माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.
मित्रांनो, भारतासमोर प्रत्येक युगात काही आव्हाने उभी राहिली आणि प्रत्येक युगात असे काही असामान्य भारतीय जन्माला आले ज्यांनी या आव्हानांचा सामना केला. आजच्या 'मन की बात' मध्ये मी धैर्य आणि दूरदृष्टी असणाऱ्या अशा दोन महान वीरांविषयी बोलणार आहे. देशाने त्यांची 150 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्या नंतर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांचे 150 वे जयंती वर्ष सुरू होणार आहे. या दोन्ही महापुरुषांसमोर उभी ठाकलेली आव्हाने वेगवेगळी होती, पण दोघांची दृष्टी एकच होती, ती म्हणजे ‘देशाची एकता.
मित्रांनो, गेल्या काही वर्षांत देशाने अशा महान नायक-नायिकांची जयंती नव्या उत्साहाने साजरी करून नव्या पिढीला नवी प्रेरणा दिली आहे. आपल्याला आठवत असेल, जेव्हा आपण महात्मा गांधींची 150 वी जन्मजयंती साजरी केली होती, तेव्हा खूप विशेष घडून आले होते. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरपासून ते आफ्रिकेतील लहान गावांपर्यंत, जगभरातील लोकांनी सत्य आणि अहिंसेचा भारताचा संदेश समजावून घेतला, जाणून घेतला आणि तो संदेश प्रत्यक्ष आयुष्यात अंगिकारला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत, भारतीयांपासून परदेशी लोकांपर्यंत सर्वांनीच गांधीजींची शिकवण नव्या संदर्भात समजून घेतली. नवीन जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती शिकवण जाणून घेतली. जेव्हा आपण स्वामी विवेकानंदांची 150 वी जयंती साजरी केली, तेव्हा देशातील तरुणांना भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नवीन काळाच्या परिभाषेत समजून घेता आली. या योजनांमुळे आपल्याला जाणीव झाली की आपले महापुरुष भूतकाळाच्या ओघात हरवलेले नाहीत, तर त्यांचे जीवन आपल्या वर्तमानाला भविष्याचा मार्ग दाखवत आहे.
मित्रांनो, सरकारने जरी या महान व्यक्तींची 150 वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी केवळ आपला सहभागच या मोहिमेला संजीवनी देईल आणि ती मोहीम जिवंत करेल. मी तुम्हा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो. लोहपुरुष सरदार पटेल यांच्याविषयीचे तुमचे विचार आणि कार्य #Sardar150 ह्या हॅशटॅगसह लिहा आणि धरती-आबा बिरसा मुंडा ह्यांची प्रेरणा #BirsaMunda150 ह्या हॅशटॅगसह प्रसिद्ध करा. चला, आपण सगळे एकत्र येऊन हा उत्सव भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव करू या, आपल्या महान वारश्याचा आणि विकासाचा उत्सव करू या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला ते दिवस आठवत असतीलच जेव्हा टीव्हीवर “छोटा भीम” दिसायला सुरुवात झाली होती. मुले तर हे कधीच विसरणार नाहीत
'छोटा भीम' बद्दल किती उत्साह होता! आपल्याला आश्चर्य वाटेल की आज 'ढोलकपूर का ढोल' फक्त भारतातीलच नव्हे तर इतर अनेक देशांतील मुलांना आकर्षित करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या इतर ॲनिमेटेड मालिका, ‘कृष्णा’, ‘हनुमान’, ‘मोटू-पतलू’ यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय ॲनिमेशनपात्रे, आपले ॲनिमेशन चित्रपट त्यांच्या आशय आणि सर्जनशीलतेमुळे जगभर नावाजले जात आहेत. आपल्याला लक्षात आलेच असेल की स्मार्टफोनपासून ते सिनेमाच्या स्क्रीनपर्यंत, गेमिंग कन्सोलपासून ते व्हर्च्युअल रिॲलिटीपर्यंत सर्वत्र ॲनिमेशन आहे. ॲनिमेशनच्या विश्वात भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग अवकाशही झपाट्याने विस्तारत आहे. भारतीय खेळही (गेम्सही)सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत. काही महिन्यांपूर्वी, मी भारतातील आघाडीच्या गेमर्सना भेटलो होतो, तेव्हा मला भारतीय गेम्सची (खेळांची) विस्मयकारक सर्जनशीलता आणि गुणवत्ता जाणून घेण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. खरंच, देशात सर्जनशील ऊर्जेची लाट आली आहे. ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव आहे. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आज भारतीय प्रतिभा आणि कौशल्य विदेशी निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग बनत आहेत. आत्ताचा स्पायडर-मॅन असो वा ट्रान्सफॉर्मर्स, या दोन्ही चित्रपटांमधील हरिनारायण राजीव यांच्या योगदानाची लोकांनी भरपूर प्रशंसा केली आहे. भारतातील ॲनिमेशन स्टुडिओज, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत आहेत.
