#MannKiBaat: PM Modi shares an interesting conversation he had with Lata Mangeshkar Ji ahead of her birthday
Not only 'delivery in', think about 'delivery out' also. Share your joy with those in need: PM #MannKiBaat
On this Diwali, let us organise public programmes to honour our daughters, let us celebrate their achievements: PM Modi #MannKiBaat #BharatKiLaxmi
#MannKiBaat: e-cigarettes became a fashion statement, banned to protect youth from it's ill effects, says PM
It is a matter of great joy for India that the Pope will declare Sister Mariam Thresia a saint on October 13: PM during #MannKiBaat
Let us shun single-use plastic as a tribute to Mahatma Gandhi: PM Modi during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार. मित्रहो, आज ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये मी देशातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करणार आहे. मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आपणा सर्व भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची, आपुलकीची भावना आहे. त्यांच्याविषयी आदर वाटत नसेल, असा भारतीय नागरीक शोधूनही सापडणार नाही. त्या वयाने आपल्या सर्वांपेक्षा फार मोठ्या आहेत आणि देशाच्या विविध टप्प्यांच्या, विविध कालखंडांच्या त्या साक्षीदार आहेत. आपण त्यांना ‘दिदी’ म्हणतो, लता दिदी. यावर्षी, 28 सप्टेंबर रोजी त्या 90 वर्षांच्या झाल्या. परदेशी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी दिदींसोबत दूरध्वनीवरून संवाद साधण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. एखाद्या लहान भावाने आपल्या मोठ्या बहिणीशी बोलावे, अशा प्रकारचा आमच्यातला हा प्रेमळ संवाद होता. अशा प्रकारच्या वैयक्तिक संभाषणाबद्दल मी खरेतर जाहीरपणे फार बोलत नाही. पण आज मला असे वाटते की, आपणही आमच्यातला हा संवाद ऐकावा. ऐकावे की आयुष्याच्या या वळणावरसुद्धा लतादिदी देशाशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी उत्सुक आहेत, तत्पर आहेत. त्यांच्या आयुष्यातील समाधानाची भावना भारताच्या प्रगतीशी जोडलेली आहे, बदलणाऱ्या भारताशी जोडलेली आहे, प्रगतीची नवी शिखरे सर करणाऱ्या भारताशी जोडलेली आहे.

 

मोदी जी : लतादीदी नमस्कार. मी नरेंद्र मोदी बोलतो आहे.

लता जी : नमस्कार,

मोदी जी : मी फोन केला कारण यावर्षी तुमच्या वाढदिवशी…

लता जी : हो हो

मोदी जी : मी विमान प्रवासात असेन.

लता जी : अच्छा

मोदी जी : तर मला वाटले की रवाना होण्यापूर्वी

लता जी : हो हो

मोदी जी : तुम्हाला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा द्याव्यात, असं मला वाटलं.तुमची प्रकृती चांगली राहावी, तुमचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहावा, हीच प्रार्थना आणि तुम्हाला प्रणाम करण्यासाठी मी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीच फोन केला.

लता जी : तुमचा फोन येणार, हे ऐकल्यावर मला फारच उत्सुकता वाटली. तुम्ही जाऊन केव्हा परत येणार.

मोदी जी : मी 28 तारखेला रात्री उशिरा किंवा 29 तारखेला पहाटे पोहोचेन. तोपर्यंत तुमचा वाढदिवस झालेला असेल.

लता जी : अच्छा, अच्छा. वाढदिवस काय साजरा करायचा. सगळी घरातलीच मंडळी असतील.

मोदी जी : दिदी बघा तर मला

लता जी : तुमचे आशीर्वाद मिळाले तर

मोदी जी : अरे तुमचे आशीर्वाद आम्ही मागतो. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात.

लता जी : वयाने मोठे तर अनेकजण असतात. पण आपल्या कामामुळे जो मोठा होतो, त्याचे आशीर्वाद मिळणे, ही फार मोठी गोष्ट असते.

मोदी जी : दीदी आपण वयानेही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि कर्तृत्वाने सुद्धा मोठ्या आहात. आणि ही जी सिद्धी आपण प्राप्त केली आहे, ती साधना आणि तपश्चर्येच्या माध्यमातूनच प्राप्त केली आहे.

लता जी : खरेतर मला वाटते की हा माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहे आणि श्रोत्यांचा आशीर्वाद आहे. मी खरे तर काहीच नाही.

मोदी जी : दिदी, हा जो तुमच्या स्वभावातला विनम्रपणा आहे, ही आमच्या नव्या पिढीसाठी, आमच्यासाठी फार मोठी शिकवण आहे. आमच्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे. आयुष्यात इतके सगळे साध्य केल्यानंतर सुद्धा तुम्ही नेहमीच आई-वडिलांचे संस्कार आणि नम्र वागणुकीला प्राधान्य दिलं आहे.

लता जी : हो.

मोदी जी : आणि मला फार आनंद होतो, जेव्हा आपण अभिमानाने सांगता की आपल्या आई गुजराथी होत्या…

लता जी : हो

मोदी जी : आणि मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो

लता जी : हो

मोदी जी : तुम्ही नेहमीच मला गुजराती पदार्थ खायला घातले आहेत

लता जी : हो. तुम्ही काय आहात, याची तुम्हाला स्वतःला कल्पना नाही. मला माहिती आहे की तुम्ही आल्यानंतर भारताचे चित्र बदलते आहे आणि मला त्यामुळे फार आनंद होतो, फार छान वाटते.

