माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
तुम्हाला तर माहितीच आहे की एका आवश्यक कामासाठी मला अमेरिकेला जावे लागत आहे. म्हणून मी विचार केला की अमेरिकेला जाण्याच्या आधीच मी 'मन की बात' ध्वनिमुद्रित करून ठेवली तर चांगलं होईल.
सप्टेंबर मध्ये ज्या दिवशी 'मन की बात' आहे त्या तारखेलाच अजून एक महत्त्वपूर्ण दिवस असतो.
तसं तर आपण खूप सारे दिवस लक्षात ठेवतो, तऱ्हे तऱ्हेचे दिवस साजरे देखील करतो आणि जर आपल्या घरात तरुण मुलं- मुली असतील आणि त्यांना विचारलं तर वर्षभरात कुठला दिवस कधी येतो ह्याची संपूर्ण यादीच ते आपल्याला ऐकवतील, पण अजून एक दिवस असाही आहे की जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा आणि हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी खूप सुसंगत आहे. अनेक शतकांपासून ज्या परंपरांशी आपण जोडले गेलो आहोत, त्यांच्याशीच आपल्याला जोडून ठेवणारा आहे. हा आहे 'वर्ल्ड रिवर डे ' म्हणजेच 'विश्व नदी दिवस'.
आपल्याकडे म्हटलं गेलं आहे -
" पिबन्ति नद्यः, स्वयमेव नाम्भः"
अर्थात नद्या आपलं पाणी स्वतः पीत नाहीत पण परोपकारासाठी देतात. आमच्या इथे नदी एक भौतिक वस्तू नाही आहे, आमच्यासाठी नदी एक जिवंत एकक आहे आणि म्हणूनच, म्हणूनच तर नद्यांना आम्ही आई म्हणतो. आपले कितीतरी पर्व असतील, सण असतील, उत्सव असतील, आनंद असेल, हे सगळं आपल्या या आयांच्या कुशीतच तर होत असतात.
आपणा सर्वांना तर माहितीच आहे की माघ महिना येतो तेव्हा आपल्या देशातील बरेच लोक, संपूर्ण एक महिनाभर गंगा मातेच्या किंवा कुठल्या अन्य नदीच्या किनाऱ्यावर कल्पवास करतात.
आता अशी परंपरा तर नाही राहिली पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरात जरी स्नान करत असलो तरी नद्यांचे स्मरण करण्याची परंपरा, भलेही आज लुप्त झाली असेल किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात, उरली असेल. पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच विशाल भारताची एक यात्रा घडवत असे, मानसिक यात्रा!
देशातल्या कानाकोपऱ्यांशी जोडले जाण्याची प्रेरणा बनत असे. आणि काय होती ती? भारतात स्नान करण्याच्या वेळी एक श्लोक म्हणण्याची परंपरा होती-
" गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु।।"
पूर्वी आमच्या घरातील कुटुंबातील मोठी माणसे हा श्लोक लहान मुलांकडून पाठ करून घेत असत आणि ह्या मुळे आपल्या देशातील नद्यांच्याविषयी आस्था उत्पन्न होत असे. विशाल भारताचा एक नकाशा मनात कोरला जात असे. .नद्यांशी एक नाते जोडले जात असे. ज्या नदीला एका आईच्या रूपात आपण ओळखतो, पाहतो, जगतो, त्या नदीच्या विषयी एक आस्थेची भावना निर्माण होत असे. ही एक संस्कार प्रक्रिया होती.
मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या देशातील नद्यांच्या गौरवाविषयी बोलतो आहोत तर स्वाभाविकपणे कोणीही एक प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारण्याचा हक्कही आहे आणि याचे उत्तर देणे ही आपली जबाबदारी आहे. कोणीही प्रश्न विचारेल की भाऊ, तुम्ही नद्यांच्या विषयी इतकं गुणगान गात आहात, नदीला आई म्हणत आहात तर मग या नद्या प्रदूषित का होत आहेत ?