मित्रांनो, आज आपले युवक असे मूळ भारतीय कंटेंट तयार करत आहेत, ज्यात आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. हे जगभरात पाहिले जात आहे. ॲनिमेशन क्षेत्र आज असा उद्योग झाला आहे जो इतर उद्योगांनाही बळ देत आहे, जसे की, सध्या VR पर्यटन ( आभासी सहल) खूप प्रसिद्ध होत आहे. तुम्ही आभासी पर्यटनाद्वारे अजिंठा लेणी पाहू शकता, कोणार्क मंदिराच्या परिसरात फिरू शकता किंवा वाराणसीच्या घाटांवर जाण्याचा आनंद घेऊ शकता. हे सर्व व्हीआर ॲनिमेशन भारतीय निर्मात्यांनी तयार केले आहेत. VR च्या माध्यमातून ही ठिकाणे पाहिल्यानंतर अनेकांना या पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण होते आहे, म्हणजे पर्यटन स्थळाची आभासी सहल हे लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचे माध्यम बनले आहे. आज, या क्षेत्रात, ॲनिमेटर्ससोबतच कथाकथनकार, लेखक, व्हॉइस-ओव्हर तज्ञ, संगीतकार, गेम डेव्हलपर्स, VR आणि AR तज्ञांची मागणी देखील सातत्याने वाढते आहे. म्हणून, मी भारतातील तरुणांना म्हणेन - तुमची सर्जनशीलता वाढवा. कोणास ठाऊक, कदाचित जगातील पुढचे सुपरहिट ॲनिमेशन तुमच्या संगणकातून निर्माण होईल! भविष्यातील एखादा व्हायरल गेम तुमची निर्मिती असू शकेल! शैक्षणिक ॲनिमेशनमधील तुमचा नवा उपक्रम मोठे यश मिळवू शकेल. या 28 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या 'जागतिक ॲनिमेशन दिवस ' देखील साजरा केला जाणार आहे. चला, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंदांनी एकदा यशाचा मंत्र दिला होता, त्यांचा मंत्र होता- 'एक कल्पना घ्या, तिलाच आपले आयुष्य बनवा, तिचा विचार करा, तिचेच स्वप्न पहा आणि ती कल्पना प्रत्यक्षात जगा, प्रत्यक्षात आणा. आज आपले आत्मनिर्भर भारत अभियानही त्याच यशाच्या मंत्रानुसार सुरू आहे. हे अभियान आपल्या सामूहिक चेतनेचा एक भाग बनले आहे. सतत, पावलापावलांवर आमचे प्रेरणास्रोत बनले आहे. स्वावलंबन ( आत्मनिर्भरता ) हे आता आपले केवळ धोरण राहिलेले नाही तर ती आपली उत्कट आवड झाली आहे.