मोदी जी : बस दिदी, तुमचे आशीर्वाद कायम असू द्यात. संपूर्ण देशाला तुमचे आशीर्वाद कायम लाभू देत आणि आमच्यासारखे लोक, ज्यांना काही चांगले करायची इच्छा आहे. मला तुमच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. तुमची पत्रे सुद्धा मला मिळत राहतात आणि तुम्ही पाठवलेल्या भेटीसुद्धा मला मिळत राहतात. ही जी आपुलकीची भावना आहे, हे जे कौटुंबिक नाते आहे, त्यातून मला एक विशेष आनंद मिळतो.

लता जी : हो, हो.  मी तुम्हाला फार त्रास देऊ इच्छित नाही, कारण मी पाहते आहे, मला कल्पना आहे की तुम्ही किती कामात असता आणि तुम्हालाभरपूर काम असते, किती गोष्टींचा विचार करावा लागतो. जेव्हा तुम्ही जाऊन तुमच्या आईचे आशीर्वाद घेतले, हे मी पाहिले तेव्हा मी सुद्धा कोणाला तरी त्यांच्याकडे पाठवून त्यांचे आशिर्वाद घेतले.

मोदी जी : हो, माझ्या आईच्या लक्षात होते आणि ती मला सांगत होती

लता जी : हो

मोदी जी : हो

लता जी : हो आणि दूरध्वनीवरून त्यांनी मला आशीर्वाद दिले, त्याचा मला फार आनंद वाटला.

मोदी जी : तुम्ही व्यक्त केलेल्या स्नेहामुळे माझ्या आईला फार आनंद झाला.

लता जी : हो, हो

मोदी जी : तुम्ही नेहमी माझ्याबद्दल काळजी करता, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा देतो.

लता जी : हो.

मोदी जी : यावेळी मुंबईत आलो तेव्हा प्रत्यक्ष भेट व्हावी, असे वाटत होते

लता जी : हो हो नक्कीच

मोदी जी : मात्र वेळ आणि काम यांचे प्रमाण इतकं व्यस्त होतं की मला येणं शक्य झालं नाही.

लता जी : हो

मोदी जी : पण मी लवकरच येईन.

लता जी : हो

मोदी जी : आणि घरी येऊन तुमच्या हातचे काही गुजराथी पदार्थ चाखणार आहे.

लता जी : हो हो, नक्की नक्की, हे माझे सौभाग्य असेल.

मोदी जी : नमस्कार, दिदी

लता जी : नमस्कार

मोदी जी : तुम्हाला अनेक शुभेच्छा

लता जी : नमस्कार

मोदी जी : नमस्कार

 

      माझ्या प्रिय देशवासीयांनो, नवरात्रीबरोबरच आजपासून भवतालचे सगळे वातावरण पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या आनंदाने, नव्या संकल्पाने पुन्हा एकदा भरून जाईल.  उत्सवाचे दिवस आहेत ना. येणारे अनेक आठवडे देशभरात उत्सवांची धामधूम सुरू राहील. आपण सर्व नवरात्र, गरबा, दुर्गा पुजा, दसरा, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा आणि असे अनेक सण साजरे करू. आपणा सर्वांना येणाऱ्या या सर्व सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. सणांच्या वेळी अनेक नातेवाईक आपल्या घरी येतील. आपली घरे आनंदाने भरलेली राहतील. मात्र आपण पाहिले असेल की आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक आहेत, जे या सणांच्या आनंदापासून वंचित राहून जातात. ‘दिव्याखाली अंधार’ यालाच तर म्हणतात. बहुतेक ही म्हण केवळ काही शब्द नाहीत, तर आपल्यासाठी एक आदेश आहे, एक दर्शन आहे, एक प्रेरणा आहे. विचार करा, एकीकडे काही घरे प्रकाशाने उजळून निघतात त्याच वेळी दुसरीकडे समोर, आजूबाजूला काही घरांमध्ये केवळ अंधाराचे साम्राज्य असते. काही घरांमध्ये मिठाई खराब होऊन जाते तर काही घरांमधील लहान मुलांच्या मनात मिठाई खाण्याची इच्छा तशीच राहून जाते. काही घरांमध्ये कपडे ठेवण्यासाठी कपाटांमध्ये जागा उरत नाही, तर काही ठिकाणी शरीर झाकण्यासाठीही वस्त्र मिळत नाही. यालाच ‘दिव्याखाली अंधार’ असे म्हणतात का… हो, यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार. या सणांचा खरा आनंद तेव्हाच मिळेल, जेव्हा हा अंध:कार दूर होईल. हा अंध:कार कमी व्हावा, सगळीकडे प्रकाश पसरावा. जेथे अभाव असेल तेथे आपण आनंद वाटावा, असा आपला स्वभाव असावा. आमच्या घरांमध्ये मिठाई, कपडे, भेटवस्तू जेव्हा जेव्हा येतील, तेव्हा एक क्षणभरासाठी या भेटी बाहेर जाव्यात,असाही विचार करा. किमान आपल्या घरात ज्या वस्तू आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत, ज्या आता आपण वापरत नाही, अशा वस्तू तरी बाहेर गरजूंना देण्याचे काम निश्चितच करावे. अनेक शहरांमध्ये, अनेक अशासकीय संस्था युवा सहकाऱ्यांच्या स्टार्ट अप्ससोबत हे काम करतात. ते लोकांच्या घरांमधून कपडे, धान्य, जेवण अशा गरजेच्या वस्तू एकत्र करतात आणि गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत त्या वस्तू पोहोचवतात. हे काम अगदी अबोलपणे सुरु असते. यावर्षी उत्सवाच्या या काळात संपूर्ण जागरुकता आणि संकल्पासह दिव्याखालचा हा अंधार आपण दूर करू शकतो का? अनेक गरीब कुटुंबांच्या चेहर्‍यावर उमटलेले हसू, सणाचा आपला आनंद द्विगुणित करेल, आपल्या चेहऱ्यावर आणखी चमक येईल, आपले दिवे अधिक प्रकाशमान होतील आणि आपली दिवाळी आणखीनच उजळून जाईल.

