Eager for your inputs for 100th episode of Mann Ki Baat: PM Modi to countrymen
It is a matter of satisfaction that today awareness about organ donation is increasing in the country: PM Modi
Huge role of Nari Shakti in rising the potential of India: PM Modi
The speed with which India is moving forward in the field of solar energy is a big achievement in itself: PM Modi
The spirit of 'Ek Bharat, Shreshtha Bharat' strengthens our nation: PM Modi

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या चर्चेला सुरूवात करताना मनात किती प्रकारचे भाव दाटून येत आहेत. आपली आणि आमची ही ‘मन की बात’ मध्ये सुरू झालेली साथ आज ९९ व्या पायरीवर य़ेऊन पोहचली आहे. साधारणतः आपण नेहमी ऐकतो की ९९ वी फेरी खूप अवघड असते. क्रिकेटमध्ये तर नर्व्हस नाईंटीज म्हणजे नव्वदी ओलांडणे अत्यंत अवघड मुक्काम मानला जातो. परंतु, जेथे भारतात जनमानसात ‘मन की बात’ असते, तेथे प्रेरणा काही वेगळीच असते. मला या गोष्टीचा आनंद आहे की, ‘मन की बात’ च्या शंभराव्या भागाबाबत आज देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मला खूप सारे संदेश येत आहेत, दूरध्वनी येत आहेत. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहोत, नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करत आहोत, तेव्हा शंभराव्या भागाबाबत आपल्या सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आपल्या या सूचना आणि मते 30 एप्रिल रोजी होणाऱ्या 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला अधिकच संस्मरणीय बनवतील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत.  यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.

मित्रांनो, आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या या टप्प्यात अवयव दान, एखाद्याला जीवन देणं हे एक मोठं माध्यम बनलं आहे.  असं म्हणतात की, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युनंतर त्याचं शरीर दान करते तेव्हा त्यातून ८ ते ९ जणांना एक नवं आयुष्य मिळायची शक्यता तयार होते. आनंदाची बाब ही आहे की आज देशात अवयव दान याप्रती जागरूकता वाढत चालली आहे. २०१३ या वर्षी, आमच्या देशात अवयव दानाच्या ५ हजारापेक्षाही कमी प्रकरणे होती. परंतु आज २०२२ मध्ये, त्यांची संख्या वाढून, १५ हजाराहून अधिक झाली आहे. अवयव दान करणाऱ्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबियांनी खरोखरच, खूप पुण्याचं काम केलं आहे.

मित्रांनो, प्रदीर्घ काळापासून मला वाटत होतं की असं पुण्य कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मन की  बात मी जाणून घ्यावी आणि ती देशवासियांबरोबर सामायिक करावी. म्हणून आज, मन की बात मध्ये आमच्यासोबत एक गोंडस मुलगी. एक सुंदर बाहुलीसारख्या मुलीचे पिता आणि त्यांची आई आमच्याशी जोडली जात आहे. वडिलांचे नाव सुखबीर सिंह संधूजी आणि आईंचं नाव सुप्रीत कौर जी आहे आणि हा परिवार पंजाबातील अमृतसर मध्ये राहतो. खूप नवससायास  केल्यावर त्यांना एक सुंदर बाहुलीसारखी कन्येची प्राप्ती झाली होती. घरातील लोकांनी तिचं नाव अत्यंत प्रेमानं ठेवलं होतं. अबाबत कौर. अबाबत याचा अर्थ आहे इतरांच्या सेवेशी जोडून घेणं, त्यांचे कष्ट दूर करण्याशी जोडून घेणं. अबाबत जेव्हा केवळ ३९ दिवसांची होती, तेव्हा ती हे जग सोडून गेली. परंतु सुखबीर सिंह संधूजी आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौर जी यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी एक अत्यंत प्रेरणादायक निर्णय घेतला. हा निर्णय होता, ३९ दिवसांच्या कन्येच्या अवयवांचं दान करणं. आमच्यासोबत आता फोन वर सुखबीर सिंह आणि त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत. या, त्यांच्याशी चर्चा करू या.

पंतप्रधान: सुखबीर जी नमस्ते.

