पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2023 रोजी अबू धाबी येथे सीओपी 28 (CoP28) शिखर संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलतान अल जाबेर यांची भेट घेतली.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या( UAE) अध्यक्षतेखाली होणाऱ्या युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदलासाठीच्या शिखर संमेलना संबंधीच्या आगामी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP-28) बाबत चर्चा झाली. डॉ. जाबेर यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीसंदर्भात यूएईच्या दृष्टिकोनाबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी सीओपी 28 (COP-28) अध्यक्षपदासाठी संयुक्त अरब अमिरातीला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठी भागीदारी, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली संबंधी लाइफ अभियान यासह हवामानातील बदलासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी भारताचे प्रयत्न आणि विविध उपक्रम अधोरेखित केले.
त्याचबरोबर भारत आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) यांच्यातील ऊर्जा सहकार्याचाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.