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दिवाळीमध्ये सौभाग्य आणि समृद्धीच्या रुपाने लक्ष्मी घरात येते, पारंपारिक रूपात लक्ष्मीचे स्वागत केले जाते. यावर्षी आपण एका नव्या पद्धतीने लक्ष्मीचे स्वागत करू शकतो का? आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानले गेले आहे, कारण मुली सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतात. यावर्षी आपण आपल्या समाजात, गावांमध्ये, शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो का? सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. आपल्यामध्ये अशा अनेक मुली असतील, ज्या आपल्या मेहनतीने, इच्छाशक्तीच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्वल करत असतील. यावर्षी दिवाळीमध्ये भारताच्या या लक्ष्मींच्या सन्मानार्थ आपण कार्यक्रम करू शकतो का? आपल्या आजूबाजूला अनेक मुली, अनेक सुना अशा असतील, ज्या असामान्य कार्य करत आहेत. कोणी गरीब मुलांना शिकवण्याचे काम करत असेल, कोणी स्वच्छता आणि आरोग्य या बाबत जनजागृती करण्याचे कार्य करत असेल, कोणी डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊन समाजाची सेवा करत असेल, वकील होऊन एखाद्याला न्याय देण्याच्या प्रयत्न करत असेल. आपल्या समाजाने अशा लेकींना ओळखावे, त्यांना सन्मानित करावे आणि त्यांचा अभिमान बाळगावा. अशा सन्मानाचे कार्यक्रम देशभरात व्हावे.आणखी एक काम करता येईल. या मुलींच्या यशाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी आणि ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगचा वापर करावा.‘Selfie with daughter’ ही महा मोहीम आपण राबवली होती आणि जगभरात तीचा प्रसार झाला होता, त्याच प्रकारे या वेळी आपण ‘भारत की लक्ष्मी’ही मोहीम राबवू या.  भारत की लक्ष्मी या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याचा अर्थ आहे, देश आणि देशवासियांच्या समृद्धीचा मार्ग सक्षम करणे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी मागेच म्हटले होते की ‘मन की बात’कार्यक्रमाचा एक फार मोठा लाभ असा असतो की मला अनेक ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवाद करण्याचे सौभाग्य लाभते. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील एक विद्यार्थी अलीना तायंग यांनी मला एक छान पत्र पाठवले आहे आणि त्यांनी त्यात लिहिले आहे, मी आपल्यासमोर त्या पत्राचे वाचन करतो…

आदरणीय पंतप्रधान जी,

माझे नाव अलीना तायंग आहे. मी अरुणाचल प्रदेशातील रोइंग येथे राहतो. यावर्षी जेव्हा माझ्या परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा मला काही लोकांनी विचारले की तू एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक वाचलेस का? मी त्यांना सांगितले की हे पुस्तक मी वाचलेले नाही. पण पुन्हा जाऊन मी हे पुस्तक खरेदी केले आणि दोन-तीन वेळा वाचले. त्यानंतरचा माझा अनुभव फारच चांगला होता. मी हे पुस्तक परीक्षेपूर्वी वाचले असते तर मला त्याचा फार लाभ झाला असता, असे मला वाटले. या पुस्तकातील अनेक पैलू मला फारच आवडले, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की विद्यार्थ्यांसाठी त्यात अनेक मंत्र आहेत, मात्र पालक आणि शिक्षकांसाठी या पुस्तकात फार काही नाही. मला असे वाटते की जर आपण या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीबाबत विचार करत असाल, तर त्यात पालक आणि शिक्षकांसाठी आणखी काही मंत्र, आणखी काही मजकूराचा नक्कीच समावेश करावा.”

बघा, माझ्या युवा सहकाऱ्यांना सुद्धा विश्वास वाटतो की देशाच्या प्रधान सेवकाला एखादे काम सांगितले तर ते नक्कीच होईल.