सुखबीर जीः नमस्ते माननीय प्रधानमंत्री जी,. सत श्री अकाल

पंतप्रधान : सत श्री अकाल जी, सत श्री अकाल जी. सुखबीर जी, मी आज मन की बातसंबंधी विचार करत होतो तेव्हा मला वाटलं की अबाबतची गोष्ट इतकी प्रेरणादायक आहे तर आपल्याच तोंडून ती ऐकावी. कारण घरात जेव्हा एखाद्या कन्येचा जन्म होतो तेव्हा अनेक स्वप्ने अनेक आनंद घेऊन येतात, परंतु जेव्हा कन्या लवकर गेली तर ते दुःख किती भयंकर असते, त्याचा अंदाज मी लावू शकतो. ज्या प्रकारे आपण निर्णय़ घेतला, त्याबाबत मी सारी गोष्ट आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो.

सुखबीर जीः सर, ईश्वरानं आम्हाला खूप चांगली कन्या दिली होती. खूप लाडकी बाहुली आमच्या घरात आली होती. तिचा जन्म झाल्याबरोबरच  आम्हाला कळलं की तिच्या मेंदूत एक असा मज्जातंतूंचा गुंता बनला आहे की त्यामुळे तिच्या ह्रदयाचा आकार मोठा होत आहे. आम्ही अस्वस्थ झालो की मुलीची प्रकृती तर इतकी चांगली आहे, इतकी सुंदर मुलगी आहे, आणि इतकी मोठी समस्या घेऊन जन्माला आली आहे. तर पहिले चोवीस दिवसांपर्यंत तर सर्व काही ठीक होतं. मुलगी एकदम सामान्य होती. अचानक तिच्या ह्रदयानं काम करणं थांबवलं. तर आम्ही तिला ताबडतोब रूग्णालयात घेऊन गेलो. तेथील ड़ॉक्टरांनी तिला पुनरूज्जीवित तर केलं, पण हे समजण्यास वेळ लागला की इतकी काय समस्या आली की, इतकी लहान मुलगी आणि अचानक तिला ह्रदयविकाराचा झटका आला. तिला आम्ही उपचारांसाठी चंडीगढला पीजीआय रूग्णालयात घेऊन गेलो. तेथे अत्यंत धाडसानं त्या मुलीनं उपचारांना प्रतिसाद देण्यासाठी संघर्ष केला. परंतु आजारच असा होता की, इतक्या लहान वयात तो शक्यच नव्हता. डॉक्टरांनी तिला पुन्हा जीवित  करण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु ती सहा महिन्यांपर्यंत जगली असती तर तिच्यावर शस्त्रक्रियेचा विचार केला असता. परंतु ईश्वराच्या मनात भलतेच काही होते. केवळ ३९ दिवसांची झाली असतानाच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला पुन्हा झटका आला आहे. आता मुलगी वाचण्याची आशा खूपच कमी आहे. तेव्हा आम्ही पती पत्नी रडत रडतच अशा निर्णयावर आलो. आम्ही ती शौर्यानं आजाराशी झगडत असताना आम्ही पाहिलं होतं. वारंवार असं वाटत होतं की ती आता जाईल आणि ती पुन्हा जीवित होत होती. आम्हाला असं वाटलं की आता या मुलीचा इथं येण्याचा काही उद्देश आहे. डॉक्टरानीही हात टेकले. तेव्हा आम्ही दोघांनी असं ठरवलं की या मुलीचे अवयव आम्ही दान का करू नयेत. कदाचित दुसऱ्या एखाद्याच्या जीवनात प्रकाश येईल. मग आम्ही पीजीआयचा जो प्रशासकीय विभाग आहे, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की इतक्या लहान मुलीची केवळ किडनीच दान केली जाऊ शकते. परमेश्वरानं आम्हाला हिमत दिली आणि गुरू नानक साहेब यांचं हेच तत्वज्ञान आहे. तेव्हा याच विचारात आम्ही तो निर्णय घेतला.

पंतप्रधान: गुरूंनी जी शिकवण दिली आहे, ती आपण प्रत्यक्षात अंगीकारून दाखवली आहे जी. सुप्रीत जी आहेत का. त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं का?

सुखबीर जी– होय सर.

