नमस्कार!
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.
बंगळुरू शहर हीच देशातील युवकांच्या उत्साहाची ओळख आहे. बंगळुरू ही व्यावसायिकांची आन, बान , शान आहे. डिजिटल इंडिया हब असलेल्या बंगळुरूमध्ये खेलो इंडियाचे आयोजन हे खूप महत्त्वाचे आहे. स्टार्ट-अप्सच्या जगात विविध क्रीडा प्रकारांचा हा संगम खरोखरच अद्भुत आहे ! बंगळुरू मध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे आयोजन या सुंदर शहराच्या उर्जेत भर घालेल आणि देशातील तरुणही इथून नवी ऊर्जा घेऊन परततील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मी कर्नाटक सरकारचे अभिनंदन करतो. जागतिक महामारीच्या सर्व आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भारतातील तरुणांचा दृढ़ संकल्प आणि चैतन्याचे उदाहरण आहे. मी तुमच्या प्रयत्नांना आणि धैर्याला सलाम करतो. आज ही युवाशक्ती देशाला प्रत्येक क्षेत्रात नव्या गतीने पुढे नेत आहे.
माझ्या युवा मित्रांनो ,
यशस्वी होण्याचा पहिला मंत्र आहे -
संघभावना!
हीच 'संघभावना' आपल्याला खेळातून शिकायला मिळते. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत तुम्हाला याचा अनुभव येईल. ही सांघिक भावना तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देखील देईल.
खेळात जिंकण्याचा अर्थ म्हणजे- समग्र दृष्टीकोन! 100 टक्के समर्पण!
तुमच्यातील अनेक खेळाडू भविष्यात राज्य स्तरावर खेळतील. तुमच्यापैकी अनेकजण पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतील. तुमच्या क्रीडा क्षेत्राचा हा अनुभव तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल. क्रीडा क्षेत्र ही खऱ्या अर्थाने जीवनाची खरी आधार व्यवस्था आहे. तुम्हाला खेळात पुढे नेणारी शक्ती आणि ज्ञान तुम्हाला जीवनातही पुढे घेऊन जाईल. खेळ आणि जीवन या दोन्हींमध्ये आवड महत्वाची आहे. जो खेळात आणि जीवनात आव्हाने स्वीकारतो तोच विजेता असतो. खेळ आणि जीवन या दोन्हींमध्ये पराभव म्हणजे विजयही असतो. पराभव म्हणजे शिकवणही असते. प्रामाणिकपणा तुम्हाला खेळात आणि आयुष्यातही पुढे घेऊन जातो. खेळ आणि जीवनात प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. वर्तमान क्षणाला अधिक महत्त्व आहे. या क्षणात जगणे आणि या क्षणात काहीतरी करून दाखवणे महत्वाचे आहे.
विजयात नम्र राहण्याचे कौशल्य आणि पराभवातून शिकण्याची कला हे जीवनाच्या प्रगतीचे सर्वात मौल्यवान घटक आहेत. आणि हे आपण मैदानात खेळूनच शिकतो. खेळताना जेव्हा शरीर उर्जेने भरलेले असते, तेव्हा खेळाडूच्या हालचालींही जलद आणि तीव्र असतात. अशा वेळी चांगला खेळाडू डोके शांत ठेवून संयमाने खेळतो जीवन जगण्याचीही ही एक उत्तम कला आहे.
मित्रांनो, तुम्ही नव्या भारतातले युवा आहात. तुम्ही 'एक भारत श्रेष्ठ भारत'चे ध्वजवाहकही आहात. तुमचे युवा विचार आणि तुमचा तरुण दृष्टिकोन आज देशाची धोरणे ठरवत आहे. आज तरुणांनी फिटनेस हा देशाच्या विकासाचा मंत्र बनवला आहे. आजच्या तरुणांनी खेळांना जुन्या विचारांच्या बंधनातून मुक्त केले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात खेळावर दिलेला भर असेल किंवा आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, खेळाडूंच्या निवडीतील पारदर्शकता असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा खेळातील वाढता वापर, हे नव्या भारताचे वैशिष्ट्य आहे.
भारतातील तरुणांच्या आशा आणि आकांक्षा नव्या भारताचे निर्णय ठरवत आहेत. आता देशात नवीन क्रीडा विज्ञान केंद्रे स्थापन केली जात आहेत. आता देशात समर्पित क्रीडा विद्यापीठे स्थापन होत आहेत. हे तुमच्या सोयीसाठी आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आहे.
मित्रांनो,
खेळांची शक्ती देशाची ताकद वाढवते. खेळात ठसा उमटवल्याने देशाची ओळख वाढते. टोकियो ऑलिम्पिकमधून मायदेशी परतलेल्या खेळाडूंना मी भेटलो ते मला अजूनही आठवते. त्यांच्या वैयक्तिक विजयापेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावर देशासाठी जिंकल्याचा अभिमान दिसत होता. देशासाठी जिंकल्यामुळे जो आनंद मिळतो, त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही.
तुम्ही देखील आज फक्त तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी खेळत नाही. भलेही या विद्यापीठ स्पर्धा आहेत ,मात्र असे मानून चला की तुम्ही देशासाठी खेळत आहात आणि तुम्ही अंतर्मनात देशासाठी एक आश्वासक खेळाडू तयार करत आहात . ही भावना तुम्हाला पुढे घेऊन जाईल. ही भावना तुम्हाला मैदानावर केवळ विजय मिळवून देणार नाही तर पदकही मिळवून देईल. मला खात्री आहे , माझ्या मित्रांनो, तुम्ही सर्वजण, खूप खेळाल आणि खूप बहराल !
या विश्वासासह, देशभरातील माझ्या सर्व तरुण मित्रांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा! धन्यवाद!