आमच्या शास्त्रांनी तर नदीला थोडे देखील प्रदूषित करणे हे चुकीचं आहे असं सांगितलं आहे. आमची परंपरा देखील अशी आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदुस्थानचा जो पश्चिमी भाग आहे, विशेष करून गुजरात आणि राजस्थान, तिथे पाण्याची खूप टंचाई आहे. खूप वेळा दुष्काळ पडत असतो. म्हणून तेथील समाजजीवनात एक नवी परंपरा विकसित झाली आहे. जेव्हा गुजरातेत पावसाला सुरुवात होते तेव्हा गुजरातेत ' जल जीलनी एकादशी' साजरी केली जाते. याचा अर्थ असा - आजच्या काळात आपण ज्याला catch the rain वर्षाजलसंधारण म्हणतो तीच गोष्ट आहे की पाण्याचा एकेक/ प्रत्येक थेंब वाचवायचा -जल जीलनी.
त्याच प्रमाणे पावसाळ्याच्या नंतर बिहार आणि पूर्वेकडच्या भागात छठ चे महापर्व साजरे केले जाते. मला आशा आहे की छठपूजेची तयारी म्हणून नद्यांचे किनारे आणि घाटांची स्वच्छता आणि दुरुस्तीची तयारी सुरू झाली असेल.
आपण नद्यांच्या स्वच्छतेचे आणि त्यांना प्रदूषण मुक्त करण्याचे काम सर्वांच्या प्रयत्नांनी, सर्वांच्या सहकार्याने करूच शकतो. 'नमामि गंगे मिशन' पण आज प्रगती पथावर आहे, त्यात सर्व लोकांच्या प्रयत्नांची, एक प्रकारे जनजागृतीची, जनआंदोलनाची खूप मोठी भूमिका आहे.
मित्रांनो जेव्हा नदीविषयी बोलतो आहोत, गंगामातेविषयी बोलतो आहोत तेव्हा आणखी एका गोष्टीकडे देखील आपले लक्ष वेधले पाहिजे असे वाटते आहे.
जेव्हा 'नमामि गंगे' विषयीआपण बोलत होतो तेव्हा तर नक्कीच एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल आणि आमच्या तरुणांच्या तर अगदी नक्कीच लक्षात आली असेल. सध्या एक विशेष ई ऑक्शन, ई लिलाव चालू आहे. हा त्या वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक लिलाव होतो आहे ज्या मला वेळोवेळी लोकांनी दिलेल्या होत्या. या लिलावातून जो पैसा मिळेल तो ' नमामि गंगे 'अभियानासाठी समर्पित केला जाईल. आपण ज्या आत्मीय भावनेने मला भेटवस्तू देता, तीच भावना हे अभियान आणखी बळकट करते आहे.
मित्रांनो देशभरातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी, पाण्याची स्वच्छता करण्यासाठी सरकार आणि समाजसेवी संघटना सतत काही ना काही तरी करत असतात. आजच नाही, अनेक दशकांपासून हे चालत आले आहे. काही लोकांनी तर अशा कामांसाठी स्वतःला समर्पित केलेले आहे आणि हीच परंपरा, हाच प्रयत्न, हीच आस्था आमच्या नद्यांचे रक्षण करते आहे. आणि हिंदुस्थानातील कोणत्याही कोपऱ्यातून जेव्हा अशी बातमी माझ्या कानांवर येते तेव्हा असे काम करणाऱ्यांच्या विषयी एक आदराचा भाव माझ्या मनात जागृत होतो आणि मलाही वाटतं की या बातम्या आपल्याला सांगाव्या.
आता बघा, तामिळनाडूच्या वेल्लोर आणि तिरुवन्नामलाई जिल्ह्याचे एक उदाहरण देऊ इच्छितो. इथे एक नदी वाहते, नागानधी. आता ही नागानधी अनेक वर्षांपासून कोरडी झालेली होती. या कारणामुळे तिथला जलस्तर देखील खूप खाली गेलेला होता. पण तिथल्या महिलांनी आपल्या नदीला पुनरुज्जीवित करण्याचा विडाच उचलला. मग काय.. त्यांनी लोकांना एकत्र केलं, लोकसहभागातून कालवे खोदले.Check dam बनवले, जल साठा करण्यासाठी विहिरी बांधल्या. आपल्या सगळ्यांना हे ऐकून आनंद होईल की मित्रांनो, आज ती नदी पाण्याने भरून गेली आहे! आणि जेव्हा नदी पाण्याने भरून जाते ना तेव्हा मनाला इतकी (शांतता), तृप्तता वाटते. मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलेला आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ज्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी साबरमती आश्रम स्थापन केला होता, ती साबरमती नदी गेल्या काही दशकांपासून आटत चालली होती, (कोरडी पडली होती.) वर्षातून सहा-आठ महिने तरी तिच्यात पाणी दिसतच नसे. पण नर्मदा नदी आणि साबरमती नदी जोडल्या गेल्या आणि आज आपण अहमदाबादला जाल तर साबरमती नदीतील पाणी आपले मन प्रसन्न करेल. याच प्रमाणे अनेक कामे, जशी तामिळनाडूतल्या आपल्या बहिणी करत आहेत तशी, देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात चालू आहेत. मला माहिती आहे की आमच्या धार्मिक परंपरांशी जोडलेले संत असतील, गुरुजन असतील, ते देखील आपल्या अध्यात्मिक यात्रेच्या सोबतच, पाण्यासाठी, नद्यांसाठी खूप काम करत आहेत. अनेक नद्यांच्या किनारी झाडे लावण्याचे अभियान चालू आहे तर कुठे नदीत सोडले जाणारे दूषित पाणी थांबवले जात आहे.