सुप्रीत जी– हॅलो

पंतप्रधान : सुप्रीत जी, मी आपल्याला प्रणाम करतो.

सुप्रीत जीः नमस्कार सर नमस्कार. सर आमच्यासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण आमच्याशी बोलत आहात.

पंतप्रधान : आपण इतकं मोठं काम केलं आहे आणि मी असं मानतो की पूर्ण देश जेव्हा ही सारी चर्चा ऐकेल तेव्हा कितीतरी लोक इतर कुणाचे जीव वाचवण्यासाठी पुढे येतील. अबाबतचं जे योगदान आहे, ते खूप मोठं आहे.

सुप्रीत जी:  सर, गुरू नानक बादशहा यांची कृपाच होती की त्यांनी आम्हाला असा निर्णय घेण्याची हिमत दिली.

पंतप्रधान : गुरूकृपेशिवाय तर काहीच होऊ शकत नाही जी.

सुप्रीत जीः बिलकुल सर, बिलकुल |

पंतप्रधान : सुखबीर जी, आपण जेव्हा रूग्णालयात असाल आणि हा हादरवून टाकणारी बातमी डॉक्टरानी आपल्याला दिली त्यानंतरही आपण आणि आपल्या पत्नीनं अत्यंत धीरोदात्तपणे इतका मोठा निर्णय घेतला. गुरूंची शिकवण हीच असते की आपल्या मनात इतका मोठा उदार विचार आला आणि खरोखरच अबाबतचा अर्थ सामान्य भाषेत सांगायचा तर मदत करणारा असा आहे. हे काम आपण कसं केलं. त्या क्षणाला मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो.

सुखबीर जी–  सर, वास्तवात आमच्या एक कौटुंबिक मित्र आहेत प्रिया जी. त्यांनी आपले अवयव दान केले होते. त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली तर तेव्हा तर आम्हाला वाटलं की हे जे शरीर आहे, ते तर पंचतत्वात विलीन होईल. जेव्हा कुणी कायमचा अंतरतो तेव्हा त्याचं शरीर जाळून टाकलं जातं किंवा दफन केलं जातं. परंतु त्याचे अवयव दुसर्या कुणाच्या उपयोगी आले तर हे भलाईचं काम आहे. आणि त्यावेळी आम्हाला अभिमान वाटला की जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आपली कन्या, भारताची सर्वात लहान दाता बनली आहे. जिचे अवयवांचे यशस्वीपणे रोपण करण्यात आले आहेत. तर आमची मान अभिमानानं ताठ झाली. आम्ही आमच्या आईवडिलांचं नाव तर जीवनभर उजळवू शकलो नाही. पण आमच्या मुलीनं, इतक्या लहान मुलीनं आमचं नाव उजळून टाकलं. याहून मोठी गोष्ट ही आहे की आज या विषयावर आपल्याशी बोलणं होत आहे. आम्हाला अभिमान वाटत आहे.

पंतप्रधान : सुखबीर जी, आज आपल्या मुलीचां एक अवयव जिवंत आहे, असं नाही. आपली कन्या मानवतेच्या अमर कथेची अमर प्रवासी बनली आहे. आपल्या शरीरातील अंशरूपी अवयवाच्या रूपानं ती आज ही  याच जगात आहे.  या उदात्त कार्यासाठी मी आपली, आपल्या पत्नीची, आपल्या कुटुंबाची प्रशंसा करतो.

सुखबीर जीः थँक यू सर. 

मित्रांनो, अवयव दानाची सर्वात मोठी भावना हीच असते की जाता जात इतर कुणाचं तरी भलं व्हावं, कुणाचा तरी जीव वाचावा. जे लोक, अवयव दानाची प्रतीक्षा करत असतात, त्यांना हे ठाऊक असतं की प्रतीक्षेचा एक एक क्षण व्यतीत करणं किती अवघड असतं. आणि अशात कुणी अवयव दान किंवा देहदान करणारा एखादा मिळतो, तेव्हा त्याच्यात त्यांना साक्षात ईश्वराचं रूपच दिसू लागतं.

