पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन आज वॉशिंग्टन डी.सी. येथील व्हाईट हाऊस येथे भारत-यूएस हाय-टेक हँडशेक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संचालन अमेरिकेचे वाणिज्य सचिव गिना राईमोनोडो यांनी केले. यावेळी प्रमुख भारतीय आणि अमेरिकन टेक कंपन्या आणि स्टार्टअप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना ‘एआय फॉर ऑल’ आणि ‘मॅन्युफॅक्चरिंग फॉर मॅनकाइंड’ या विषयाशी संबंधित होती.
हा कार्यक्रम दोन्ही नेत्यांसाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञानाच्या सहकार्याचा आढावा घेण्याची संधी होती. यावेळी दोन्ही देशांमधील नागरिकांच्या आणि जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता( AI) सक्षम समावेशी अर्थव्यवस्थेचा अवलंब करण्यामध्ये भारत-यूएस तंत्रज्ञान भागीदारीची भूमिका आणि संभाव्यतेवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही महासत्तांमधील परस्पर संबंध कसे दृढ होतील यावर चर्चा केली, तसेच भारतातील प्रतिभावान कर्मचारी तसेच भारताने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केलेली प्रगती यांचा जागतिक सहयोग निर्माण करण्यासाठी विद्यमान संबंधांचा लाभ घेण्याचे मार्गही शोधले. त्यांनी संबंधित उद्योगांमध्ये धोरणात्मक सहयोग सुरू करण्यासाठी, मानकांवर सहकार्य करण्यासाठी आणि नवकल्पना वाढवण्यासाठी नियमित सहभागाचे आवाहन केले.
यावेळी आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी सामाजिक-आर्थिक वाढीसाठी भारत-अमेरिका तंत्रज्ञान सहकार्याचा उपयोग करण्याच्या अफाट क्षमता अधोरेखित केल्या. नवोन्मेषाची संस्कृती जोपासण्यात भारतातील प्रतिभावान तरुणांच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी बायडेन यांनी जैवतंत्रज्ञान आणि क्वांटमसह नवीन क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका तंत्रज्ञान भागीदारीचा विस्तार करण्याच्या कामी योगदान देण्याचे उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवाहन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले की भारत-अमेरिका भागीदारी आपल्या लोकांसाठी आणि जगासाठी एक चांगले भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
या कार्यक्रमात खालीलप्रमाणे प्रमुख उद्योजक सहभागी झाले होते.
अमेरिकेच्यावतीने :
1. रेवती अद्वैथी, सीईओ, फ्लेक्स
2. सॅम ऑल्टमन, सीईओ, ओपनएआय
3. मार्क डग्लस, अध्यक्ष आणि सीईओ, एफएमसी कॉर्पोरेशन
4. लिसा सु, सीईओ, एएमडी
5. विल मार्शल, सीईओ, प्लॅनेट लॅब्स
6. सत्या नडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट
7. सुंदर पिचाई, सीईओ, गुगल
8. हेमंत तनेजा, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, जनरल कॅटलिस्ट
9. थॉमस टुल, संस्थापक, टुल्को एलएलसी
10.सुनीता विल्यम्स, नासा अंतराळवीर
भारताच्या वतीने:
1. आनंद महिंद्रा, अध्यक्ष, महिंद्रा समूह
2. मुकेश अंबानी, अध्यक्ष आणि एमडी, रिलायन्स इंडस्ट्रीज
3. निखिल कामथ, सह-संस्थापक, झिरोधा आणि ट्रू बीकन
4. वृंदा कपूर, सह-संस्थापक, 3rdiTech