पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्ष येल ब्राऊन पिवेट आणि असेंब्लीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमधील हॉटेल डी लासे येथे असेंब्लीच्या अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी दुपारच्या भोजनाच्या वेळी ही भेट झाली.
उभय नेत्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही सामायिक मूल्ये अधोरेखित केली. त्यांनी दोन्ही देशांच्या संसदे मधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा केली.
फ्रेंच असेंब्लीच्या अध्यक्षांनी भारताच्या व्यापक निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले. व्यापार आणि अर्थव्यवस्था, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि संस्कृती यासह धोरणात्मक सहकार्याच्या विविध स्तंभांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही मते व्यक्त केली.