झारखंडमध्ये राहणाऱ्या स्नेहलता चौधरी या अशाच होत्या ज्यानी ईश्वर होऊन इतरांना नवजीवन दिलं. ६३ वर्षांच्या स्नेहलता चौधरीजी, आपलं ह्दय, किडनी आणि यकृत दान करून गेल्या. आज मन की बात मध्ये, त्यांचे पुत्र अभिजीत चौधरी आमच्याबरोबर आहेत. या, त्यांच्याकडून ऐकू या.

पंतप्रधान :  अभिजीत जी नमस्कार |

अभिजीत जीः  प्रणाम सर |

पंतप्रधान : अभिजीत जी, आपण अशा मातेचे पुत्र आहात की  ज्यांनी आपल्याला जन्म देऊन एक प्रकारे आपल्याला जीवन दिलंच आहे. पण मृत्युनंतरही आपल्या माताजींनी अनेक लोकांना जीवन देऊन गेल्या आहेत. एक पुत्र या नात्यानं आपल्याला निश्चितच त्यांचा अभिमान वाटत असणार.

अभिजीत जीः हो सर.

पंतप्रधान : आपण आपल्या माताजींबद्दल जरा सांगा. कोणत्या परिस्थितीत अवयव दानाचा निर्णय घेतला गेला?

अभिजीत जीः माझी आई सराईकेला म्हणून एक छोटंसं खेडं आहे झारखंडमध्ये. तेथे माझे मम्मी पपा रहात होते. ते गेल्या पंचवीस वर्षांपासून सकाळी चालण्याचा व्यायाम करत. आणि आपल्या सवयीनुसार ४ वाजता सकाळच्या फेरीला निघाले होते. त्यावेळी मोटरसायकल स्वारानं त्यांना मागून ठोकर दिली आणि माताजी तेथेच पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ताबडतोब आम्ही त्यांना सराईकेला इथल्या सदर रूग्णालयात घेऊन गेलो जेथे डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी केली. परंतु रक्तस्त्राव खूपच होत होता. आणि त्यांना कशाचीच जाणीव राहिली नव्हती.  लगेच आम्ही त्यांना टाटा मुख्य रूग्णालयात घेऊन गेलो. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि ४८ तास त्यांचं निरीक्षण केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचे वाचण्याची संधी खूपच कमी आहे. मग आम्ही त्यांना विमानानं दिल्ली एम्सला घेऊन आलो. इथं त्यांच्यावर जवळपास ७-८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर स्थिती एकदम चांगली होती. परंतु त्यांचा रक्तदाब इतका खाली आला की त्यानंतर असं समजलं की त्यांचा मेंदू मृत झाला आहे. तेव्हा डॉक्टर आम्हाला अवयव दानासंबंधी माहिती देत होते. आम्ही आमच्या वडलांना अवयव दान अशी काही गोष्ट असते, हे  समजावून सांगू शकत नव्हतो. परंतु आम्हाला वाटलं की जी गोष्ट ते स्वीकारू शकणार नाहीत, तेव्हा असं काही चालू आहे, हे त्यांच्या मनातून आम्ही काढू पहात होतो. जसं आम्ही त्यांना सांगितलं की अवयव दानासंबंधी चर्चा सुरू आहे. तेव्हा त्यांन सांगितलं की नाही, मम्मीची अशी खूप इच्छा होती आणि आम्हाला तसं करायचं आहे. मम्मी वाचणार नाही, हे समजेपर्यंत आम्ही खूप निराश होतो. पण जसं आम्हाला जेव्हा अवयव दानासंबंधी चर्चा सुरू झाली तेव्हा ही चर्चा सकारात्मक बाजूकडे गेली आणि आम्ही अत्यंत चांगल्या  सकारात्मक वातावरणात आलो. ती प्रक्रिया चालू असतानाच पुन्हा रात्री ८ वाजता समुपदेशन पुन्हा झालं. दुसर्या दिवशी आम्ही अवयव दान केलं. त्यात मम्मीच्या विचारांचा भाग खूपच महत्वाचा होता. कारण त्या प्रथमपासूनच नेत्रदान आणि यासारख्या सामाजिक कार्यात खूपच सक्रीय होत्या. कदाचित याच विचारांनी हा इतका मोठा निर्णय आम्ही घेऊ शकलो. आणि माझ्या वडलांचा जो अंतिम निर्णय होता, त्यामुळे ही गोष्ट होऊ शकली.

