पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम बहादूर राय यांच्या ‘भारतीय संविधान : अनकही कहानी’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून भाषण केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात प्रारंभी श्री राम बाहदूर राय यांच्या संपूर्ण आयुष्यातील नवीन विचारांचा शोध आणि समाजासमोर सतत नवीन काहीतरी घेऊन येण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. त्यांनी आशा व्यक्त केली की, आज प्रकाशित केलेले हे पुस्तक संविधानाला व्यापक स्वरूपात सर्वांसमक्ष आणेल. मोदी म्हणाले की, 18 जून रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या लोकशाही गतिमानतेच्या पहिल्या दिवसानिमित्त संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीवर स्वाक्षरी केली होती, हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की “देशाच्या अनेक पिढ्यांची स्वप्न पूर्ण करू शकणाऱ्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नाच्या रूपाने आपले संविधान आपल्यासमोर आले आहे.” त्यांनी नमूद केले की, संविधान सभेची पहिली बैठक स्वातंत्र्यापूर्वी काही महिने आगोदर 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती, जी आपले स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरील विश्वास आणि आत्मविश्वास दर्शविते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “यावरून लक्षात येते की भारताचे संविधान हे केवळ पुस्तक नाही. हा एक विचार, बांधिलकी आणि स्वातंत्र्यावरील विश्वास आहे.”
पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की, राय यांचे पुस्तक नवीन भारताच्या परंपरेतील विस्मरणात गेलेले विचार स्मरणात आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून भविष्यातील भारतात भूतकाळाच्या जाणीवेचा पाया मजबूत रहावा. ते म्हणाले की हे पुस्तक ज्याला स्वातंत्र्याचा इतिहास आहे आणि संविधानातील न उल्लेखलेल्या प्रकरणांबरोबरच देशाच्या तरुणांना एक नवीन विचार देईल आणि त्यांच्या विचारांना एक व्यापक दृष्टिकोन मिळवून देईल.
पंतप्रधानांनी श्री राय यांच्या पुस्तकाच्या संदर्भामागील आणीबाणीच्या संदर्भाचा उल्लेख करत नमूद केले की, “अधिकार आणि कर्तव्यांच्यामध्ये समन्वय हाच आपल्या संविधानाला विशेष स्थान निर्माण करून देतो. जर आपल्या जवळ अधिकार आहेत, तर आपली कर्तव्य देखील आहेत आणि जर आपल्याकडे आपले कर्तव्य असेल, तर आपले अधिकार देखील तितकेच सक्षम असतील. हेच कारण आहे की, देश आझादी का अमृत काल या काळात देखील कर्तव्य आणि भावनांवर इतका भर देण्याच्या मुद्द्याला महत्त्व देत आहे.” याखेरीज पंतप्रधानांनी संविधानाच्या संदर्भात व्यापक जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्यावर यावेळी भर दिला.
ते पुढे म्हणाले, “गांधीजींनी ज्या प्रकारे आपल्या राज्यघटनेला नेतृत्त्व मिळवून दिले, सरदार पटेल यांनी धर्माच्या आधारावर स्वतंत्र निवडणूक प्रणालीला रद्द करून भारतीय राज्यघटनेला जातीयवादातून मुक्त केले, डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या प्रस्तावनेत बंधुभावाचा समावेश करून `एक भारत श्रेष्ठ भारत` या संकल्पनेला आकार दिला आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या विद्वानांनी संविधानाला भारताच्या आत्म्याशी कशा प्रकारे जोडण्याचा प्रयत्न केला, या अशा अनेक नकळत विविध पैलूंची ओळख हे पुस्तक आपल्याला करून देते.”
पंतप्रधानांनी संविधानाच्या जिवंत स्वरूपावर विचार करताना स्पष्ट केले की, भारत हा स्वभावतःच मुक्त विचारांचा देश आहे. जडत्व हा आपल्या मूळ स्वभावाचा भाग नाही. संविधानाच्या सभेच्या स्थापनेपासून ते तिच्या वाद-विवादापर्यंत, संविधानाच्या स्वीकारापासून ते सध्याच्या टप्प्यांपर्यंत आपण सतत गतिमान आणि प्रगतीशील राज्यघटना पाहिली आहे. आपण वाद-विवाद उपस्थित केले, प्रश्न मांडले, चर्चा केली. मला खात्री आहे की हेच आपल्या जनमानसात आणि लोकांच्या मनात कायम राहील.”