाय परिषदेने आमचे आर्थिक सहकार्य वाढवण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
2009 मध्ये जेव्हा ब्रिक्सची पहिली परिषद झाली तेव्हा जग मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर येत होते.
त्यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ब्रिक्स हा आशेचा किरण म्हणून उदयास आला.
सध्याही जग कोविड महामारी, तणाव आणि युद्ध-तंटे या वातावरणातच आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहे.
अशा वेळी ब्रिक्स देशांना पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावायची आहे.
मित्रांनो,
जागतिक अर्थव्यवस्थेत उलथापालथ होत असतानाही, भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.
भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार आहे.
येत्या काही वर्षांत भारत हे जगाचे ग्रोथ इंजिन-विकास रथ असेल यात कोणतीही शंका नाही.
याचे कारण असे की भारताने आपत्ती आणि संकटाच्या काळाचे, आर्थिक सुधारणांच्या संधींमध्ये रूपांतर केले.
गेल्या काही वर्षांत आम्ही युद्धपातळीवर केलेल्या सुधारणांमुळे भारतात व्यवसाय करण्याच्या सुलभतेत सातत्याने वाढ होत आहे.
आम्ही अनुपालनांचे ओझे कमी केले आहे.
आम्ही लाल फितीचा अडसर दूर सारुन रेड कार्पेट-लाल गालिचा अंथरत आहोत.
जीएसटी(वस्तू सेवा कर) आणि दिवाळखोरी-नादारी कायदा लागू झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
संरक्षण आणि अंतराळ यांसारखी क्षेत्रे, ज्यांच्यावर कधीकाळी बंधने होती, ती क्षेत्रे आज खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली आहेत.
सार्वजनिक सेवा पुरवठा आणि सुशासन यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
तंत्रज्ञानाच्या वापराने भारताने आर्थिक समावेशाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.
याचा सर्वाधिक फायदा आमच्या ग्रामीण महिलांना झाला आहे.
आज, एक कळ दाबल्यावर भारतातील कोट्यवधी लोकांना थेट लाभ हस्तांतरण केले जाते.
आतापर्यंत भारतात असे 360 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे हस्तांतरण झाले आहे.
यामुळे सेवा पुरवठ्यात पारदर्शकता वाढली आहे, भ्रष्टाचार आणि दलालांची लूडबूड कमी झाली आहे.
प्रति गीगाबाइट डेटासाठी कमी खर्च येणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे.
आज, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एकात्मिक अर्थ व्यवहार प्रणाली, भारतात रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत वापरली जाते.
आज भारत हा जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे.
संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, फ्रान्स सारखे देश या यू पी आय प्रणालीशी जोडले जात आहेत.
ब्रिक्स देशांसोबतही याबाबत काम करण्याच्या अनेक शक्यता आहेत.
भारतात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्यामुळे देशाचे चित्र बदलत आहे.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही पायाभूत सुविधांसाठी सुमारे 120 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे.
या गुंतवणुकीच्या माध्यमातून आम्ही भविष्यातील नव्या भारताचा भक्कम पाया रचत आहोत.
रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाई मार्ग प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत.
आज भारतात वर्षाला दहा हजार किलोमीटर वेगाने नवीन महामार्ग बांधले जात आहेत.
गेल्या 9 वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे.
गुंतवणूक आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी, आम्ही उत्पादनानुसार प्रोत्साहन योजना लागू केली आहे.
लॉजिस्टिक म्हणजेच मालवाहतुकीच्या खर्चात घट झाल्यामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे.
अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात भारत हा जगात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक आहे.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, हरीत हायड्रोजन, हरीत अमोनिया यांसारख्या क्षेत्रात भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आम्ही सक्रियपणे पावले उचलत आहोत.
यामुळे भारतात अक्षय्य तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ निर्माण होईल, हे स्वाभाविक आहे.
आज भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम अर्थात नवं उद्योग परिसंस्था आहे.
भारतात सध्या शंभरहून अधिक युनिकॉर्न्स आहेत.
आम्ही माहिती-तंत्रज्ञान(आय टी), दूरसंचार (टेलिकॉम), आर्थिक तंत्रज्ञान(फिन टेक), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि अर्धवाहक (सेमीकंडक्टर्स) या सारख्या क्षेत्रांमध्ये "मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड" अर्थात जगासाठी भारतात निर्मिती चा संकल्प पुढे नेत आहोत.
या सर्व प्रयत्नांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट सकारात्मक परिणाम झाला आहे.
गेल्या नऊ वर्षांत लोकांच्या उत्पन्नात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे.
भारताच्या आर्थिक विकासात महिलांचा मोठा सहभाग आहे.
माहिती-तंत्रज्ञान ते अंतराळ, बँकिंग ते आरोग्यसेवा, अशा सर्व क्षेत्रांत देशाच्या प्रगतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला योगदान देत आहेत.
भारतातील जनतेने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याची शपथ घेतली आहे.
मित्रांनो,
मी तुम्हा सर्वांना भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.
कोविड महासाथीने आपल्याला, लवचिक (परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या) आणि सर्वसमावेशक पुरवठा साखळीचे महत्त्व शिकवले आहे.
त्यासाठी परस्पर विश्वास आणि पारदर्शकता खूप महत्त्वाचे आहेत.
एकमेकांच्या एकत्रित सामर्थ्याच्या बळावर, आपण संपूर्ण जगाच्या, विशेषतः ग्लोबल साउथच्या (दक्षिण जग) कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.
महोदय,
मी पुन्हा एकदा ब्रिक्स व्यवसाय जगताच्या नेत्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन करतो.
या बैठकीच्या दिमाखदार आयोजनाबद्दल मी माझे मित्र, अध्यक्ष रामफोसा यांचेही आभार मानतो.
धन्यवाद!