पंतप्रधान : किती लोकांसाठी त्यांचे अवयव कामी आले?

अभिजीत जीः त्यांचं ह्रदय, दोन किडनी, यकृत आणि दोन नेत्र यांचं दान केलं गेलं आणि चार लोकांचे जीव वाचले तर दोघा जणांना नवी दृष्टी मिळाली.

पंतप्रधान: अभिजीत जी, आपले आई आणि वडिल दोघेही वंदनीय आहेत. मी त्यांना प्रणाम करतो. आपल्या पिताजींनी इतका मोठा निर्णय घेतला, कुटुबींयांचं नेतृत्व केलं,  हे खरोखरच खूप प्रेरणादायक आहे आणि मी असं मानतो की आई तर आईच असते. आई ही स्वतःच एक प्रेरणादायक असते. परंतु परंपरांना छेद देऊन, प्रत्येक पिढ्यानुपिढ्या आई खूप मोठी शक्ती बनत जाते. अवयव दानासाठी आपल्या मातेची प्रेरणा आज देशापर्यंत पोहचत आहे. मी आपल्या या पवित्र कार्य आणि महान कार्यासाठी आपल्या संपूर्ण परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो. अभिजीत जी, धन्यवाद  जी आणि आपल्या पिताजींना आमचा प्रणाम जरूर सांगा.

अभिजीत जीः अवश्य सर. धन्यवाद

मित्रांनो, ३९ दिवसांची अबाबत कौर असेल किंवा ६३ वर्षांच्या स्नेहलता चौधरी असतील, यांच्यासारखे दाते आपल्याला जीवनाचे महत्त्व पटवून देतात. आज आपल्या देशात असे अनेक गरजू लोक आहेत, जे निरामय जीवन लाभावे म्हणून मोठ्या आशेने अवयवदात्यांची वाट पाहत आहेत.

अवयव दानासाठी सुलभ कार्यप्रणाली असावी ह्यासाठी आणि लोकांना अवयव दान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशभरात समान धोरणा बाबत विचार केला जात आहे याबद्दल मला समाधान आहे. या दिशेने काम करताना, राज्यांच्या अधिवासाची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणजेच आता रुग्ण देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन, अवयव मिळविण्यासाठी नोंदणी करू शकतील. पूर्वी अवयवदानासाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा होती, ती रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मी आपणां  देशवासियांना विनंती करतो की आपण अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावे. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य सुधारु शकतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, हे नवरात्रीचे पर्व आहे. शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. आज जी भारताची क्षमता नव्याने उजळून सामोरी येत आहे, त्यात आपल्या महिलांचा मोठा वाटा आहे. सध्या तर अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.

तुम्ही सोशल मीडियावर आशियातील पहिली महिला रेल्वे लोको पायलट सुरेखा यादव जी यांना पाहिलं असेल. सुरेखा जी, अजून एक नवा मानदंड प्रस्थापित करत, वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या महिला लोको चालक झाल्या आहेत.

निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस ह्यांनी याच महिन्यात 'एलिफंट व्हिस्परर्स' या आपल्या माहितीपटासाठी ऑस्कर जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. देशासाठी आणखी एक गौरवाची बाब भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ, भगिनी ज्योतिर्मयी मोहंती जी यांनीही साध्य केली आहे. ज्योतिर्मयीजींना रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रात IUPAC विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे

जर आपण राजकारणात बघितले तर नागालँडमध्ये एक नवी सुरुवात झाली आहे.  नागालँडमध्ये 75 वर्षांत प्रथमच दोन महिला आमदार जिंकून विधानसभेत पोहोचल्या आहेत. यापैकी एक नागालँड सरकारमध्ये मंत्रीही झाल्या आहेत, म्हणजेच पहिल्यांदाच राज्यातील जनतेला एक महिला मंत्री मिळाल्या आहेत.

