महामहीम,
नमस्कार!
तुमच्या टिप्पणीबद्दल खूप-खूप आभार
महामहिम,
कोविड-19 मुळे फिनलंडमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल संपूर्ण भारताच्या वतीने माझ्या हार्दिक संवेदना. तुमच्या नेतृत्वाखाली फिनलंडने या महामारीचा कुशलतेने सामना केला आहे. त्यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो.
महामहिम,
या महामारीदरम्यान भारताने आपल्या देशांतर्गत संघर्षाबरोबरच जागतिक गरजांकडेही लक्ष दिले आहे. गेल्या वर्षी आम्ही 150 पेक्षा अधिक देशांना औषधे आणि अन्य आवश्यक सामग्री पाठवली होती. आणि अलिकडेच आम्ही सुमारे 70 देशांना भारतात निर्मित लसीचे 58 दशलक्षहून अधिक डोस पाठवले आहेत. मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही आमच्या क्षमतेनुसार संपूर्ण मानवजातीला यापुढेही मदत करत राहू.
महामहीम,
फिनलंड आणि भारत हे दोन्ही देश एक नियम -आधारित , पारदर्शक , मानवतावादी आणि लोकशाहीप्रधान जागतिक व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. तंत्रज्ञान नवसंशोधन , स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात आपल्यामध्ये मजबूत सहकार्य आहे. कोविड नंतरच्या काळात जागतिक आर्थिक सुधारणांसाठी सर्व क्षेत्र खूप महत्वपूर्ण असतील. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात फिनलंड जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. आणि भारताचा एक महत्त्वपूर्ण भागीदारही आहे. आणि तुम्ही हवामान विषयक चिंता व्यक्त केली , मी कधीकधी आमच्या मित्रांबरोबर विनोदाने म्हणतो की आपण निसर्गाबरोबर एवढा अन्याय केला आहे आणि निसर्ग इतका रागावलेला आहे कि आज आपल्या सर्व मानवजातीला, आपल्याला तोंड दाखवण्यासाठी लायक ठेवलेले नाही आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना आपल्या तोंडावर मास्क लावून, आपले तोंड लपवून फिरावे लागत आहे कारण आपण निसर्गावर अन्याय केला आहे . हे मी माझ्या मित्रांशी चेष्टा मस्करी करताना कधीकधी बोलत असतो. भारतात आम्ही हवामान विषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आहेत.
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात आम्ही 2030 पर्यंत 450 गिगावॅट स्थापित क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिबंधक पायाभूत विकास आघाडी सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. मी फिनलँडला ISA आणि CDRI मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो. फिनलंडची क्षमता आणि विशेषज्ञता याचा आंतरराष्ट्रीय संस्थांना लाभ मिळेल.
महामहीम,
फिनलंड नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अव्वल स्थानी आहे. या सर्व क्षेत्रात आपल्यामध्ये सहकार्याच्या संधी आहेत. मला आनंद आहे की आज आपण ICT, मोबाईल तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण क्षेत्रात एक नवीन भागीदारी घोषित करत आहोत. आपले शिक्षण मंत्रालय देखील एक उच्च स्तरीय संवाद सुरु करत आहेत. मला आशा आहे की आजच्या आपल्या शिखर परिषदेमुळे भारत-फिनलंड संबंधांच्या विकासाला गती मिळेल.
महामहीम,
आज ही आपली पहिलीच भेट आहे. आपण प्रत्यक्ष भेटलो तर बरे होईल. मात्र मागील एक वर्षात आपल्याला सर्वाना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भेटण्याची सवय लागली आहे. मात्र मला आनंद झाला आहे की आपल्याला लवकरच पोर्तुगालमध्ये भारत-युरोपीय महासंघ शिखर परिषद आणि डेनमार्क मध्ये भारत -नॉर्डिक शिखर परिषदेदरम्यान भेटण्याची संधी मिळेल. मी तुम्हाला भारत भेटीचे निमंत्रण देखील देतो. जेव्हा शक्य असेल तुम्ही जरूर भारत भेटीवर या. मी प्रारंभिक भाषण इथेच संपवतो. आता पुन्हा पुढील सत्रात आपण पुढील चर्चा करू.
खूप-खूप धन्यवाद.