रामनवमीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जुनागढमधील गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला उपस्थित होते.
मंदिराच्या स्थापना दिनाच्या आणि रामनवमीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. चैत्र नवरात्रीच्या शुभ प्रसंगी माँ सिद्धिदात्री भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.गिरनारच्या पावन भूमीलाही त्यांनी वंदन केले. राज्य आणि देशाच्या भल्यासाठी. त्यांची सामूहिक शक्ती आणि काळजी त्यांना नेहमीच जाणवत असते , असे पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले. अयोध्येसह संपूर्ण देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. 2008 मध्ये मंदिराचे लोकार्पण करण्याची आणि गेली अनेक वर्षे माँ उमियाला वंदन करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
गथिला येथील उमिया माता मंदिर हे आध्यात्मिक आणि ईश्वरी असे महत्त्वाचे स्थान असण्यासोबतच सामाजिक जाणिवेचे आणि पर्यटनाचे स्थान बनले आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.माँ उमियाच्या कृपेने, समाज आणि भाविकांनी अनेक महान कार्ये केली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
माँ उमियाचे भक्त या नात्याने धरणी मातेचे कोणतेही नुकसान करणे लोकांना शक्य नाही, असे पंतप्रधानांनी नमूद केले. जशी आपण आपल्या आईला अनावश्यक औषधे खाऊ घालत नाही, तसेच आपल्या जमिनीवरही अनावश्यक रसायनांचा वापर करू नये, असे ते म्हणाले.शेतीचे क्षेत्र संरक्षित करण्यासाठीच्या 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' सारख्या जलसंधारण योजनांसारख्या उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी. सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री असताना हाती घेतलेल्या लोकचळवळीची आठवण त्यांनी करून दिली. जल संरक्षण चळवळीत बेफिकीरी आपल्याला परवडणारी नाही, असे त्यांनी सांगितले. धरणी मातेचे रसायनांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी आणि केशुभाईंनी ज्याप्रकारे पाण्यासाठी काम केले तसे काम सध्याचे मुख्यमंत्री धरणी मातेसाठी करत असल्याचे त्यांनी सांगितले
माँ उमिया आणि इतर देवतांच्या कृपेने तसेच शासनाच्या प्रयत्नाने लिंग गुणोत्तर सुधारले आणि बेटी बचाओ चळवळीचे चांगले परिणाम दिसून आले, यासंदर्भात पंतप्रधानांनी आनंदही व्यक्त केला. गुजरातमधील मुली मोठ्या संख्येने ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुला-मुलींमधील कुपोषणाविरुद्ध सक्रिय होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. गरोदर मातांच्या पोषणाची विशेष काळजी घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. कुपोषणाच्या समस्येचे पूर्णपणे निर्मूलन गरजेचे आहे, यावरही त्यांनी भर दिला. गावागावात सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करावी असे मोदी यांनी मंदिर न्यासाला सांगितले. गरीब विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेण्याची विनंतीही त्यांनी केली. मंदिराच्या मोकळ्या जागा आणि सभागृहाचा उपयोग योग शिबिरे आणि वर्गांसाठीही करता येईल, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि अमृत कालावधीच्या महत्त्वाचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.तुमच्या मनातील समाज, गाव आणि देश यांच्या जडणघडणीबद्दल जागरुकता वाढवावी आणि संकल्प करावा असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर तयार करण्याच्या दृष्टिकोनावरही त्यांनी भर दिला. गुजरातच्या लोकांसाठी ज्यांनी हजारो धरणे बांधली त्यांच्यासाठी हे काम फार मोठे नाही मात्र या प्रयत्नांचे फलित मोठे असेल. ही कामे त्यांनी 15 ऑगस्ट 2023 पूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. यासाठी सामाजिक चळवळ उभी करावी असे त्यांनी सांगितले. सामाजिक जाणिवा ही प्रेरणादायी शक्ती असली पाहिजे, असे ते म्हणाले.
रामनवमीच्या निमित्ताने बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपण जेव्हा रामचंद्रजींचा विचार करतो तेव्हा आपल्याला शबरी, केवत आणि निषादराज यांचेही स्मरण होते. त्यांनी वर्षानुवर्षे लोकांच्या हृदयात आदराचे स्थान मिळवले आहे. ही गोष्ट आपल्याला कोणालाही मागे राहू देऊ नका हे शिकवते, असे पंतप्रधान म्हणाले.
महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हा विषाणू अतिशय फसवा आहे आणि याविरुद्ध आपण दक्ष राहिले पाहिजे. भारताने लसींच्या 185 कोटी मात्रा देण्याचा अतुलनीय पराक्रम केला आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी सामाजिक जागृती आणि स्वच्छता आणि एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या चळवळीसारख्या चळवळींना याचे श्रेय दिले. आध्यात्मिक पैलूंसह सामाजिक जाणिवा जागृत करण्यात श्रद्धा केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतात असे ते म्हणाले.
2008 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या मंदिराचे उद्घाटनही केले होते. 2008 मध्ये पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे,आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि विनामूल्य आयुर्वेदिक औषधे इ.यांसारखे सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत मंदिर न्यासाने आपली व्याप्ती वाढवली आहे.
उमिया माँ ही कडवा पाटीदार समाजाची कुलदेवता किंवा कुलदेवी मानली जाते.