मित्रांनो, आज 'विश्व नदी दिवस" साजरा करताना, या कामासाठी स्वतःला समर्पित करून घेतलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. पण प्रत्येक नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना, देशवासीयांना मी विनंती करेन की भारतात, ठिकठिकाणी, वर्षातून एक वेळा तरी नदी उत्सव साजरा केलाच पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, कधीच लहान गोष्टीला, लहान वस्तूला, लहान/ (क्षुल्लक) मानण्याची चूक करू नये. लहान लहान प्रयत्नातून कधी कधी खूप मोठे परिवर्तन घडून येते आणि महात्मा गांधींच्या आयुष्याकडे आपण पाहिले तर आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवेल की लहान लहान गोष्टींना त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व होते आणि लहान लहान गोष्टींना घेऊनच मोठे मोठे संकल्प त्यांनी कसे साकार केले. आमच्या आजच्या नौजवानांना हे नक्की माहिती असलं पाहिजे की स्वच्छता अभियानाने, स्वातंत्र्य आंदोलनाला, सतत एक ऊर्जा दिली होती. ते महात्मा गांधीच तर होते की ज्यांनी स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले. आज इतक्या दशकानंतर, पुन्हा एकदा, स्वच्छता आंदोलनाने देशाला, नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले आहे आणि हे आमच्या सवयी बदलण्याचे देखील एक अभियान बनते आहे.
आम्हाला हे विसरून चालणार नाही की स्वच्छता केवळ एक कार्यक्रम नाही, स्वच्छता ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संस्कार संक्रमण करण्याची जबाबदारी आहे आणि पिढ्यानपिढ्या स्वच्छता अभियान चालते तेव्हाच संपूर्ण समाजजीवनाचा स्वच्छता हा स्वभाव बनतो.
आणि म्हणूनच वर्ष- दोन वर्ष, एक सरकार- दुसरे सरकार असा हा विषय नाही तर पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वच्छतेच्या विषयी जागरूक राहून, अविरत, न थकता, न थांबता, श्रद्धापूर्वक काम करत राहायचे आहे आणि स्वच्छतेचे अभियान चालवायचे आहे.
आणि मी तर आधी देखील म्हटलं होतं की स्वच्छता ही पूज्य बापूंना, ह्या देशाने वाहिलेली, खूप मोठी श्रद्धांजली आहे आणि ही श्रद्धांजली आम्हाला दर वेळी द्यायची आहे, सतत देत राहायची आहे.
मित्रांनो, लोकांना माहिती आहे की स्वच्छतेच्या विषयी बोलण्याची संधी मी कधीच सोडत नाही आणि म्हणूनच, आपल्या ' मन की बात ' चे एक श्रोते, श्रीमान रमेश पटेलजी, यांनी लिहिले की आम्हाला बापूंकडून शिकवण घेऊन, स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवात' आर्थिक स्वच्छतेचा देखील संकल्प करायला हवा. ज्याप्रमाणे शौचालये निर्माण झाल्याने गरिबांची प्रतिष्ठा वाढली त्याप्रमाणे आर्थिक स्वच्छता गरिबांच्या अधिकारांची सुनिश्चिती करते, त्यांचे आयुष्य सोपे बनवते. आता आपल्याला माहिती आहे की जनधन खात्यांच्या विषयी देशाने अभियान सुरू केले. त्यामुळे आज गरिबांचा, त्यांच्या हक्काचा पैसा, थेट, सरळ त्यांच्याच खात्यात जातो आहे, त्यामुळे भ्रष्टाचारासारखे व्यत्यय, खूप प्रमाणात कमी झाले आहेत. ही गोष्ट खरीच आहे की आर्थिक स्वच्छतेत तंत्रज्ञानाची खूप मदत होऊ शकते. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज गावातून, खेड्यातून देखील फिन टेक युपीआय ( fin- tech UPI) ने डिजिटल देवाण घेवाण करण्यासाठी सामान्य लोक पण सामील होत आहेत. त्याचा वापर वाढत आहे.