फार वर्षे झाली नाहीत, अगदी १० वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, तेव्हा कोणी म्हणाले की भारतात काही क्लिष्ट तंत्रज्ञान विकसित करायचे आहे, तर अनेकांचा त्यावर विश्वास बसायचा नाही, कोणी कोणी तर चेष्टा देखील करायचे. पण आज तेच लोक भारताचे यश पाहिल्यानंतर चकित होत आहेत. स्वावलंबी होणारा भारत, प्रत्येक क्षेत्रात चमत्कार करत आहे. तुम्हीच विचार करा, कोणे एके काळी मोबाईल फोनची आयात करणारा भारत आज मोबाईल फोनचा जगातला दुसरा क्रमांकाचा मोठा उत्पादक देश ठरला आहे. एकेकाळी संरक्षण सामुग्रीचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आज 85 देशांमध्ये त्याची निर्यातही करत आहे. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे आणि एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते ती म्हणजे स्वावलंबनाची ही मोहीम आता केवळ सरकारी मोहीम राहिलेली नाही, तर आता आत्मनिर्भर भारत अभियान हे लोक अभियान झालं आहे - प्रत्येक क्षेत्रात यश मिळवते आहे.
उदाहरणार्थ, या महिन्यात आपण लडाखमधील हानले येथे आशियातील सर्वात मोठ्या 'इमेजिंग टेलिस्कोप MACE' चे उद्घाटन केले आहे. ही दुर्बीण 4300 मीटर उंचीवर आहे. त्यात अजून विशेष काय आहे हे सांगायचे झाले तर ही भारतात बनवलेली दुर्बीण आहे. ‘मेड इन इंडिया’ आहे. कल्पना करा, ज्या ठिकाणी उणे ३० अंश तापमान असते, कडाक्याची थंडी आहे, जिथे ऑक्सिजनचीही कमतरता आहे, तिथे आपल्या शास्त्रज्ञांनी आणि स्थानिक उद्योगांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे जी आशियातील इतर कोणत्याही देशाने केलेली नाही. हानलेची दुर्बीण दूरच्या विश्वाकडे पाहत असेल, पण ती आपल्याला आणखी एक गोष्ट दाखवत आहे आणि ती म्हणजे आत्मनिर्भर भारताची शक्ती.
मित्रांनो, तुम्ही पण एक काम करावे अशी माझी इच्छा आहे. स्वावलंबी होणाऱ्या भारताची आणि अशा प्रयत्नांची जास्तीत जास्त उदाहरणे सामायिक करा. तुमच्या आसपासच्या परिसरात तुम्ही एखादा नवीन शोध पाहिला, कोणत्या स्थानिक स्टार्ट-अपने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केले, ही माहिती #AatmanirbharInnovation ह्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर लिहा आणि आत्मनिर्भर भारत उत्सव साजरा करा. सणासुदीच्या या काळात आपण सर्वांनी आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला आणखी बळ देऊया. लोकलसाठी व्होकल या मंत्रानुसार आपली खरेदी करू या.
हा असा नव भारत आहे जिथे अशक्य हे फक्त एक आव्हान आहे, जिथे मेक इन इंडिया आता मेक फॉर वर्ल्ड झाली आहे, जिथे प्रत्येक नागरिक एक कल्पक संशोधक (innovator) आहे, जिथे प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे. आपल्याला भारताला केवळ स्वावलंबी बनवायचे नाही, तर संशोधनाचे (innovation) जागतिक शक्ती केंद्र (पॉवरहाऊस) म्हणून आपला देश मजबूत करायचा आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला एक ध्वनिमुद्रण ( ऑडियो) ऐकवतो.
फसवणूक करणारा कॉलर 1: हॅलो
पीडित : सर, नमस्कार सर.
फसवणूक करणारा कॉलर 1: नमस्कार
पीडित : सर बोला सर
फसवणूक करणारा कॉलर 1: हे बघा, तुम्ही आम्हाला पाठवलेला हा एफआयआर नंबर आहे, या क्रमांकाविरुद्ध आमच्याकडे 17 तक्रारी आलेल्या आहेत, तुम्ही वापरता का हा नंबर ?