मित्रांनो, तुर्कस्थानमधील विध्वंसक/ विनाशकारी भूकंपानंतर तिथल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेल्या धाडसी मुलींना मी काही दिवसांपूर्वी भेटलो. ह्या सगळ्या एनडीआरएफच्या पथकात समाविष्ट झाल्या होत्या. त्यांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताने यूएन मिशन अंतर्गत संपूर्णपणे महिलांची अशी एक तुकडी देखील तैनात केली आहे. आज आपल्या देशाच्या कन्या, तिन्ही सैन्यदलात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. ग्रुप कॅप्टन शालिजा धामी कॉम्बॅट युनिटमध्ये कमांड नियुक्ती मिळविणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी झाल्या आहेत. त्यांच्याकडे सुमारे 3000 उड्डाण तासांचा अनुभव आहे.

त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या शूर कॅप्टन शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सियाचीनमध्ये, जेथे तापमान उणे साठ (-60) अंशांपर्यंत जाते तिथे शिवा चौहान तीन महिने तैनात असतील.

मित्रांनो, ही यादी इतकी मोठी आहे की सगळ्यांचा इथे उल्लेख करणे देखील अवघड आहे. अशा सर्व महिला, आमच्या मुली, आज, भारत आणि भारताच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा देत आहेत. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा हाच विकसित भारतासाठी प्राणवायू आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल संपूर्ण जगभरात स्वच्छ ऊर्जा, अक्षय ऊर्जेबद्दल खूप चर्चा होते आहे. मी जेव्हा जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते भारताच्या ह्या क्षेत्रातील अभूतपूर्व यशाविषयी नक्की चर्चा करतात. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगाने पुढे वाटचाल करतो आहे ती एक मोठीच उपलब्धी आहे. शतकानुशतके भारतातील लोकांचे सूर्याशी विशेष नाते आहे. आपल्या देशात सूर्याच्या शक्तीबद्दल जे वैज्ञानिक ज्ञान आहे, सूर्योपासनेची परंपरा आहे तसे इतर ठिकाणी फार क्वचित आढळते. मला आनंद आहे की आज प्रत्येक देशवासीय सौरऊर्जेचे  महत्त्व जाणतो आहे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्ये आपले योगदान देत आहे.

सर्वांचे प्रयत्न / 'सबका प्रयास' चे तत्वच आज भारताला सौरऊर्जा अभियानात पुढे घेऊन जात आहे.

महाराष्ट्रातील पुण्यामधील अश्याच एका उत्कृष्ट प्रयत्नाने माझे लक्ष वेधून घेतले आहे. एमएसआर-ऑलिव्ह गृहसंकुलातील लोकांनी ठरवले की ते त्यांच्या सामूहिक वापराच्या गोष्टी म्हणजे पिण्याचे पाणी, लिफ्ट/ उदवाहक आणि विद्युत प्रकाश यंत्रे आता सौर उर्जेनेच चालवतील. यानंतर या सोसायटीतील सगळ्यांनी एकत्र येऊन सौर पॅनेल्स लावले. आज या सौर पॅनेलमधून दरवर्षी सुमारे ९० हजार किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. अंदाजे दर महिन्याला 40,000 रुपयांची बचत होते आहे. या बचतीचा फायदा गृहसंकुलातील सर्वाना होतो आहे.

मित्रांनो, पुण्याप्रमाणेच दमण आणि दीवमधील दीव, जो एक वेगळा जिल्हा आहे, तिथल्या लोकांनीही चांगले काम केले आहे. सोमनाथजवळ दीव आहे हे तुम्हाला माहीत असेलच. दीव भारतातील असा पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे दिवसभरच्या संपूर्ण वापरासाठी 100% स्वच्छ ऊर्जा वापरली जात आहे. सर्वांचा प्रयत्न/ सबका प्रयास हाच दीव च्या या यशाचाही मंत्र आहे. कधीकाळी इथे वीज उत्पादनासाठी संसाधनांचे आव्हान होते. लोकांनी ह्या समस्येचा उपाय म्हणून सौर ऊर्जा निवडली. तिथे नापीक ओसाड जमीन आणि अनेक इमारतींवर सौर पॅनेल्स/ सौर पत्रे  बसवण्यात आले. या पॅनेल्समुळे दिवसभरासाठी दीव ची जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जाशक्ती निर्माण होते आहे.या सौर प्रकल्पामूळे वीज खरेदीवर होणाऱ्या खर्चातील सुमारे 52 कोटी रुपये वाचले आहेत. ह्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते आहे.

