नमस्कार!
या कार्यक्रमात आम्हाला आशीर्वाद देणारे आदरणीय बाबासाहेब पुरंदरेजी, बाबासाहेब सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा ताई आणि शिवशाहीवर विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांचे सर्व अनुयायी आणि साथीदार!
शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मी सुरूवातीसच साष्टांग नमस्कार करतो व छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत, जी शिकवण दिली आहे, तिचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो!
मी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनाच्या शंभराव्या वर्षातील प्रवेशासाठी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आत्तापर्यंत जसा मिळत आला तसाच पुढेही मिळत राहो या माझ्या शुभेच्छा आहेत. आदरणीय सुमित्राताईंनासुद्धा मी या खास आयोजनासाठी धन्यवाद देतो. या सुंदर समारंभात मला बाबासाहेबांचे आशीर्वाद घेण्याची, त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या आपणा सर्वांबरोबर, त्यांच्या मित्रपरिवारासोबत येण्याची संधी मिळाली याचा मला मोठा आनंद झाला आहे. देशभर पसरलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांना सुद्धा मी या पुण्यमय क्षणांसाठी शुभेच्छा देतो.
मित्रहो,
शतायुषी जीवनाची आकांक्षा ही मानवाच्या सर्वात प्राचीन आणि सकारात्मक विचारांपैकी एक आहे. आपल्याकडे वेदांमध्ये ऋषींनी तर शतायुषी आयुष्याच्या पुढे जात म्हटले आहे,
जीवेम शरदः शतम्॥
बुध्येम शरदः शतम्॥
रोहेम शरदः शतम्॥
म्हणजेच आपण शंभर वर्षांपर्यंत जगूया, शंभर वर्षांपर्यंत विचारशील राहूया, शंभर वर्षांपर्यंत प्रगतीशील राहूया. बाबासाहेब पुरंदरे यांचे जीवन आमच्या ऋषीमुनींच्या या श्रेष्ठ भावनांना प्रत्यक्षात आणणारे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असा योग स्वतःच्या तपस्येने स्वतः च्या जीवनातून सिद्ध करते तेव्हा योगायोगाला सुद्धा स्वयंसिद्धता प्राप्त होते. बाबासाहेब जीवनाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत आहेत त्याच वेळी आपला देश स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षात प्रवेश करत आहे हा एक सुखद योगायोग आहे. मला वाटतय की हा योगायोग त्यांच्या तपाने प्रसन्न झालेल्या भारत मातेचा प्रत्यक्ष आशीर्वादच आहे, असे स्वतः बाबासाहेबांना देखील वाटत असेल.
बंधू-भगिनींनो,
अजून एक योगायोगाची बाब आपल्याला स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी प्रेरणा देत आहे. आपणा सर्वांना हे व्यवस्थित माहीत आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाने आपल्या अमर स्वातंत्र्य सैनिकांवर इतिहास लेखनाची मोहीम सुरू केली आहे. हे पुण्यकर्म बाबासाहेब पुरंदरे गेल्या कित्येक दशकांपासून करत आले आहेत. या एका मिशनसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिलेले आहे. शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे त्यासाठी आपण सर्वजण त्यांचे कायमचे ऋणी आहोत. या त्यांच्या योगदानाने बदल घडवून आणलेल्या या देशाला त्यांच्याप्रती कृतज्ञता अर्पण करायचे सौभाग्य मिळाले आहे.
देशाने 2019 मध्ये त्यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले तर 2015 मध्ये त्या वेळच्या महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारसुद्धा दिला होता. मध्यप्रदेशातील शिवराजजींच्या सरकारने छत्रपती शिवाजीच्या या परम भक्ताला कालिदास पुरस्कार देऊन वंदन केले होते.