पीडित: मी हा वापरत नाही सर.
फसवणूक करणारा कॉलर 1: तुम्ही आत्ता कुठून बोलत आहेस?
पीडित: सर कर्नाटक सर, मी आता घरी आहे.
फसवणूक करणारा कॉलर 1: ठीक आहे, चला, आता तुम्ही तुमचे स्टेटमेंट रेकॉर्ड करा जेणेकरून हा नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो. तुम्हाला भविष्यात कोणतीही समस्या येणार नाही, ठीक आहे?
पीडित : होय सर
फसवणूक करणारा कॉलर 1: आता मी हा फोन ज्याला जोडत आहे, तो तुमचा तपास करणारा अधिकारी आहे. कृपया तुमचे स्टेटमेंट रेकॉर्ड करा जेणेकरून हा नंबर ब्लॉक केला जाऊ शकेल, ठीक आहे?
पीडित : होय सर
फसवणूक करणारा कॉलर 1: हां , मला सांगा, मी कोणाशी बोलत आहे? मला तुमचे आधार कार्ड दाखवा, त्याची सत्यता पडताळून पाहायची आहे.
पीडित: सर, माझ्याकडे आत्ता आधार कार्ड नाही आहे सर, कृपया सर.
फसवणूक करणारा कॉलर 1: फोन? तुमच्या फोनमध्ये आहे का?
पीडित : नाही सर
फसवणूक करणारा कॉलर 1: तुमच्या जवळ फोनमध्ये आधार कार्डचे छायाचित्र नाही का?
पीडित : नाही सर
फसवणूक करणारा कॉलर 1: तुम्हाला नंबर आठवतो का?
पीडित : सर, नाही, मला नंबरही आठवत नाही, सर.
फसवणूक कॉलर 1: आम्हाला फक्त पडताळणी करावी लागेल, ठीक आहे?
पीडित : नाही सर
फसवणूक करणारा कॉलर 1: घाबरू नका, घाबरू नका, जर तुम्ही काही केले नसेल तर घाबरू नका
पीडित : होय सर, होय सर
फसवणूक करणारा कॉलर 1: जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याची पडताळणी करण्यासाठी मला दाखवा.
पीडित : नाही सर, नाही सर, मी गावी आलो सर, ते तिकडे घरीच आहे.
फसवणूक करणारा कॉलर 1: ठीक आहे
दुसरा आवाज मे आय कम इन सर{ आत येऊ का सर}
फसवणूक करणारा कॉलर 1: आत या
फसवणूक करणारा 2: जय हिंद
फसवणूक करणारा 1: जय हिंद
फसवणूक करणारा कॉलर 1: प्रोटोकॉलनुसार या व्यक्तीचा एकतर्फी व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करा, ठीक आहे.
हे ध्वनिमुद्रण केवळ माहितीसाठी नाही, हा काही मनोरंजनासाठी केला गेलेला audio नाही आहे, हा audio एक गंभीर समस्या घेऊन आलेला आहे. आपण आत्ता जो संवाद एकलात तो digital arrest च्या फसवणुकीचा आहे. हा संवाद एक फसवला गेलेला आणि fraud करणारा यांच्यातला आहे. Digital Arrest च्या fraud मध्ये phone करणारे कधी पोलिस, कधी C.B.I., कधी Narcotics, कधी R.B.I., अशी वेगवेगळी label लावून तोतया अधिकारी बनून बोलतात आणि खूप आत्मविश्वासने ने बोलतात. मला अनेक श्रोत्यानी सांगीतलं की ‘मन की बात’ मध्ये याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. या मी तुम्हाला सांगतो या fraud करणाऱ्या टोळ्या कसं काम करतात, हा धोकादायक खेळ काय आहे ? तुम्हाला हे समजणे खूप गरजेचं आहे आणि इतरांना समजणेही तेवढंच आवश्यक आहे.
