महोदय,
प्रधानमंत्री एल्बनीसी , प्रधानमंत्री किशिदा , आणि राष्ट्राध्यक्ष बायडन ,
आज सर्व मित्रांच्या सोबत या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी राखण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून क्वाड समूहाची गरज आता अधोरेखित झाली आहे. हिंद प्रशांत क्षेत्र हे जागतिक व्यापार ,नवोन्मेष आणि विकासाचे इंजिन आहे. हिंद प्रशांत क्षेत्राची सुरक्षितता व यश केवळ या क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहे . रचनात्मक कार्यक्रमासह आणि सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारे आपण पुढे जात आहोत.
संयुक्त प्रयत्नांमधून आपण मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राच्या आपल्या ध्येयाला व्यावहारिकतेची जोड देत आहोत. पर्यावरण संरक्षण, आपत्ती निवारण, धोरणात्मक तंत्रज्ञान, विश्वासार्ह पुरवठा साखळ्या, आरोग्य सुरक्षा, सागरी सुरक्षा, दहशतवादाचा बिमोड , अशा अनेक क्षेत्रांत आपले सकारात्मक सहकार्य वाढत आहे. अनेक देश आणि समूह त्यांच्या हिंद प्रशांत क्षेत्रासंबंधीच्या ध्येयधोरणाची व रणनीतीची घोषणा करत आहेत. आजच्या आपल्या बैठकीत या संपूर्ण क्षेत्रातील सर्वसमावेशक व लोकाभिमुख विकासाशी निगडित विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.
हा क्वाड समूह जागतिक कल्याण, मानवकल्याण, शांतता आणि समृद्धीसाठी सदैव कार्यरत राहील याची मला खात्री आहे. या शिखर परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी मी प्रधानमंत्री एल्बनीसी याचे अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. २०२४ साली भारतात क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आम्हाला आनंद होईल.
धन्यवाद.