आपल्याला मी एक आकडा सांगतो, आपल्याला पण अभिमान वाटेल. गेल्या ऑगस्ट महिन्यात, एका महिन्यात, युपीआय द्वारे 355 कोटी व्यवहार झाले. म्हणजेच जवळजवळ 350 कोटींपेक्षा जास्त व्यवहार. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑगस्ट महिन्यात तीनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त वेळा, डिजिटल देवाण घेवाणीसाठी, यूपीआयचा वापर केला गेला. आज सरासरी सहा लाख कोटी रुपयांहून जास्त डिजिटल पेमेंट, UPI द्वारा होते आहे. ह्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वच्छता आणि पारदर्शिता येते आहे आणि आम्हाला माहिती आहे की आता fin-tech चे महत्व खूप वाढते आहे.
मित्रांनो जसे बापूंनी स्वच्छतेला स्वातंत्र्याशी जोडले होते तसेच खादीला स्वातंत्र्याची ओळख बनवलं होतं. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी, आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत, आज आपण आनंदाने म्हणू शकतो की स्वातंत्र्य आंदोलनात जसा खादीचा गौरव होता, तसाच गौरव, आज आमची युवा पिढी खादीला देते आहे.
आज खादी आणि हातमागाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आहे आणि मागणी देखील वाढली आहे. आपल्याला पण माहिती आहे की असे कितीतरी प्रसंग आले जेव्हा दिल्लीच्या खादी शोरुम मध्ये एका दिवसात, एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले. मी देखील पुन्हा आपल्याला सांगेन, की दोन ऑक्टोबर ला पूज्य बापूंच्या जयंतीच्या दिवशी आपण सगळे मिळून पुन्हा एकदा, एक नवा विक्रम स्थापित करू या. आपण आपल्या शहरात जिथे खादी विकली जात असेल, हातमाग उत्पादन विकले जात असेल, हस्तकला वस्तू विकल्या जात असतील, आणि दिवाळीचा सण जवळ आला आहे, सणांच्या दिवसातील आपली खादी, हातमाग आणि कुटिरोद्योग संबंधी सर्व खरेदी vocal for local ह्या अभियानाला बळकट करणारी असेल. जुने सर्व विक्रम मोडणारी असेल.
मित्रानो, अमृत महोत्सवाच्या ह्या काळात, देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील, आत्तापर्यंत सांगितल्या न गेलेल्या गाथा, माणसा माणसा पर्यंत पोचविण्याचे देखील एक अभियान सुरू आहे. ह्या साठी नवोदित लेखकांना, देशातील आणि जगातील युवकांना आवाहन केले होते.