पहिला डाव - तुमची सर्व वैयक्तिक माहिती ते जमवतात “तुम्ही मागच्या महिन्यात गोव्याला गेला होतात, हो ना ? तुमची मुलगी दिल्लीला शिकते, हो ना ?” त्यांनी तुमच्याबाबतीत एवढी माहिती जमवलेली असते की तुम्ही अचंबित होता.
दुसरा डाव – भयभीत करुन सोडणे, पोषाख, सरकारी कार्यालयाचा set up, कायद्यातली कलमं, बोलता बोलता फोनवर ते तुम्हाला इतकं घाबरवतील की तुम्ही विचारही करु शकणार नाही. आणि मग त्यांचा तिसरा डाव सुरु होतो.
तिसरा डाव – वेळेचा धाक “आत्ताच निर्णय घ्यावा लागेल नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल.” हे लोक इतका मानसिक दबाव आणतात की ऐकणारा पूर्ण घाबरून जातो. Digital Arrest चे बळी सर्व वर्ग आणि सर्व वयोगटातील लोक आहेत. लोकानी आपल्या मेहनतीने कमवलेले लाखो रुपये घाबरून घालवले आहेत. कधीही आपल्याला असा call आला तर आपण घाबरायच नाही. तुम्हाला हे माहीत असायला हवं की पडताळणी यंत्रणा, phone call किंवा video call वर अशा प्रकारची चौकशी कधीच करीत नाही. मी तुम्हाला digital सुरक्षिततेच्या तीन पायऱ्या सांगतो. या तीन पायऱ्या म्हणजे – थांबा – विचार करा – कृती करा. Call येताच थांबा – घाबरु नका, शांत रहा, घाईघाईने कुठलंही पाऊल उचलू नका, कुणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नका, शक्य असेल तर screenshot घ्या आणि recording नक्की करा. यानंतरची दुसरी पायरी, पहिली पायरी होती थांबा, दुसरी पायरी आहे विचार करा. कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवर अशी धमकी देत नाही, तसेच video call वर चौकशीही करीत नाही, आणि पैशाची मागणीही करीत नाही – जर भीती वाटली तर समजून जा की काहीतरी गडबड आहे. आणि पहिली पायरी, दुसरी पायरी आणि आता मी सांगतो तिसरी पायरी. पहिल्या पायरीत मी सांगितलं – थांबा, दुसऱ्या पायरीत मी सांगितलं – विचार करा, आता तिसरी पायरी सांगतो – कृती करा. राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा, cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा, परिवाराला आणि पोलिसांना सूचित करा, पुरावे सुरक्षित ठेवा. “थांबा”, नंतर “विचार करा”, आणि मग कृती करा या तीन पायऱ्या आपल्या डिजिटल सुरक्षेच्या रक्षक ठरतील.
मित्रांनो, मी पुन्हा सांगतो Digital arrest अशी कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही, हा fraud आहे, फसवणूक आहे, खोटे आहे, बदमाशांचा घाला आहे, आणि जे लोक हे करतात ते समाजाचे शत्रू आहेत. Digital arrest च्या नावाने जी फसवणूक चाललेली आहे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक शोध संस्था, राज्य सरकार बरोबर काम करीत आहेत. या संस्थांमध्ये ताळमेळ राहावा म्हणून National Cyber Co Ordination Centre ची स्थापना केली गेली आहे. एजन्सीज कडून अशा fraud video calling ID ला Block केले गेले आहे. लाखो Sim Card, Mobile Phone आणि Bank Accounts ना ही Block केले गेले आहे. एजन्सीज आपले काम करीत आहेत, पण Digital arrest च्या नावाने होणा-या scam पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाची जागरुकता, प्रत्येक नागरिकाची जागरुकता आवश्यक आहे. जे लोक या प्रकारच्या cybar fraud चे बळी ठरतात, त्यांनी जास्तीत जास्त