माझ्याछोट्या विद्यार्थी मित्रा, सर्वात आधी, हे पत्र लिहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक दोन-तीन वेळा वाचल्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि वाचतानाच, त्यात काय कमतरता आहेत, हे मला सांगितल्याबद्दल अनेकानेक आभार. माझ्या या छोट्याशा मित्राने माझ्यावर एक काम सुद्धा सोपवले आहे, काही करण्याचा आदेश दिला आहे. मी निश्चितच आपल्या आदेशाचे पालन करेन. आपण जे सांगितले आहे की या पुस्तकाची नवी आवृत्ती जेव्हा येईल, तेव्हा मी त्यात निश्चितच पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी काही गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करेन. परंतु मी आपणा सर्वांना आग्रह करेन की या कामी आपण सर्व मला मदत करू शकता का? रोजच्या जगण्यातले आपले अनुभव काय आहेत? देशातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मी आग्रह करतो की आपण तणावमुक्त परीक्षेशी संबंधित पैलूंबाबत आपले अनुभव मला सांगावे, आपल्या सूचना मला सांगाव्यात. मी निश्चितपणे त्यांचा अभ्यास करेन, त्यावर विचार करेन आणि त्यातून ज्या गोष्टी योग्य वाटतील, त्या मी माझ्या शब्दात, माझ्या पद्धतीने लिहिण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन आणि कदाचित आपल्या सर्वांच्या जास्त सूचना आल्या तर माझ्या पुस्तकाची नवी आवृत्ती निश्चितच येऊ शकेल. आपल्या सर्वांच्या विचारांची मी वाट बघेन.  अरुणाचलमधील आमच्या या छोट्याशा मित्राचे, विद्यार्थी अलीना तायंग यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमांबाबत माहिती मिळत असते, तुम्ही त्याबाबत चर्चाही करता. पण तुम्हाला माहिती आहेच की मीसुद्धा तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे, एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि म्हणूनच एका सर्वसामान्य आयुष्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव दिसून येतो, तसाच प्रभाव माझ्याही आयुष्यात, माझ्याही मनावर होत असतो, कारण मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे.  बघा, यावर्षी युएस ओपन स्पर्धा जिंकण्याची जितकी चर्चा होती, तितकीच चर्चा उपविजेता दानील मेदवेदेव यांच्या भाषणाचीसुद्धा होती. सोशल मीडियावर सुद्धा ते गाजत होते. मग मीसुद्धा ते भाषण ऐकले आणि सामनासुद्धा पाहिला. तेवीस वर्षाचा दानील मेदवेदेव आणि त्यांचा साधेपणा, त्यांची परिपक्वता प्रत्येकाला प्रभावित करणारी होती. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाने खरोखरच भारावून गेलो. या भाषणापूर्वी अगदीच थोड्यावेळापूर्वी 19 वेळा ग्रॅन्ड स्लॅम पटकावणारे आणि टेनिस विश्वाचे सम्राट राफेल नदाल यांच्याकडून ते अंतिम फेरीत पराभूत झाले होते. अशावेळी इतर कोणी असते तर उदास आणि निराश दिसले असते, मात्र त्यांचा चेहरा उतरला नाही तर त्यांनी आपल्या भाषणाने सर्वांच्या चेहर्‍यावर हसू आणले. त्यांचा नम्रपणा, साधेपणा, शब्द आणि भावनेतून खऱ्या अर्थाने खिलाडू वृत्तीचे जे रूप पाहायला मिळाले, त्यामुळे प्रत्येकजण प्रभावित झाला. त्यांच्या बोलण्याचे तेथे उपस्थित प्रेक्षकांनी उत्साहात स्वागत केले.दानीलनेविजेता नदालचे सुद्धा खूप कौतुक केले, नदालने लक्षावधी युवकांना कशाप्रकारे टेनिस खेळण्यासाठी प्रेरित केले आहे, त्याबद्दल त्याने सांगितले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत खेळणे किती कठीण होते हे सुद्धा त्याने सांगितले. अटीतटीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी नदालचे कौतुक करून खिलाडूवृत्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. खरे तर त्याच वेळी दुसरीकडे विजेता नदाल याने सुद्धा दानीलच्या खेळाचे मनापासून कौतुक केले. एकाच सामन्यात पराभूत होणाऱ्याचा उत्साह आणि जिंकणाऱ्याचा नम्रपणा, या दोन्ही गोष्टी अभ्यासण्यासारख्या होत्या. जर आपण दानील मेदवेदेवचे भाषण ऐकले नसेल, तर मी आपणा सर्वांना, विशेषतः युवकांना सांगेन की त्यांचा हा व्हिडिओ नक्कीच बघा. यात प्रत्येक वर्गाच्या आणि प्रत्येक वयाच्या व्यक्तींना शिकता येईल, असे बरेच काही आहे. हे असे क्षण असतात, ते जिंकणे किंवा हरणे याच्या पलिकडचे असतात. जेव्हा विजय किंवा पराजय याला फारसा अर्थ राहत नाही. आयुष्य जिंकते आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये फार उत्तम प्रकारे हे सांगण्यात आले आहे. आपल्या पूर्वजांचे विचार खरोखरच कौतुकास्पद होते. आपल्याकडे शास्त्रांमध्ये म्हटले आहे…

 

विद्या विनय उपेता हरति

न चेतांसी कस्य मनुज्स्य |

मणि कांचन संयोग:

जनयति लोकस्य लोचन आनन्दम 

 