ह्या अभियानासाठी आत्तापर्यंत 13 हजाराहून जास्त लोकांनी नाव नोंदवले आहे, ते देखील 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की 20 हून जास्त देशातील, कितीतरी अप्रवासी भारतीयांनी देखील ह्या अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एक अजून आकर्षक माहिती अशी आहे की 5000 हून जास्त नवोदित लेखक स्वातंत्र्य लढ्याच्या कथा शोधत आहेत. त्यांनी unsung heroes, अनाम वीरांच्या, ज्यांची नावे इतिहासाच्या पानांवर दिसत नाहीत, अशा अनाम वीरांच्या संकल्पनेवर, त्यांच्या आयुष्यावर, त्या घटनांवर काही लिहिण्याचा विडा उचलला आहे. म्हणजेच, त्या स्वातंत्र्य सेनानींचा, ज्यांच्या विषयी गेल्या 75 वर्षात काही बोललेच गेले नाही, त्यांचा इतिहास, देशासमोर आणण्याचा युवकांनी निश्चय केला आहे. सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांना माझी विनंती आहे. आपण देखील युवकांना प्रेरित करा. आपण पण पुढे व्हा आणि मला पक्का विश्वास आहे की स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याचे काम करणारे लोक इतिहास घडवणारे देखील आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ,
सियाचीन ग्लेशियरबद्दल आपण सगळे जाणतोच. तिथली थंडी इतकी भयानक असते की, तिथे राहणं सामान्य माणसाला शक्य नाही. दूरवर पसरलेला बर्फच बर्फ आणि झाडाझुडपांचा काहीच पत्ता नाही. तिथलं तापमान उणे 60 डिग्री पर्यंत देखील जातं. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिव्यांग व्यक्तींच्याएका चमूने जो पराक्रम करून दाखवला आहे, तो प्रत्येक देशबांधवासाठी अभिमानास्पद आहे. या चमूने सियाचीन ग्लेशियरच्या 15 हजार फुटांपेक्षा देखील जास्त उंचीवर असलेल्या 'कुमार पोस्ट' वर आपला झेंडा फडकवून जागतिक विक्रम केला आहे. शारीरिक आव्हानं असून देखील आपल्या या दिव्यांग मित्रांनी जी कामगिरी करून दाखवली, ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे आणि जेव्हा या चमूबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तेव्हा माझ्याप्रमाणेच तुमच्यात देखील हिंमत आणि आत्मविश्वास जागृत होईल. या शूर दिव्यांग मित्रांची नावं आहेत, महेश नेहरा, उत्तराखंडचे अक्षत रावत, महाराष्ट्राचे पुष्पक गवांडे, हरियाणाचे अजय कुमार, लडाखचे लोब्सांग चोस्पेल, तामिळनाडूचे मेजर द्वारकेश, जम्मू - कश्मीरचे इरफान अहमद मीर आणि हिमाचल प्रदेशचे चोंजिन एन्गमो. सियाचीन ग्लेशियर सर करण्याची ही मोहीम भारतीय सेनेच्या विशेष दलांच्या माजी अधिकाऱ्यांमुळे यशस्वी होऊ शकली. मी या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरीसाठी या चमूचे कौतुक करतो. ही कामगिरी आपल्या देशबांधवांची, "Can Do Culture", "Can Do Determination" "Can Do Attitude" (मी हे करू शकतो संस्कृती, करण्याचा निश्चय आणि करण्याची प्रवृत्ती) अशी प्रत्येक आव्हान पेलण्याची प्रवृत्ती दर्शवणारी आहे.
मित्रांनो, आज देशात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. मला उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या अशाच एका One Teacher, One Call (वन टीचर-वन कॉल) उपक्रमाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. बरेली येथे सुरू असलेली ही नावीन्यपूर्ण मोहीम दिव्यांग मुलांना नव्या वाटा दाखवत आहे. या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत डभौरा, गंगापूर इथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला पांडेयजी. कोरोना काळात, या मोहिमेमुळे मोठ्या संख्येने मुलांना शाळेत प्रवेश घेणं शक्य झालं, एवढच नाही, तर यामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त शिक्षक देखील या सेवाकार्याशी जोडले गेले आहेत. हे शिक्षक गावोगावी जाऊन दिव्यांग मुलांना साद घालतात, त्यांचा शोध घेतात आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या शाळेत प्रवेश मिळवून देतात. दिव्यांग व्यक्तींसाठी दीपमालाजी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो. शिक्षणाच्या क्षेत्रातला असा प्रत्येक प्रयत्न आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करणार आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज आपलं आयुष्य असं झालं आहे, की दिवसातून हजारोवेळा कोरोना हा शब्द कानावर पडतो, 100 वर्षांनी आलेली ही जागतिक महामारी, कोविड-19 ने प्रत्येक देशबांधवाला खूप काही शिकवलं आहे. आरोग्य आणि निरामयता (wellness) याबद्दल आपली उत्सुकता वाढली आहे आणि जागरूकता देखील. आपल्या देशात पारंपरिक रुपात अशा नैसर्गिक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, ज्या सुदृढ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. ओडिशाच्या कालाहांडीच्या नांदोल येथे राहणारे पतायत साहूजी या क्षेत्रात अनेक वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत. त्यांनी दीड एकर जमिनीवर औषधी झाडे लावली आहेत. इतकंच नाही, तर साहूजींनी या औषधी वनस्पतींच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. मला रांचीच्या सतीशजींनी पत्र लिहून अशीच आणखी एक माहिती दिली आहे. सतीशजींनी झारखंडच्या एका कोरफड गावाकडे माझं लक्ष वेधलं आहे. रांचीजवळच्या देवरी गावच्या महिलांनी मंजू कच्छपजी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून अॅलोव्हेरा म्हणजेच कोरफड शेतीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी कोरफडीची शेती सुरू केली. या शेतीने आरोग्य क्षेत्रालाच फायदा मिळाला नाही, तर या महिलांचे उत्पन्न देखील वाढले. कोविड महामारीच्या काळात देखील यांनी उत्तम कमाई केली. याचं एक मोठं कारण हे होतं की सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपन्या थेट यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज सुमारे चाळीस महिलांचा चमू या कामात गुंतला आहे आणि अनेक एकरांवर कोरफडीची लागवड केली जात आहे. ओदिशाचे पतायत साहूजी असोत, किंवा मग देवरीतला या महिलांचा चमू, यांनी शेतीची ज्याप्रकारे आरोग्याशी सांगड घातली आहे, ते एक मोठं उदाहरण आहे.