मित्रहो,
बाबासाहेब पुरंदरेंची छत्रपती शिवाजी महाराजांवरील ही भक्ती विनाकारण नाही. शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या इतिहासातील शीर्ष व्यक्ती तर आहेच पण भारताचा वर्तमानकाळसुद्धा त्यांच्या अमर गाथेच्या प्रभावाखाली आहे. जर शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते? हा आपल्या भूतकाळाचा, आपल्या वर्तमानकाळाचा आणि आपल्या भविष्यकाळाचा एक मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविना भारताचे स्वरूप, भारताचा गौरव यांची कल्पना करणेही कठीण आहे.त्या काळात छत्रपती शिवाजींनी बजावलेली भूमिका त्यांच्यानंतर त्यांच्या पराक्रमांनी, त्यांच्या प्रेरक गाथांनी सदैव बजावली आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले 'हिंदवी स्वराज्य' हे सुशासनाचे, मागास - वंचितांसाठीच्या न्यायाचे आणि अत्याचाराच्या विरोधातील आवाजाचे अप्रतिम उदाहरण आहे. वीर शिवाजीचे व्यवस्थापन, देशाच्या सागरी शकतीचा वापर ,नौसेनेचा वापर, जलव्यवस्थापन असे अनेक विषय आजही अनुकरणीय आहेत.आणि स्वतंत्र भारताच्या नवीन पिढीला शिवाजी महाराजांच्या या पैलूंची ओळख करून देण्याचे सर्वाधिक श्रेय बाबासाहेबांनाच जाते.
शिवाजी महाराजांवरील त्यांची अतूट श्रद्धा त्यांच्या लेखातून आणि त्यांच्या पुस्तकांमधून स्पष्ट दिसून येते.
शिवाजी महाराजांच्या कथा सांगण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची शैली, त्यांचे शब्द आपल्या मानसमंदिरात शिवाजी महाराजांना साक्षात जिवंत करतात. मला चांगले आठवते आहे की साधारण चार दशकांपूर्वी जेव्हा अहमदाबादेत त्यांचे कार्यक्रम आयोजित होत असत तेव्हा मी नियमितपणे त्यांना हजर रहात असे. जाणता राजा सुरू झाले तेव्हा एकदा मी मुद्दाम तो कार्यक्रम बघण्यासाठी पुण्याला गेलो होतो.
युवा वर्गापर्यंत इतिहास पोचवताना तो प्रेरक असण्याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर खऱ्या स्वरूपातील इतिहास पोहोचवला गेला पाहिजे , याची काळजी बाबासाहेबांनी नेहमीच घेतली. देशाच्या इतिहासाला आज या संतुलितपणाची आवश्यकता आहे. त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यातील साहित्यगुण यांनी इतिहास समजून घेण्याला कधीही बाधा आणली नाही. देशातील तरुण इतिहासकारांना मला सांगावेसे वाटते, की जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात स्वातंत्र्याचा इतिहास लिहाल तेव्हा तुमच्या लेखनाला प्रेरणा आणि प्रामाणिकपणा या कसोट्या लावल्या गेल्या पाहिजेत.
मित्रहो
बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रयत्न फक्त इतिहासाचे पाठ देण्यापर्यंत मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवन स्वतःच्या आयुष्यातही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तेवढ्याच निष्ठेने केले केला आहे. त्यांनी इतिहासाबरोबरच वर्तमानाचीही काळजी घेतली आहे. गोवा मुक्ती संग्रामापासून दादरा - नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामापर्यंत त्यांनी घेतलेली भूमिका आपल्या सर्वांनाच आदर्शवत आहे . त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सामाजिक कार्य आणि संगीतकला यांना वाहून घेतले आहे.
ते आजही शिवसृष्टी निर्माण करण्याच्या आपल्या अभूतपूर्व संकल्पनेवर काम करत आहेत. शिवाजी महाराजांचे जे आदर्श देशासमोर ठेवण्याचा त्यांनी आजीवन प्रयत्न केला ते आदर्श आम्हाला शतकानुशतके प्रेरणा देत राहतील.
याच विश्वासाने मी माता भवानीच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे ही प्रार्थना करतो. याच प्रकारे आपला आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत राहो या शुभेच्छांसह मी आपले बोलणे थांबवितो.
धन्यवाद !