पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ईशान्येतील सात राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला संबोधित केले. खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार केलेल्या फुलपाखराच्या आकारातील अष्टलक्ष्मी, शुभंकराची पंतप्रधान मोदी यांनी नोंद घेतली. ईशान्येकडील राज्यांना नेहमीच अष्टलक्षी असे संबोधणारे पंतप्रधान म्हणाले, “या खेळांमध्ये फुलपाखराच्या आकारातले शुभंकर बनवणे म्हणजे ईशान्येच्या आकांक्षांना कसे नवीन पंख मिळत आहेत, याचेही प्रतीक आहे.”
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भव्य प्रतिमा निर्माण केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. "अगदी मनापासून खेळावे, निर्भयपणे खेळावे, स्वतःसाठी आणि तुमच्या संघासाठी जिंकावे मात्र तुम्ही हरलात तरी खचून जाऊ नका. कारण पराभवाचा धक्का ही शिकण्याची एक संधी असते", असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
संपूर्ण देशभरामध्ये सुरू असलेल्या विविध क्रीडा उपक्रमांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ईशान्येतील सध्याच्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, लडाखमधील खेलो इंडिया हिवाळी खेळ, तामिळनाडूमधील खेलो इंडिया युवा खेळ, दीवमधील बीच गेम्स यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की," हे उपक्रम पाहून मला आनंद होत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आसाम सरकारसह विविध राज्य सरकारांनी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी, तसेच नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
खेळांबद्दलच्या बदलत्या सामाजिक धारणेविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पालकांच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे आवर्जून नमूद केले. लक्षात घ्या की, पूर्वी, पालक आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये काही करण्यासाठी पाठवण्यास कचरत होते, यामुळे मुलांचे शिक्षणावरील लक्ष विचलित होईल, अशी भीती त्यांना वाटत होती.
आताच्या बदलत्या काळात आपल्या पाल्यांनी राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अशा कोणत्याही स्तरावर क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा पालकांना अभिमान वाटू लागला असल्याची बदलती मानसिकताही त्यांनी आपल्या भाषणातून ठळकपणे अधोरेखीत केली.
खेळाडूंनी गाजवलेल्या कर्तृत्वाचा सोहळा साजरा करणे आणि त्याचा सन्मान करण्याच्या महत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरत दिला. ज्याप्रमाणे आपण मुलांची शैक्षणिक कामगिरी उत्सवाप्रमाणे साजरी करतो, त्याचप्रमाणे खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची नवी प्रथा आपण घडवली पाहिजे असे ते म्हणाले. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉलपासून अॅथलेटिक्सपर्यंत, बॅडमिंटनपासून बॉक्सिंगपर्यंत, भारोत्तोलनापासून बुद्धिबळापर्यंत सर्व प्रकारांतल्या क्रीडापटूंना प्रेरणा दिली जाते, तिथे खेळ हा उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. ईशान्य भारताच्या या समृद्ध क्रीडा संस्कृतीतून आपण शिकवण घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंना मोलाचा अनुभव मिळेल आणि यासोबतच शिवाय संपूर्ण भारतातील क्रीडा संस्कृतीच्या प्रगतीशील वाटचालीलाही त्यामुळे मोठा हातभार लागेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
देशातील युवावर्गासाठी नव्या संधीची दारे खुली करणारी परिसंस्था देशात विकसित होत असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. खेलो इंडिया असो, की टॉप्स वा इतर उपक्रम असोत, आपल्या युवा पिढीसाठी नव्या शक्यता आणि संधीची दारे खुली करणारी एक नवीन परिसंस्था विकसित केली जात आहे असे ते म्हणाले. खेळाडूंसाठी प्रशिक्षणाच्या सुविधांपासून ते शिष्यवृत्तीपर्यंत सकारात्कम, पोषक वातावरणाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांनी आग्रहाने माहिती दिली, तसेच यंदा क्रीडा क्षेत्रासाठी विक्रमी 3500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली केली असल्याचे ते म्हणाले.
जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या यशाबद्दल अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताने जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा दाखला देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याच्या भारताच्या वाढलेल्या क्षमतेचा गौरव केला. या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले. 2019 मध्ये आपण केवळ 4 पदके जिंकू शकलो होतो, मात्र 2023 मध्ये आपण एकूण 26 पदके जिंकली अशी माहिती त्यांनी दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विक्रमी संख्येने पदके जिंकल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. खेळाडूंनी जिंकलेली ही पदके म्हणजे केवळ संख्या नाही, तर शास्त्रीय दृष्टिकोन बाळगत आपण आपल्या खेळाडूंना पाठबळ आणि सहकार्य दिलं तर ते काय साध्य करू शकतात याचाच हा पुरावा आहे असे ते म्हणाले.
खेळाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये अनेक मूल्यांची रुजवण होत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखीत केली. खेळात यश मिळवण्यासाठी प्राविण्यासोबतच इतर गोष्टींचीही अधिक गरज असते; या यशासाठी संयमी स्वभाव, नेतृत्वगुण, सांघिक वृत्ती, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक असते ही बाब त्यांनी नमूद केली. खेळाडूंनी केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नव्हे, तर जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी खेळांकडे वळावं असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. जे खेळतात, त्यांची नेहमीच भरभराट होते असे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेच्या निमीत्ताने इथे आलेल्या प्रत्येकाने ईशान्य भारतातील समृद्ध क्रीडा संस्कृतीचा अनुभव घ्यावाच, पण त्या ही पलिकडे जात या प्रदेशाचे सौंदर्यही अनुभवावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना केले. #NorthEastMemories हा हॅशटॅग वापरून सगळ्यांनी या स्पर्धेनंतर साहसी उपक्रम राबवावेत, आठवणी टिपाव्यात आणि नंतर हे अनुभव समाजमाध्यमांवर सर्वांसोबत सामायिक करावेत असे ते म्हणाले. या स्पर्धेनिमीत्त या प्रदेशात आपण जो काळ व्यतीत करू त्यावेळात स्थानिक भाषांमधील वाक्येही शिकून घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे आपली ज्या ज्या समाजघटकाशी भेट होईल, त्या त्या समाजघटकाशी आपण जोडले जाऊ, परस्परांच्या सांस्कृतिक अनुभवात भर पडेल असे ते म्हणाले. यासाठी आपण भाषिणी या अॅपचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.