लोकाना याबद्दल सांगायला हवे. तुम्ही जागरुकतेसाठी #safeDigitalIndia चा वापर करु शकता. मी शाळा आणि महाविद्यालयाना सांगीन की cyber scam च्या विरूद्धच्या मोहिमेत विद्यार्थ्यानाही सहभागी करून घ्यावे. समाजातील सगळ्याच्या प्रयत्नानेच आपण या आव्हानाच सामना करू शकतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपली बरीच शाळकरी मुले calligraphy म्हणजेच सुलेखन या विषयात रस घेतात. यामुळे आपले अक्षर साफ, सुंदर, आणि आकर्षक होते. आज जम्मू – काश्मीर मध्ये याचा उपयोग स्थानिक संस्कृतीला लोकप्रिय बनवण्यासाठी केला जात आहे. इथल्या अनंतनागच्या फिरदोसा बशीरजी यांनी calligraphy मध्ये नैपुण्य मिळवले आहे. या माध्यमातून त्या स्थानिक संस्कृतीतील कितीतरी पैलू समोर आणत आहेत. फिरदोसाजीच्या calligraphy ने स्थानिक लोक विशेषतः युवकाना आपल्याकडे आकर्षित केले आहे. असाच एक प्रयत्न उधमपूरचे गौरीनाथजीही करीत आहेत. एक शतकाहून अधिक जुन्या सारंगीच्या माध्यमातून ते डोगरा संस्कृति आणि परंपरेच्या विविध रुपाना जतन करीत आहेत. सारंगीच्या स्वरांनी ते आपल्या संस्कृतीतील प्राचीन कहाण्या आणि ऐतिहासिक घटनांना आकर्षक पद्धतीने सांगतात. देशातील वेगवेगळ्या भागातही तुम्हाला कितीतरी लोक सापडतील जे सांस्कृतिक परांपरांच्या संवर्धनासाठी पुढे येत आहेत. डी.वय्यकुंठम जवळ जवळ ५० वर्षापासून चेरियाल लोक कला (folk art) ला लोकप्रिय बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेलंगणाच्या या कलेला पुढे नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न अद्भुत आहे. चेरियाल पेंटिंगस (paintings) तयार करण्याची प्रक्रिया खूपच वेगळी आहे. ही एक scroll च्या स्वरुपात ‘कहाण्याना’ समोर आणतात. यात आपल्या इतिहास आणि पुराण कथांची पूर्ण झलक मिळते. छत्तीसगढमध्ये नारायणपुर येथील बुटलूराम माथराजी अबुझ माडीया जनजातीच्या लोककलेला जतन करीत आहेत. मागील चार दशका पासून ते आपले हे व्रत चालवित आहेत. त्यांची ही कला ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ' आणि ‘स्वच्छ भारत’ सारख्या अभियानानमध्ये लोकाना सहभागी करून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे.
मित्रानो, आपण आत्ता बोलत होतो की काश्मीरच्या खोऱ्यापासून छत्तीसगढच्या जंगलांपर्यंत आपली कला आणि संस्कृती नवे नवे रंग उधळीत आहे, पण इथेच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या या कलांचा दरवळ दूर दूर पर्यंत पसरत आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील लोक भारतीय कला आणि संस्कृतीने मंत्रमुग्ध होत आहेत. जेव्हा मी तुम्हाला उधमपुर मधल्या सारंगीची गोष्ट सांगत होतो,
तेंव्हा मला आठवले की कसे हजारो मैल दूर, रशिया मधील याकूतस्क शहरातही भारतीय कलेच्या मधुर स्वरलहरी दुमदुमत आहे. कल्पना करा की, थंडीचा एखादा दिवस आहे, तापमान ऊणे 65 डिग्री, चारही बाजूला बर्फाची पांढरी चादर आणि तिथल्या एका प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बघत आहेत – कालिदास यांचे “अभिज्ञान शाकुंतलम्”. तुम्ही विचार करू शकता भारतीय साहित्याची ऊब जगातील थंड शहर याकूतस्क मध्ये..! ही कल्पना नाही सत्य आहे – आपल्या सर्वाना अभिमान आणि आनंद देणारे सत्य.