मित्रांनो, येत्या दोन ऑक्टोबरला, लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपल्याला हा एक दिवस शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांची आठवण करण्याचीही प्रेरणा देतो. औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात, स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी, मेडी-हब- टीबीआय च्या नावाने एक इन्क्युबेटर गुजरातच्या आणंद इथं कार्यरत आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींशी संबंधित या इनक्यूबेटरच्या मार्फत अगदी थोड्या कालावधीत, 15 स्वयंउद्योजकांच्या उद्योगविषयक कल्पनांना पाठबळ देण्यात आले आहे. या इनक्यूबेटरच्या मदतीनेच, सुधा चेब्रोलू जी यांनी आपली स्टार्ट अप कंपनी सुरु केली. त्यांच्या कंपनीत महिलांना प्राधान्य दिले जाते आणि त्यांच्यावरच, वनौषधीची अभिनव सूत्रे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणखी एक स्वयंउद्योजिका, सुभाश्री जी यानांही याच औषधी आणि सुगंधी वनस्पती इन्क्यूबेटर केंद्रातून मदत मिळाली आहे. सुभाश्री जी यांची कंपनी, वनौषधींपासून तयार केलेल्या गृह आणि कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेशनरचे उत्पादन आणि व्यवसाय करतात. त्यांनी वनौषधींचे एक टेरेस गार्डनही तयार केले आहे, ज्यात 400 पेक्षा अधिक औषधी वनस्पती आहेत.
मित्रांनो,
मुलांमध्ये औषधी आणि हर्बल वनस्पतींबाबत जागृती वाढावी, त्यांना माहिती मिळावी यासाठी आयुष मंत्रालयाने एक फारच रोचक उपक्रम सुरु केला आहे. आणि या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे, आपले प्राध्यापक आयुष्मान जी यांनी ! कदाचित तुम्ही विचार करत असाल, की हे प्रोफेसर आयुष्मान महोदय आहेत तरी कोण? तर प्रोफेसर आयुष्मान एका कॉमिक पुस्तकाचं नाव आहे. यात वेगवेगळ्या कार्टून व्यक्तिरेखांच्या माध्यमातून छोट्या-छोट्या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. त्यासोबतच, कोरफड, तुळस, आवळा, गुळवेल, कडुलिंब, अश्वगंधा आणि ब्राह्मी अशा सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पतींचे उपयोगही सांगितले आहे.
मित्रांनो, आजच्या परिस्थितीत, ज्या पद्धतीने, औषधी वनस्पती आणि इतर वनौषधींकडे, जगभरातल्या लोकांचा कल वाढतांना दिसतो आहे, त्यात भारतासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही काळात, आयुर्वेदिक आणि वनौषधींच्या निर्यातीतही खूप मोठी वाढ झाली आहे.
मी वैज्ञानिक, संशोधक आणि स्टार्ट अप्सच्या जगाशी संबंधित सर्व लोकांचे लक्ष अशा काही उत्पादनांकडे वेधू इच्छितो, जे लोकांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतातच; शिवाय आपले शेतकरी आणि युवकांचे उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरु शकतात.
