पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादात भाग घेतला.
या बैठकीत ब्रिक्स देशांच्या नेत्यांसह आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील अतिथी देशांचा सहभाग होता.
पंतप्रधानांनी आपल्या निवेदनादरम्यान ब्रिक्सला ग्लोबल साऊथचा आवाज बनवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी आफ्रिकेसोबत भारताची घनिष्ठ भागीदारी अधोरेखित केली आणि अजेंडा 2063 अंतर्गत विकासाच्या प्रवासात आफ्रिकेला पाठिंबा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी बहु-ध्रुवीय जगाला बळकट करण्यासाठी वाढीव सहकार्याचे आवाहन केले आणि जागतिक संस्थांना प्रातिनिधिक आणि परस्पर संबंधित ठेवण्यासाठी सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला. दहशतवादविरोध, पर्यावरण संवर्धन, हवामान कृती, सायबर सुरक्षा, अन्न आणि आरोग्य सुरक्षा तसेच लवचिक पुरवठा साखळी या क्षेत्रात सहकार्यासाठी त्यांनी उपस्थित नेत्यांना आवाहन केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा, वन अर्थ वन हेल्थ, बिग कॅट आघाडी आणि पारंपरिक औषधांसदर्भातील जागतिक केंद्र यासारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांचा भाग होण्यासाठी पंतप्रधानांनी इतर देशांना आमंत्रणही दिले. त्यांनी भारताचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संग्रह सामाईक करण्याची संधी देऊ केली.