अर्थात, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये योग्यता आणि नम्रपणा एकाच वेळी वसते, तेव्हा ती व्यक्ती कोणाचे बरे मन जिंकणार नाही? खरेतर या युवा खेळाडुने जगभरातील सर्व लोकांचे मन जिंकून घेतले आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि विशेषतः माझ्या युवा मित्रांनो, मी आता जे काही सांगणार आहे, ते खरोखर आपल्या भल्यासाठी सांगणार आहेत. वाद सुरूच राहतील, पक्षांतील मतभेद कायम राहतील. मात्र काही गोष्टी वेगाने पसरण्यापूर्वी थांबवता आल्या तर त्यापासून मोठा लाभ होऊ शकेल. ज्या गोष्टी फार वेगाने वाढतात, फार पसरत जातात, त्या गोष्टी थांबवणे नंतर कठीण होत जाते. मात्र सुरुवातीलाच जर आपण जागृत होऊन त्या थांबवल्या तर बरेच काही वाचवता येऊ शकते. याच भावनेतून आज मला वाटते, विशेषतः माझ्या प्रिय  युवकांशी काही बोलावेसे वाटते. आपणा सर्वांना माहिती आहे की तंबाखूचे व्यसन आरोग्यासाठी फारच हानिकारक असते. हे व्यसन सोडणेही फार कठीण होऊन जाते. तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांना कर्करोग, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांचा धोका जास्त असतो, असे प्रत्येकजण म्हणतो. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे त्यात नशेचे प्रमाण जास्त असते. किशोरवयात याचे सेवन केल्यामुळे मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. परंतु मी आज आपल्या सोबत एका नव्या विषयाबाबत बोलू इच्छितो. आपणास माहिती असेल की नुकतेच भारतात  ई सिगारेटवर निर्बंध लागू करण्यात आले. ई सिगारेट ही नियमित सिगारेटपेक्षा वेगळे असे इलेक्ट्रॉनिक उपकरण असते. सिगारेटमध्ये निकोटिनयुक्त तरल पदार्थ गरम झाल्यामुळे एक प्रकारचा रासायनिक धूर तयार होतो, ज्याच्या माध्यमातून निकोटिनचे सेवन केले जाते. नेहमीच्या सिगरेटच्या धोक्याबद्दल आपल्याला बर्‍यापैकी माहिती असेल, मात्र ई सिगरेट बद्दल एक गैरसमज पसरवण्यात आला आहे की ई सिगारेटमुळे कोणताही धोका उद्भवत नाही. इतर सिगरेट प्रमाणे याची दुर्गंधी पसरू नये, यासाठी यात सुगंधी रसायनांचा वापर केला जातो. आपण आपल्या आजूबाजूला पाहिले आहे की अनेक घरांमध्ये वडील चेनस्मोकर असतात, मात्र तरीही ते घरातील इतरांना धूम्रपान करण्यापासून रोखतात, थांबवतात. त्यांना असे वाटते की आपल्या मुलांना विडी किंवा सिगारेटची सवय लागू नये. आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने धूम्रपान करू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. धुम्रपानामुळे, तंबाखूमुळे शरीराचे फार मोठे नुकसान होते, याची त्यांना कल्पना असते. सिगरेटमुळे उद्‌भवणाऱ्या  धोक्यांबद्दल कोणताही गैरसमज नाही, ते सेवन नुकसानच करते, हे विकणाऱ्यालाही माहिती असते, सेवन करणाऱ्यालाही माहिती असते आणि पाहणाऱ्यालाही माहिती असते. ई सिगारेटची बाब वेगळी आहे. ई सिगारेटबाबत लोकांच्या मनात फार जागृती नाही, त्यापासून उद्‌भवणाऱ्या धोक्याबद्दल लोकांना माहिती नाही आणि अनेकदा उत्सुकतेपोटी ही सिगारेट हळूच घरात प्रवेश करते. अनेकदा जादू दाखवतो, असे सांगून लहान मुले सुद्धा एकमेकांना ती दाखवत राहतात. कुटुंबात सुद्धा आई-वडिलांच्या समोर सुद्धा, बघा, आज मी एक नवी जादू दाखवतो. बघा माझ्या तोंडातून मी धूर काढून दाखवतो. बघा,  आगीशिवाय, माचिसची काडी न पेटवता मी धूर काढून दाखवतो. जादूचे प्रयोग सुरू असावेत, अशा पद्धतीने हे दाखवले जाते आणि कुटुंबातले लोक सुद्धा टाळ्या वाजवतात. त्यांना कल्पनाच नसते की एकदा घरातील किशोरवयीन आणि युवक या व्यसनात अडकले कि त्यानंतर ते हळूहळू या नशेच्या आहारी जातात, या व्यसनाच्या अधीन होतात. आमचा युवा वर्ग धन वाया घालवण्याच्या या मार्गावर चालू लागतो. अजाणतेपणी चालू लागतो. खरे तर सिगारेटमध्ये अनेक अपायकारक रसायनांचा वापर केला जातो, जी आरोग्यासाठी अपायकारक असतात. आपल्या आजूबाजूला कोणी धूम्रपान करत असेल तर आपल्याला त्याच्या वासावरूनच ते समजते. एखाद्याच्या खिशात सिगारेटचे पाकीट असेल तेव्हा सुद्धा केवळ वासावरून ते समजते.  मात्र ई सिगारेट अशी गोष्ट नाही, त्यामुळे अनेक किशोरवयीन आणि युवक अजाणतेपणी आणि काही वेळा फॅशन स्टेटमेंट म्हणून फार अभिमानाने आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या दप्तरांमध्ये, आपल्या खिशांमध्ये तर कधी हातामध्ये ई सिगरेट घेऊन फिरताना दिसतात आणि नंतर व्यसनाधीन होतात. युवा पिढी हे देशाचे भवितव्य आहे. नशेचा हा प्रकार आपल्या युवकांना उध्वस्त करणारा ठरू नये, यासाठी सिगारेटवर निर्बंध लावण्यात आले आहेत. कुटुंबाची स्वप्ने उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता यावीत, मुलांचे आयुष्य देशोधडीला लागू नये, व्यसनाच्याया सवयीने समाजात हातपाय पसरू नयेत, यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

मी आपणा सर्वांना आग्रह करतो की तंबाखूचे हे व्यसन सोडून द्या आणि ई सिगारेटबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका. या, आपण सर्व मिळून एक आरोग्यपूर्ण भारत निर्माण करू या.

अरे हो, फिट इंडिया ची आठवण आहे ना तुम्हाला? फिट इंडियाचा अर्थ असा नाही की सकाळ-संध्याकाळ दोन दोन तास आपण जिम मध्ये जावे, तेवढे पुरे. फिट इंडियासाठी या सर्व व्यसनांपासून सुद्धा दूर राहावे लागेल. माझे हे बोलणे आपल्याला खटकले नसेल, तर पटले असेल, असा विश्वास मला वाटतो.

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला भारत देश, इतरांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या अशा अनेक असामान्य लोकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिला आहे, ही आपल्यासाठी खरोखरच सौभाग्याची गोष्ट आहे.