मित्रांनो, पारंपरिक शेतीच्या पलीकडे जात, शेतीतच होणारे नवे प्रयोग, नवे पर्याय, सातत्याने स्वयंरोजगाराची साधने निर्माण करत आहेत. पुलवामा इथल्या दोन बंधूंची कथा देखील याचेच एक उत्तम उदाहरण आहे. जम्मू-कश्मीरच्या पुलवामा इथले बिलाल अहमद शेख आणि मुनीर अहमद शेख, यांनी ज्याप्रकारे आपल्यासाठी नव्या वाटा चोखाळल्या आहेत, ते म्हणजे नव्या भारताचेच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. 39 वर्षांचे बिलाल अहमद जी उच्चशिक्षित आहेत, त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. आपल्या उच्चशिक्षणातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करत त्यांनी, कृषीक्षेत्रात, स्वत:ची स्टार्ट अप कंपनी सुरु केली आहे. बिलालजी यांनी आपल्या घरातच गांडूळ खताचा छोटासा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतीत तर फायदा होतो आहेच, त्याशिवाय, यातून काही रोजगारांच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. दर वर्षी या दोन्ही बंधूंच्या खत प्रकल्पातून शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार क्विंटल गांडूळ खत मिळत आहे. आज त्यांच्या या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात, 15 जण काम करतात. त्यांचा हा प्रकल्प बघण्यासाठी दूरदुरून अनेक लोक येतात, आणि विशेष म्हणजे त्यात अशा युवकांचे प्रमाण अधिक आहे, ज्यांना कृषीक्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुलवामा इथल्या या शेख बंधूंनी ‘नोकरी शोधणारे’ होण्यापेक्षा ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ होण्याचा संकल्प केला, आणि ते केवळ जम्मू-काश्मीरच नाही, तर संपूर्ण देशालाच एक नवा मार्ग दाखवत आहेत, हा मार्ग इतर युवकांना प्रेरणा देतो आहे.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
25 सप्टेंबरला देशाचे थोर सुपुत्र पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती असते. दीनदयाल जी, गेल्या शतकातील सर्वात मोठ्या विचारवंतांपैकी एक होते. अर्थशास्त्र, समाजाला सक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणे, त्यांनी दाखवलेला अंत्योदयाचा मार्ग आजही तेवढाच प्रासंगिक तर आहेच, शिवाय अत्यंत प्रेरणादायी देखील आहे.
तीन वर्षांपूर्वी, 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत, जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना- आयुष्मान भारत लागू करण्यात आली होती. आज देशातील दोन सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक गरिबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळाले आहेत. गरिबांसाठीची ही इतकी मोठी योजना, दीनदयालजींच्या अंत्योदय तत्त्वज्ञानाला समर्पित आहे. आजच्या युवकांनी जर त्यांची मूल्ये आणि आदर्श प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणली, तर त्याची त्यांना खूप आयुष्यात खूप मदत होऊ शकेल. एकदा लखनौ इथे दीनदयालजी यांनी म्हटले होते, “किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, किती उत्तम गुण आहेत- हे सगळे आपल्याला समाजाकडूनच तर मिळत असते. आपल्याला समाजाचे ऋण फेडायचे आहे, अशाच प्रकारचा विचार करायला हवा.” म्हणजेच, दीनदयालजी यांनी आपल्याला शिकवण दिली, की आपण समाजाकडून सतत काही ना काही घेत असतो, अनेक गोष्टी घेत असतो. आपल्याकडे जे काही आहे, ते देशामुळेच तर आहे. म्हणूनच, देशाप्रति असलेले आपले ऋण कसे फेडता येईल, याचा विचार करायला हवा. हा आजच्या युवकांसाठी खूप मोठा संदेश आहे.
मित्रांनो, दीनदयालजी यांच्या आयुष्यातून आपल्याला आणखी एक शिकवण मिळते- ती म्हणजे, कधीही हार मानायची नाही. राजकीय आणि वैचारिक परिस्थिती विपरीत असतांनाही, भारताच्या विकासासाठी स्वदेशी मॉडेलचा वापर करण्याच्या आपल्या निश्चयापासून ते किंचितही ढळले नाहीत. आज खूप युवक-युवती मळलेल्या वाटेवरुन जाण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्यास इच्छुक आहेत, त्यांना परिस्थिती स्वतःला अनुकूल बनवायची आहे, अशा वेळी दीनदयालजी यांच्या आयुष्यातून खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळू शकेल आणि म्हणूनच माझा युवकांना आग्रही सल्ला आहे, की त्यांच्याविषयीची माहिती नक्कीच जाणून घ्या.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण आज अनेक विषयांवर चर्चा केली. आपण बोलत होतो, त्याप्रमाणे, पुढचा काही काळ सणवारांचा आहे. संपूर्ण देश, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या ‘सत्याचा असत्यावर विजय’ सांगणारा विजयादशमीचा उत्सवही साजरा करणार आहे. मात्र, या उत्सवकाळातही आणखी एक लढा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. आणि तो लढा आहे कोरोनाविरुद्धचा! या लढाईत टीम इंडिया रोज नवनवे विक्रम रचत आहे. लसीकरणात देशाने अनेक असे विक्रम प्रस्थापित केले आहेत, ज्यांची चर्चा सगळ्या जगभरात सुरु आहे. या लढाईत प्रत्येक भारतीयाची भूमिका महत्वाची आहे.