मित्रांनो, त्यांनी पुणे आणि दीवमध्ये केले तसे प्रयत्न देशभरात इतरही अनेक ठिकाणी होत आहेत. यावरून असे दिसून येते की आपण भारतीय लोक  पर्यावरण आणि निसर्गाबाबत किती संवेदनशील आहोत आणि आपला देश भावी पिढीविषयी किती जागरूक आहे. अशा सर्व प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार अनेक परंपरा विकसित होतात. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीची शक्ती वाढवतात आणि तिला नित्यनूतन प्राणशक्ती प्रदान करतात. काही महिन्यांपूर्वी काशी मध्ये अशी एक परंपरा सुरू झाली.

काशी -तमिळ संगममध्ये, काशी आणि तामिळ प्रदेशाच्या दरम्यान शतकानुशतके असलेले जुने  ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध साजरे केले गेले. 'एक भारत-श्रेष्ठ भारत' ही भावना आपल्या देशाला शक्ती देते. जेव्हा आपण एकमेकांना ओळखतो, जाणतो तेव्हा एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. एकात्मतेच्या ह्याच भावनेने पुढील महिन्यात गुजरातच्या विविध भागांमध्ये 'सौराष्ट्र-तमिळ संगम' होणार आहे.हा 'सौराष्ट्र-तमिळ संगम' 17 ते 30 एप्रिलपर्यंत चालेल. 'मन की बात'चे काही श्रोते विचार करत असतील, की गुजरातमधील सौराष्ट्राचा तामिळनाडूशी काय संबंध? खरं तर, अनेक शतकांपूर्वी सौराष्ट्रातील अनेक लोक तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले होते. हे लोक आजही 'सौराष्ट्री तमिळ' म्हणून ओळखले जातात. त्यांच्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली, सामाजिक संस्कार ह्या सगळ्यांत आजही सौराष्ट्राची थोडीशी झलक पाहायला मिळते. मला तामिळनाडूतील अनेकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकाची पत्रे पाठवली आहेत. मदुराईत राहणाऱ्या  जयचंद्रन जी ह्यांनी अतिशय भावूक होऊन लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की - “हजारो वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी, सौराष्ट्र-तामिळ संबंधांचा विचार केला आहे. सौराष्ट्रातून तामिळनाडूत स्थायिक झालेल्या लोकांची विचारपूस केली आहे. जयचंद्रन यांचे हे शब्द हजारो तमिळ बंधू-भगिनींची भावना व्यक्त करीत आहेत.

मित्रांनो, मला 'मन की बात' च्या श्रोत्यांना आसामशी संबंधित एका बातमीबद्दल सांगायचे आहे. ही देखील 'एक भारत-श्रेष्ठ'भारत' ह्या भावनेला बळ देते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण वीर लसीत बोरफुकन जी यांची ४०० वी जयंती साजरी करत आहोत. वीर लसीत बोरफुकन ह्यांनी जुलमी मुघल राजवटीच्या हातून सोडवून गुवाहाटी स्वतंत्र केली. आज देशाला या महान योद्ध्याचे अदम्य धैर्य माहिती होते आहे. काही दिवसांपूर्वी लसीत बोरफुकनच्या जीवनावर आधारित निबंध लिहिण्याची मोहीम/ योजना आखली गेली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी सुमारे 45 लाख लोकांनी निबंध पाठवले. आणि हे ही जाणून तुम्हाला आनंद होईल की हा एक गिनीज रेकॉर्ड तयार झाला आहे. आणि सर्वात मोठी आणि आनंदाची  गोष्ट ही आहे की वीर लसीत बोरफुकन यांच्यावर सुमारे 23 वेगवेगळ्या भाषांमध्ये निबंध लिहून पाठवले गेले आहेत. ह्या मध्ये आसामी भाषा तसेच हिंदी, इंग्रजी, बांगला, बोडो, नेपाळी, संस्कृत, संथाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकांनी निबंध पाठवले आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मी मनापासून कौतुक करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा काश्मीर किंवा श्रीनगरचा विषय येतो तेव्हा तर सर्वात आधी आपल्यासमोर काश्मीरमधील डोंगर दऱ्यांचे आणि दल सरोवराचे चित्र येते. आपल्यापैकी प्रत्येकजणच दल सरोवराच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेऊ इच्छितो. पण, दल सरोवरात आणखी एक गोष्ट खास आहे. दल सरोवर, आपल्या मधुर कमल देठ किंवा कमल काकडीसाठी प्रसिद्ध आहे.

देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कमळाचे देठ वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. . काश्मीरमध्ये त्यांना नादरू म्हणतात. काश्मीरच्या नादरुंची मागणी सातत्याने वाढत आहे. ही मागणी लक्षात घेऊन दल सरोवरात नादरुची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक एफपीओ तयार केला आहे. या एफपीओमध्ये सुमारे 250 शेतकरी सामील झाले आहेत. आज हे शेतकरी आपण लागवड केलेले नादरू परदेशात देखील पाठवत आहेत.

काही काळापूर्वीच या शेतकऱ्यांनी यूएईला दोनदा माल पाठवला होता. हे यश काश्मीरचे नाव तर उंचावत आहेच पण ह्या सोबतच शेकडो शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे.

मित्रांनो, काश्मीरमधील शेतीशी संबंधित लोकांचा आणखी एक प्रयत्न आजकाल आपल्या यशाचा सुगंध पसरवत आहे. मी यशाच्या सुगंधाविषयी का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! पण ती आहेच सुगंधाची गोष्ट! जम्मू-काश्मीर मधील दोडा जिल्ह्यातील भदरवाह हे एक शहर आहे. वास्तविक अनेक दशकांपासून येथील शेतकरी पारंपारिक मका शेती करत होते, पण काही शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. फ्लोरिकल्चर, म्हणजे फुलांची लागवड, फुलांच्या शेतीकडे ते  वळले. आज सुमारे अडीच हजार शेतकरी लॅव्हेंडरची लागवड करत आहेत.त्यांना  केंद्र सरकारच्या सुगंध योजनेने देखील मदत केली आहे. या नवीन शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ केली आहे आणि आज लॅव्हेंडरसह, त्यांच्या यशाचा सुगंधही दूरवर पसरत आहे.

मित्रांनो, काश्मीरची गोष्ट असेल, कमळाचा विषय असेल, फुलाची बात असेल, सुगंधाची गोष्ट असेल तर कमळाच्या फुलावर विराजमान असणाऱ्या माता शारदेची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडामध्ये शरद मातेच्या भव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे मंदिर त्याच मार्गावर बांधले गेले आहे जिथून पूर्वी लोक शारदा पीठाच्या दर्शनाला जात असत. स्थानिक लोकांनी ह्या मंदिराच्या उभारणीसाठी खूप मदत केली आहे. या शुभ कार्यासाठी मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी 'मन की बात' मध्ये इतकेच. पुढच्या वेळी, आपण ‘मन की बात’च्या 100 व्या भागात भेटू या. आपण सर्वांनी आपल्या सूचना जरूर पाठवाव्यात.

या मार्च महिन्यात आपण होळीपासून नवरात्रीपर्यंत अनेक सण, उत्सवात सहभागी झालो होतो. रमजानचा पवित्र महिनादेखील सुरू झाला आहे. लवकरच काही दिवसांत श्री रामनवमीचा महाउत्सवही येणार आहे. त्या नंतर महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि इस्टरही येतील. एप्रिलच्या महिन्यात, आपण भारतातील दोन महान व्यक्तींच्या जयंती देखील साजऱ्या करतो. हे दोन महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात आपण अशा महान व्यक्तींकडून शिकण्याची आणि सतत प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपले कर्तव्य आपण अग्रस्थानी ठेवले पाहिजे. मित्रांनो, सध्या काही ठिकाणी कोरोना वाढत आहे. म्हणून तुम्ही सर्वानी सुरक्षिततेची आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यायची आहे. पुढच्या महिन्यात, 'मन की बात' च्या शंभराव्या (100 व्या) भागात, आपण भेटू या. तोपर्यंत निरोप द्या.

धन्यवाद. नमस्कार.

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.