मित्रांनो, काही आठवड्यापूर्वी मी Laos मध्येही गेलो होतो. तो नवरात्रीचा काळ होता आणि मी तिथे काही अद्भुत पाहिले. स्थानिक कलाकार “फलक फलम” सादर करीत होते – ‘Laosच रामायण’.
त्यांच्या डोळ्यांमध्ये तिच भक्ति, त्यांच्या स्वरात तेच समर्पण, जे रामायणाच्या बाबतीत आपल्या मनात आहे. याच प्रकारे कुवेत मध्ये श्री अब्दुल्ला अल-बारून यांनी रामायण आणि महाभारताचा अरबी मध्ये अनुवाद केला आहे. हे कार्य म्हणजे केवळ अनुवाद नाही, तर दोन महान संस्कृतींमधील सेतू आहे. त्यांचा हा प्रयत्न अरब जगतात भारतीय साहित्याची एक नवीन समज विकसित करीत आहे. पेरू येथूनही आणखी एक उदाहरण आहे – एरलीनदा गारसिया (Erlinda Garcia) तेथील युवकाना भरतनाट्यम शिकवीत आहे. आणि मारिया वालदेस (Maria Valdez)
ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. या कलांनी प्रभावित होऊन दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशात ‘भारतीय शास्त्रीय नृत्या’चे पडघम वाजत आहेत.
मित्रानो, विदेशी धरतीवरील भारताची ही उदाहरणे दर्शवतात की भारतीय संस्कृतीची शक्ति किती अद्भुत आहे. ही जगाला आपल्याकडे आकर्षित करीत आहे.
“ जिथे जिथे कला आहे तिथे तिथे भारत आहे
“जिथे जिथे संस्कृती आहे तिथे तिथे भारत आहे “
आज जगभरातील लोक भारताला आणि भारतातील लोकांना जाणून घेऊ इच्छीत आहेत. म्हणूनच तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या आसपासच्या अशा सांस्कृतिक घडामोडीना #clultrualbridges चा भाग करा. ‘मन की बात’ मध्ये आपण अशा उदाहरणांची आपण पुढेही चर्चा करूयात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशातील मोठ्या भागात थंडीचा ऋतु सुरु झाला आहे, पण तंदुरुस्त राहण्याची तीव्र इछा, fit India चे चैतन्य यांना कोणत्याही ऋतूने काही फरक पडत नाही. ज्याला तंदुरुस्त राहायची सवय असते, तो थंडी, उन्हाळा, पावसाळा पाहत नाही. मला आनंद आहे की भारतात तंदुरुस्ती बाबत लोक जागरूक होत आहेत. आपल्या आसपासच्या बागामध्ये लोकांची संख्या वाढते आहे, हे आपणही पाहत असलाच. पार्क मध्ये फिरत असलेल्या वयोवृद्ध, तरुण आणि योग करणाऱ्या परिवारांना पाहून मला बरे वाटते. मला आठवते, जेव्हा मी योगदिनी श्रीनगरला होतो, तेव्हा पाऊस असूनही कितीतरी लोक योगसाधना करीत होते. आत्ता काही दिवसांपूर्वी श्रीनगर मध्ये जी मँरेथाँन (marathon) झाली त्यातही मला तंदुरुस्त राहण्याचा हाच उत्साह दिसून आला. Fit India ची ही भावना, आता एक सामाजिक चळवळ होत आहे.
मित्रांनो, मला हे बघूनही बरं वाटते की आपल्या शाळा मुलांच्या तंदुरुस्ती वर आता आणखी जास्त लक्ष देत आहेत. Fit India school Hours ही एक अभिनव कल्पना आहे. शाळा आपल्या पहिल्या तासाचा उपयोग वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी करीत आहेत. कितीतरी शाळामध्ये कधी मुलांकडून योगासन करून घेतली जातात, तर कधी aerobics ची सत्र होतात, तर कधी क्रीडा नैपुण्या वर काम केले जाते, कधी खो खो आणि कब्बड्डी सारखे पारंपरिक खेळ खेळवले जातात, आणि यांचे परिणामही छान आहेत. उपस्थिती वाढत आहे, मुलांची एकाग्रता वाढत आहे आणि मुलांना मजाही येत आहे.
