पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये सहभाग घेतला. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी 'महामारीमुळे आलेला थकवा टाळणे आणि तयारीला प्राधान्य' या विषयावर भाषण केले.
महामारीचा सामना करण्यासाठी भारताने लोककेंद्रित धोरण स्वीकारले आहे आणि या वर्षीच्या आरोग्य क्षेत्राच्या खर्चासाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे आणि आमच्या प्रौढ लोकसंख्येपैकी सुमारे नव्वद टक्के लोकसंख्येचे आणि पन्नास दशलक्षांहून अधिक बालकांचे लसीकरण झाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
जागतिक समुदायाचा एक जबाबदार सदस्य या नात्याने, भारत इतर देशांसोबत ,कोविडवर मात करण्यासाठीचे किफायतशीर स्वदेशी तंत्रज्ञान, लस आणि उपचार पद्धती सामायिक करून सक्रिय भूमिका बजावत राहील. भारत आपल्या जिनोमिक सर्व्हिलन्स कन्सोर्टियमचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे.भारताने पारंपरिक औषधींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे आणि हे ज्ञान जगाला उपलब्ध करून देण्यासाठी, भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे,हे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
एक भक्कम आणि अधिक लवचिक जागतिक आरोग्य सुरक्षा व्यवस्था तयार करण्यासाठी पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेला बळकट करण्याचे आणि सुधारणा करण्याचे आवाहन केले.
इतर सहभागींमध्ये कार्यक्रमाचे सह आयोजक -कॅरिकॉमचे अध्यक्ष म्हणून बेलीझ राष्ट्र/ सरकारचे प्रमुख, आफ्रिकन महासंघाचे अध्यक्ष म्हणून सेनेगल, जी- 20 चे अध्यक्ष म्हणून इंडोनेशिया आणि जी- 7 चे अध्यक्ष म्हणून जर्मनी यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव , जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आणि इतर मान्यवरही या परिषदेत सहभागी झाले होते.
22 सप्टेंबर 2021 रोजी अध्यक्ष बायडेन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक कोविड आभासी शिखर परिषदेतही पंतप्रधान सहभागी झाले होते.