ही आमची भारत माता, हा आमचा देश बहुरत्ना वसुंधरा आहे. या मातीमधून अनेक मानव रत्ने उपजली आहेत. भारत अशा अनेक असाधारण लोकांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि हे असे लोक आहेत, ज्यांनी केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण केले. अशाच एका महान व्यक्तीला 13 ऑक्टोबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये सन्मानित केले जाणार आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी निश्चितपणे गर्वाची बाब आहे.पोप फ्रान्सिस येत्या 13 ऑक्टोबर रोजी मरियम थ्रेसिया यांना संत म्हणून घोषित करतील. सिस्टर मरियम थ्रेसिया यांनी केवळ पन्नास वर्षांच्या आपल्या लहानशा आयुष्यात मानवतेच्या कल्याणासाठी जे कार्य केले, ते संपूर्ण जगासाठी एक अनोखे उदाहरण आहे. समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांना फार आपुलकी होती. त्यांनी अनेक शाळा, वसतिगृहे आणि अनाथाश्रम उभारले. सिस्टरथ्रेसिया यांनी जे कार्य केले, ते पूर्ण निष्ठेने, मनापासून आणि समर्पणाच्या भावनेतून पूर्ण केले. त्यांनी congregation of the sisters of the holy family ची स्थापना केली, जे आज सुद्धा त्यांची जीवनमूल्ये आणि मोहीम पूर्ण करत आहे. मी पुन्हा एकदा सिस्टर मरियम थ्रेसिया यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भारतीय लोकांचे, विशेषतः आमच्या ख्रिस्ती बंधू-भगिनींचे या यशाबद्दल मनापासून अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, संपूर्ण भारतासाठी नाही तर जगभरासाठी अभिमानाची बाब आहे की आज आपण गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असतानाच130 कोटी भारतवासीयांनी सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त होण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने भारताने जी नेतृत्वाची भूमिका घेतली आहे, ती पाहता, आज जगभरातील देशांच्या नजरा भारताकडे लागून राहिल्या आहेत. आपण सर्व 2 ऑक्टोबर रोजी सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी होणार आहात, असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी लोक आपापल्या पद्धतीने या मोहिमेत योगदान देत आहेत, मात्र आमच्या देशातील एका युवकाने एका अनोख्या पद्धतीने एक मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाकडे जेव्हा माझे लक्ष गेले, तेव्हा मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचा हा नवा प्रयोग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्याशी झालेला संवाद देशातील इतर काही लोकांनाही उपयुक्त वाटेल. श्रीयुत रीपुदमन बेल्वीजी एक अनोखा प्रयत्न करत आहेत. ते  प्लॉगींग  करतात.  जेव्हा मी पहिल्यांदा प्लॉगींग  हा शब्द ऐकला, तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा नवीन होता. परदेशात कदाचित हा शब्द वेगळ्या प्रकारे वापरला जातो. मात्र भारतात रीपुदमन बेल्वीजीयांनी याचा फार मोठा प्रसार केला आहे. या,  त्यांच्याशी जरा गप्पा मारु या.

 

मोदी जी : हॅलो रीपुदमनजी, नमस्कार मी नरेंद्र मोदी बोलतो आहे.

रिपुदमन : हो सर नमस्कार. खूप खूप आभार सर.

मोदी जी : रिपुदमन जी

रिपुदमन : हो सर.

मोदी जी: आपण प्लॉगींग  संदर्भात जे काम इतक्या समर्पित भावनेने करत आहात.

रिपुदमन : हो सर

मोदी जी: तर माझ्या मनात याबाबत उत्सुकता होती. मला वाटले की मी स्वतः फोन करून आपल्याला त्याबद्दल विचारावे.

रिपुदमन: अरे वा

मोदी जी : ही कल्पना आपल्या मनात कशी बरं आली?

रिपुदमन : हो सर

मोदी जी : हा शब्द, ही पद्धत आहे, ती कशी मनात आली

रिपुदमन : सर, आजच्या युवकांना काहीतरी कूल हवे असते, काहीतरी स्वारस्यपूर्ण हवे असते. त्यांना चालना देण्यासाठी तर मी स्वतः प्रेरित झालो. जर मला130 कोटी भारतीयांना या मोहिमेत माझ्यासोबत घेऊन पुढे जायचे असेल, तर मला काहीतरी कूल करायचे होते, काहीतरी स्वारस्यपूर्ण करायचे होते. तर, मी स्वतः एक धावपटू आहे.सकाळी जेव्हा आम्ही धावायला जातो, तेव्हा रहदारी कमी असते, लोक कमी असतात. अशावेळी कचरा, घाण आणि प्लास्टिक सर्वात जास्त दिसते.अशा वेळी तक्रार करण्याऐवजी किंवा कटकट करण्याऐवजी मला असे वाटले की याबद्दल काही करता येईल आणि माझ्या धावपटूंच्या गटासोबत दिल्लीमध्ये सुरुवात केली आणि संपूर्ण भारतभरात ही मोहिम घेऊन गेलो. सगळीकडेच फार कौतुक झाले.

मोदी जी : आपण नक्की काय करत होता, थोडं समजावून सांगा, म्हणजे मलाही समजेल आणि मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना सुद्धा समजेल.

रिपुदमन :सर तर आम्ही‘Run & Clean-up Movement’ ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत आम्ही धावणाऱ्या गटांना त्यांच्या व्यायामानंतर त्यांच्या कुल डाऊन ऍक्टिव्हिटी मध्ये कचरा उचलायची सूचना केली. प्लास्टिक उचला, असे सांगितले. तर जेव्हा आपण सकाळी धावत असता आणि त्याच वेळी आपण स्वच्छता करत असता तेव्हा त्या माध्यमातून आणखी काही व्यायाम प्रकार करू लागता. आपण केवळ धावत नसता, तर कचरा उचलतानाsquats करता, deep squats करता, lunges करता, forward bent करता. धावताना, दिसलेला कचरा उचलत गेलात तर त्यामुळे होणारी तुमची शारीरिक हालचाल एक समग्र व्यायाम होऊन जाईल. आपल्याला ऐकून आनंद वाटेल की गेल्यावर्षी आरोग्य विषयाला समर्पित अनेक मासिकांमध्ये भारतातील टॉप फिटनेस ट्रेंड म्हणून या गमतीदार प्रकाराला चक्क नामांकन मिळाले आहे…

मोदी जी : अरे व्वा, त्याबद्दल आपले अभिनंदन.