आपल्याला आपली वेळ आली की लस तर घ्यायची आहेच, पण त्यासोबतच आपल्याला याकडेही लक्ष द्यायचे आहे, की या सुरक्षा चक्रातून कोणीही सुटणार नाही. आपल्या आसपासच्या भागात, ज्या कोणाचे लसीकरण झालेले नाही, त्यांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचे आहे. आणि लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचे पालन करायचे आहे. मला आशा आहे की या लढाईत पुन्हा एकदा टीम इंडिया आपला झेंडा उंच फडकवणार आहे. आपण पुढच्या वेळी आणखी काही विषयांवर ‘मन की बात’ करुया. आपल्या सर्वांना, प्रत्येक देशबांधवाला येणाऱ्या सणवारांसाठी खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !
We mark so many days, but there is one more day we should celebrate. It is 'World River Day'. #MannKiBaat pic.twitter.com/Zv6CXgCmjM
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
हमारे लिये नदियाँ एक भौतिक वस्तु नहीं है, हमारे लिए नदी एक जीवंत इकाई है। #MannKiBaat pic.twitter.com/FN2HCc1mYO
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
हमारे शास्त्रों में तो नदियों में जरा सा प्रदूषण करने को भी गलत बताया गया है। #MannKiBaat pic.twitter.com/qnSC7RjBka
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
A special e-auction of gifts I received is going on these days. The proceeds from that will be dedicated to the 'Namami Gange' campaign: PM @narendramodi during #MannKiBaat pic.twitter.com/QY1ySsoJsa
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
ये महात्मा गांधी ही तो थे, जिन्होंने स्वच्छता को जन-आन्दोलन बनाने का काम किया था।
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
महात्मा गाँधी ने स्वच्छता को स्वाधीनता के सपने के साथ जोड़ दिया था। #MannKiBaat pic.twitter.com/WZhqsOUsvU
Let us buy Khadi products and mark Bapu's Jayanti with great fervour. #MannKiBaat pic.twitter.com/k7U3HYVAWD
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
The 'Can do culture', 'can do determination' and 'can do attitude' of our countrymen is inspiring.
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
Here's an incident from Siachen that makes us proud. #MannKiBaat pic.twitter.com/yx5HV47eDR
'One Teacher, One Call' initiative in Uttar Pradesh is commendable. #MannKiBaat pic.twitter.com/WJQhBo5kJi
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
Healthcare और Wellness को लेकर आज जिज्ञासा भी बढ़ी है और जागरूकता भी।
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
हमारे देश में पारंपरिक रूप से ऐसे Natural Products प्रचुर मात्रा में उपलब्ध हैं जो Wellness यानि सेहत के लिए बहुत फायदेमंद है। #MannKiBaat pic.twitter.com/yt50W42rB3
पारंपरिक खेती से आगे बढ़कर, खेती में हो रहे नए प्रयोग, नए विकल्प, लगातार, स्वरोजगार के नए साधन बना रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
पुलवामा के दो भाइयों की कहानी भी इसी का एक उदाहरण है। #MannKiBaat pic.twitter.com/bmddgxBfss
दीन दयाल जी, पिछली सदी के सबसे बड़े विचारकों में से एक हैं।
— PMO India (@PMOIndia) September 26, 2021
उनका अर्थ-दर्शन, समाज को सशक्त करने के लिए उनकी नीतियाँ, उनका दिखाया अंत्योदय का मार्ग, आज भी जितना प्रासंगिक है, उतना ही प्रेरणादायी भी है। #MannKiBaat pic.twitter.com/tUAouurvpZ