मित्रांनो, मी निरोगी राहण्याची ही ऊर्जा सगळीकडे पाहत आहे. ‘मन की बात’ च्या खूप श्रोत्यांनी मला आपले अनुभव पाठवले आहेत. काहीतर फारच अभिनव प्रयोग करीत आहेत. जसे एक उदाहरण आहे family fitness hour चा, म्हणजे एक परिवार, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एक तास कौटुंबिक तंदुरुस्ती साठी देत आहे. एक आणखी उदाहरण indigenous games revival चे आहे, म्हणजे काही परिवार आपल्या मुलांना पारंपरिक खेळ शिकवीत आहेत आणि खेळूनही घेत आहेत. आपणही तंदुरुस्ती वेळापत्रकाचा अनुभव #fitIndia च्या नावाने समाज माध्यमांवर आवर्जून सामायिक करा. मी देशातील लोकांना एक जरूरी माहितीही देऊ इच्छितो. यावेळी ३१ ऑक्टोबर ला सरदार पटेलजींच्या जयंतीच्या दिवशीच दीपावली पर्वही आहे. आपण दरवर्षी ३१ ऑक्टोबरला “राष्ट्रीय एकता दिनीच ‘Run for Unity’ चे आयोजन करतो. दिपावली मुळे यावेळी २९ ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी ‘Run for Unity’ चे आयोजन केले जाईल. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने यात भाग घ्या, देशाच्या एकतेच्या मंत्रा बरोबरच तंदुरुस्तीच्या मंत्रालाही सगळीकडे पसरवा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये यावेळी एवढेच. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवत रहा. हा सणांचा काळ आहे. ‘मन की बात’च्या श्रोत्यांना धनत्रयोदशी, दिवाळी, छटपूजा, गुरुनानक जयंती आणि सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व पूर्ण उत्साहाने सण साजरे करा – vocal for local चा मंत्र लक्षात ठेवा, या सणांसाठी तुमच्या घरात स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केलेले सामान येईल असा प्रयत्न करा. एकदा पुन्हा, तुम्हा सर्वांना येणाऱ्या सणांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद !
Throughout every era, India has encountered challenges, and in every era, extraordinary Indians have risen to overcome the challenges. #MannKiBaat pic.twitter.com/c1B58ut36X
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
The gaming space of India is also expanding rapidly. These days, Indian games are also gaining popularity all over the world. #MannKiBaat pic.twitter.com/Xl9i4AQwHG
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
Let us take the resolve of making India a global animation power house. #MannKiBaat pic.twitter.com/t8QsYWkSFr
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
Aatmanirbhar Bharat Abhiyan is becoming a people's campaign. #MannKiBaat pic.twitter.com/Yh8DJtsDFC
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
Beware of Digital Arrest frauds!
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
No investigative agency will ever contact you by phone or video call for enquiries.
Follow these 3 steps to stay safe: Stop, Think, Take Action.#MannKiBaat #SafeDigitalIndia pic.twitter.com/KTuw7rlRDK
Inspiring efforts from Jammu and Kashmir to popularise the local culture. #MannKiBaat pic.twitter.com/yXts3uCED5
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
Remarkable efforts in Telangana and Chhattisgarh to celebrate the vibrant cultural legacy and unique traditions. #MannKiBaat pic.twitter.com/LmELbUkB6s
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
Today people across the world want to know India. #MannKiBaat pic.twitter.com/r6MFd6CDxX
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024
The spirit of Fit India is now becoming a mass movement. #MannKiBaat pic.twitter.com/MLoICYZHwo
— PMO India (@PMOIndia) October 27, 2024