रिपुदमन   : धन्यवाद् सर|

मोदी जी: तर आता आपण 5 सप्टेंबरपासून कोच्चिहून सुरूवात केली आहे.

रिपुदमन : हो सर. या मोहिमेचे नाव आहे ‘R|Elan Run to make India Litter Free’ ज्याप्रमाणे आपणाला 2ऑक्टोबर या दिवसाला ऐतिहासिक दिवस म्हणून परिमाण द्यायचे आहे, त्याचप्रमाणे मला असे वाटते की जेव्हा देश कचरामुक्त होईल, तेव्हाच प्लास्टिक मुक्त सुद्धा होईल आणि ती एक वैयक्तिक जबाबदारी सुद्धा असेल. आणि म्हणूनच मी पन्नास शहरांमध्ये काही हजार किलोमीटर धावत आहे आणि तेवढे अंतर स्वच्छ करत आहे. सर्वांनी मला सांगितले की जगातील ही सर्वात प्रदीर्घ अशी स्वच्छता मोहीम असेल आणि त्याच बरोबर आम्ही आणखीन एक कूल गोष्ट केली. सोशल मीडियावर आम्ही PlasticUpvaas या हॅशटॅगचा वापर केला. प्लास्टिक उपवास कसा करावा, तर जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आपण आम्हाला सांगा, अशी कोणती एक वस्तू आहे, एक वस्तू, केवळ प्लास्टिक नाही तर एकदाच वापरली जाणारी अशी कोणती गोष्ट आहे, जी आपण पूर्णपणे आपल्या आयुष्यातून हद्दपार कराल?

मोदी जी: अरे वा… आपण 5 सप्टेंबर रोजी रवाना झाले आहात, तर आपला आतापर्यंतचा अनुभव काय आहे…

रिपुदमन: सर, आतापर्यंतचा अनुभव फारच चांगला आहे. गेल्या दोन वर्षात संपूर्ण भारतभरात आम्ही तीनशेच्या आसपास प्लॉगींग मोहिमा राबवल्या आहेत. जेव्हा आम्ही कोच्चीपासून सुरुवात केली, तेव्हा धावणारे गटही आमच्यासोबत आले. तेथील स्थानिक स्वच्छता करणाऱ्यांनाही मी माझ्यासोबत घेतले. कोचीननंतर मदुराई, कोयंबतूर, सालेम आणि आत्ताच आम्ही उडुपीमध्ये ही मोहीम राबवली. तेथे एका शाळेचे आमंत्रण आले, तेव्हा अगदी लहान लहान मुले, सर, इयत्ता तिसरीपासून सहावी पर्यंतची मुले. त्यांना एका कार्यशाळेसाठी बोलावले होते. अर्धा तासासाठीच्या त्या कार्यशाळेचे रूपांतर तीन तासांच्या प्लॉगिंग मोहिमेमध्ये झाले. सर, कारण मुले इतकी उत्साही होती की त्यांना हे करुन बघायचे होते आणि आपल्या घरीसुद्धा सांगायचे होते, आपल्या पालकांना सांगायचे होते, आपल्या शेजाऱ्यांना सांगायचे होते. मुले ही सर्वात मोठी प्रेरणा असतात त्यामुळे आम्हाला त्या सर्वांना पुढे घेऊन जावे लागले.

मोदी जी : रिपु जी, हे केवळ परिश्रम नाहीत तर ही एक साधना आहे. आपण खरोखरच साधना करत आहात.

रिपुदमन   :हो सर

मोदी जी: मी आपले मनापासून अभिनंदन करतो.आता मला सांगा,तुम्हाला देशवासियांना  तीन गोष्टी सांगायच्या असतील तर अशा कोणत्या तीन विशिष्ट गोष्टींचा संदेश आपण द्याल?

रिपुदमन : घाण मुक्त भारतासाठी, कचरामुक्त भारतासाठी मी खरे तर तीन टप्पे सांगू इच्छितो. पहिला टप्पा म्हणजे आपण कचरा कचरापेटीत टाकावा. दुसरा टप्पा म्हणजे जिथे कुठे आपल्याला कचरा दिसेल, जमिनीवर पडलेला, तो उचलावा आणि कचरापेटीत टाकावा. तिसरा टप्पा म्हणजे कचरापेटी दिसत नसेल तर कचरा आपल्या खिशात ठेवावा किंवा आपल्या गाडीमध्ये ठेवावा. घरी घेऊन जावे,कोरडा कचरा आणि ओला कचरा असे त्याचे वर्गीकरण करावे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेची गाडी येईल तेव्हा तो त्यात टाकावा. जर आपण या तीन टप्प्यांचा अवलंब केला तर आपल्याला निश्चितच कचरामुक्त भारत दिसू शकतो.

मोदी जी : बघा रिपु जी, फारच सोप्या शब्दात आणि साध्या भाषेत आपण एक प्रकारे गांधीजींचे स्वप्न उराशी बाळगून पुढे चालला आहात. त्याचबरोबर सोप्या शब्दात आपले मत मांडायची गांधीजींची जी पद्धत होती, ती सुद्धा आपण अंगिकारली आहे.

