पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या राष्ट्रीय महोत्सवाला संबोधित केले. मध्यप्रदेशातील जबलपूर इथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या नेतृत्वाखाली नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 चा राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. योगदिनाच्या यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांना आपण उपस्थित होते मात्र यंदा विविध वचनबद्धतांमुळे आपण सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्याने ते ध्वनिचित्रफितीच्या संदेशाच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 च्या सुमाराला संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या योग कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देत 180 हून अधिक देशांचे योगसाधनेसाठी एकत्र येणे हे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे'', अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगाभ्यासाला जागतिक चळवळ आणि जागतिक भावना बनवण्याच्या उद्देशाने 2014 मध्ये जेव्हा योगदिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत मांडण्यात आला तेव्हा देशांनी विक्रमी संख्येने पाठिंबा दिल्याचे स्मरण त्यांनी करून दिले.
योगदिनाला आणखी खास बनवणाऱ्या ‘ओशन रिंग ऑफ योग’ ची संकल्पना अधोरेखित करत ही कल्पना योगाभ्यासाची संकल्पना आणि महासागराचा विस्तार यांच्यातील परस्पर संबंधांवर आधारित आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी यांनी यावेळी जलस्रोतांचा वापर करून लष्कराच्या जवानांनी तयार केलेल्या ‘योग भारतमाला आणि योग सागरमाला’वरही प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे, आर्क्टिक ते अंटार्क्टिकापर्यंतची भारताचे दोन संशोधन केंद्र म्हणजेच पृथ्वीचे दोन ध्रुव देखील योगाभ्यासाशी जोडले जात आहेत. या अनोख्या सोहळ्यात देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी लोकांचा उत्स्फूर्त सहभाग योगाभ्यासाची भव्यता प्रसार आणि कीर्ती विशद करणारा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्याला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे योग”,असे पंतप्रधानांनी ऋषीमुनींच्या श्लोकांचे दाखले देऊन स्पष्ट केले. योगाभ्यासाचा प्रसार हा, वसुधैव कुटुंबकम संकल्पनेचा विस्तार आहे. यावर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी 20 शिखर परिषदेची संकल्पनाही ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी आहे यावर प्रकाश टाकत, योगाभ्यासाचा प्रसार हा ‘वसुधैव कुटुंबकम’ च्या भावनेचा प्रसार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“आज जगभरातील कोट्यवधी लोक एकत्र येऊन ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ या संकल्पनेवर आधारित योगाभ्यास करत आहेत, असे ते म्हणाले.
योगाभ्यासाच्या माध्यमातून आरोग्य, शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होते आणि वर्षानुवर्षे या योगाभ्यासात नियमितपणे सहभागी झालेल्यांना त्याची ऊर्जा जाणवते, असे पंतप्रधानांनी योगशास्त्राचा संदर्भ देत सांगितले. वैयक्तिक तसेच कौटुंबिक स्तरावर उत्तम आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना, योग एक निकोप आणि सशक्त समाज निर्माण करतो जिथे सामूहिक ऊर्जा असतेच, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी स्वच्छ भारत आणि स्टार्टअप इंडिया यासांरख्या अभियानांवर प्रकाश टाकत एक आत्मनिर्भर राष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि देशाची सांस्कृतिक ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी या अभियानांची मदत होत असून यात देश आणि तरुणांच्या ऊर्जेने मोठे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले. आज देशाची मानसिकता बदलली आहे, म्हणूनच जनजीवन बदलले आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताची संस्कृती आणि सामाजिक रचना, अध्यात्म आणि आदर्श आणि त्याचे तत्त्वज्ञान आणि दृष्टीकोनाने नेहमीच एकत्र आणणाऱ्या, सर्वांचा अंगीकार करणाऱ्या आणि आत्मसात करणाऱ्या परंपरांचे जतन केले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतीयांनी नव्या कल्पनांचे स्वागत केले आहे आणि त्यांचे जतन केले आहे हे अधोरेखित करत देशातील समृद्ध विविधता देखील साजरी केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आपल्याला सजीवांच्या एकतेची अनुभूती देणाऱ्या,आपल्याला प्राणिमात्रांच्या प्रेमाचा आधार बनवणाऱ्या अशा प्रकारच्या भावनांना योगाभ्यास बळ देतो, आंतरिक दृष्टीकोनाचा विस्तार करतो आणि या चेतनेशी जोडतो, असे ते म्हणाले. त्यामुळे योगाभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अंतर्गत असलेले विरोधाभास, अडथळे आणि अंतर्विरोध संपुष्टात आणण्याचे आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना जगासमोर उदाहरण म्हणून मांडायची आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी योगाभ्यासाबद्दलच्या श्लोकाचा दाखला देत कर्म कौशल्य म्हणजे योग आहे असे सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये हा मंत्र प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती खरोखर समर्पित असते तेव्हा ती योगाभ्यासाच्या सिद्धीपर्यंत पोहोचते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योगाभ्यासाद्वारे आपण निःस्वार्थ कृती जाणून घेतो, कर्म ते कर्मयोगाचा प्रवास आपण ठरवतो”, असे सांगत योगाभ्यासामुळे आपण आपल्या आरोग्यात अधिक सुधारणा करू आणि हे संकल्प आत्मसात करू असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. "आपली शारीरिक शक्ती, आपला मानसिक विस्तार विकसित भारताचा आधार बनेल", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.