रिपुदमन : धन्यवाद

मोदी जी : आपण निश्चितच यासाठी अभिनंदनास पात्र आहात. आपल्यासोबत संवाद साधून मला खरोखर मनापासून आनंद झाला आहे. आपण एका नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि विशेष म्हणजे, युवकांना आवडेल अशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम राबवत आहात. मी आपले मनापासून अभिनंदन करतो. आणि मित्रहो, यावर्षी आदरणीय बापूंच्या जयंतीनिमित्त क्रीडा मंत्रालय सुद्धा ‘Fit India Plogging Run’चे आयोजन करत आहे. दोन ऑक्टोबर रोजी दोन किलोमीटर प्लॉगिंग. संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम कसा करावा,कार्यक्रमात काय असावे, हे रिपुदमन यांच्या अनुभवातून आपण ऐकले आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत आपण सर्व दोन किलोमीटर अंतर चालणार असू तर त्या वेळात रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकचा कचरा गोळा करावा. यामुळे आपण केवळ आपल्या आरोग्याची काळजी घेणार नाही तर धरतीच्याही आरोग्याची काळजी घेऊ शकू. या मोहिमेद्वारे लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीबरोबरच स्वच्छतेबाबतची जागरूकताही वाढत आहे.130 कोटी भारतीयांनी सिंगल यूज प्लास्टीक वापरापासून मुक्त होण्याच्या दिशेनेएक पाऊल उचलले तर अवघा भारत एकाच वेळी 130 कोटी पावले पुढे जाईल असा विश्वास मला वाटतो. रिपुदमनजी, पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. आपणाला, आपल्या चमुला आणि आपल्या या कल्पकतेला  माझ्या तर्फे अनेक शुभेच्छा.

धन्यवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन ऑक्टोबरच्या पूर्वतयारीमध्ये देश आणि संपूर्ण जग गुंतले आहे. मात्र आम्हाला ‘गांधी 150’ हे उद्दीष्ट कर्तव्यपथावर आणायचे होते. आपले आयुष्य देशहितार्थ अर्पण करण्यासाठी पुढे जायचे होते. एका गोष्टीबद्दल मी थोडे आगाऊ सांगू इच्छितो. खरे तर पुढच्या मन की बात कार्यक्रमात त्याबद्दल विस्ताराने नक्कीच सांगेन, मात्र आज मी जरा आधीच अशासाठी सांगतो आहे की आपल्याला तयारी करण्याची संधी मिळावी. आपल्या लक्षात असेल की 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे आपले सर्वांचे स्वप्न आहे आणि त्याच निमित्ताने प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर रोजी आम्ही संपूर्ण देशात ‘Run for Unity’ अर्थात देशाच्या एकतेसाठी धावण्याची ही स्पर्धा आयोजित करतो. सर्वजण, आबालवृद्ध, शाळा-महाविद्यालयातील सर्वजण हजारोंच्या संख्येने भारताच्या लक्षावधी गावांमधून त्या दिवशी देशाच्या एकतेसाठी धाव घेतील. तर आपण त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. याबद्दल सविस्तर पुढे बोलणारच आहे, मात्र अजून वेळ आहे. काही लोकांना सरावाला सुरुवात करता येईल, इतर काही योजनाही तयार करता येतील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की 15 ऑगस्ट रोजी मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की 2022 सालापर्यंत आपण भारतातील पंधरा ठिकाणांना भेट द्यावी. किमान पंधरा ठिकाणी आणि एक-दोन रात्रींच्या मुक्कामाचा कार्यक्रम करावा. आपण भारत पाहावा, समजून घ्यावा, अनुभवावा. आपल्याकडे एवढे वैविध्य आहे. आणि जेव्हा दिवाळीच्यासणानिमित्त लोक सुट्ट्यांवर येतात, तेव्हा नक्कीच फिरायला जातात, म्हणूनच मी पुन्हा एकदा आग्रह करतो की आपण भारतातील कोणत्याही पंधरा ठिकाणी नक्कीच फिरायला जावे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आता परवाच 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात आला आणि जगातील काही जबाबदार संस्था पर्यटन विषयक क्रमवारी सादर करतात. पर्यटनाविषयीच्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या स्थानात सुधारणा झाली आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. विशेषतः पर्यटनाचे महत्त्व जाणून घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे. स्वच्छता मोहिमेचेही यात फार मोठे योगदान आहे. आणि ही सुधारणा किती काळात झाली आहे, सांगू का? तुम्हाला हे जाणून निश्चितच आनंद होईल. आज आपण 34 व्या स्थानावर आहोत आणि पाच वर्षांपूर्वी आपण 65 व्या स्थानावर होतो. म्हणजेच आपण फार मोठी झेप घेतली आहे. जर आपण आणखी प्रयत्न केले तर स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना आपण जगातील मुख्य पर्यटन स्थळांमध्ये निश्चितच वरचे स्थान मिळवू शकू.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा, वैविध्याने परिपूर्ण अशा भारतातील विविध सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. हो. एका गोष्टीची नक्की काळजी घ्या. दिवाळीच्या या दिवसांमध्ये कुठेही फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना होऊ नयेत, कोणाही व्यक्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी आपण निश्चितच खबरदारी घ्यावी. आनंद झाला पाहिजे, उत्साह सुद्धा असला पाहिजे. आपले हे सण एकत्र येऊन साजरे केले जातात, एकत्रितपणे साजरे केले जातात, त्यामुळे या सामूहिकतेतून संस्कार सुद्धा प्राप्त होतात, सामूहिक जीवनाचे एक नवे सामर्थ्य प्राप्त होते. आणि अशा नव्या सामर्थ्याच्या साधनेला निमित्त ठरतात, ते आपले सण. या, आपण सर्व मिळून उत्साहाने, आनंदाने, नवी स्वप्ने आणि नव्या संकल्पासह हे सण साजरे करूया. पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा. धन्यवाद!!!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.