Nari Shakti of India is touching new heights of progress in every field: PM Modi
During the last few years, through the efforts of the government, the number of tigers in the country has increased: PM Modi
The beauty of India lies in the diversity and in the different hues of our culture: PM Modi
Great to see countless people selflessly making efforts to preserve Indian culture: PM Modi
Social media has helped a lot in showcasing people’s skills and talents. Youngsters in India are doing wonders in the field of content creation: PM Modi
A few days ago, the Election Commission has started another campaign – ‘Mera Pehla Vote – Desh Ke Liye’: PM Modi
The more our youth participate in the electoral process, the more beneficial its results will be for the country: PM Modi

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.

 

मित्रहो, काही दिवसांतच 8 मार्चला आपण 'महिला दिवस' साजरा करणार आहोत. हा विशेष दिवस म्हणजे, देशाच्या विकासयात्रेतल्या नारीशक्तीच्या योगदानाला वंदन करण्याची संधी! स्त्रियांना समान संधी मिळतील तेव्हाच जग समृद्ध होईल, असं आदरणीय महाकवी भारतीयार यांनी म्हणून ठेवलं आहे. आज भारताची नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात यशाची नवनवी शिखरं सर करते आहे. काही वर्षांपूर्वी कोणी विचार केला होता, की 'आपल्या देशात, खेड्यात राहणाऱ्या स्त्रियाही ड्रोन उडवतील' ! पण आज हे शक्य होत आहे. आज तर गावोगावी ड्रोनदीदीची इतकी चर्चा होते आहे, की प्रत्येकाच्या तोंडी नमो ड्रोन दीदी, नमो ड्रोन दीदी हाच घोष सु‍रू आहे. प्रत्येक जण त्यांच्याबद्दलच चर्चा करत आहे. ऐका खूप मोठ्या कुतूहलाने जन्म घेतला आहे, आणि म्हणूनच मीही विचार केला, की यावेळी 'मन की बात'मध्ये एखाद्या नमो ड्रोन दीदीशी का बोलू नये? उत्तर प्रदेशच्या सीतापूरच्या नमो ड्रोन दीदी सुनीताजी आत्ता आपल्याबरोबर आहेत. चला, त्यांच्याशी गप्पा मारूया..

 

मा.मोदी-: सुनीताजी, नमस्कार.

सुनीतादेवी -: नमस्ते सर.

 

मा. मोदी-: बरं, सुनीताजी आधी मला तुमच्याबद्दल माहिती हवी आहे, तुमच्या कुटुंबाविषयी माहिती हवी आहे. थोडं काही सांगा ना.

सुनीतादेवी -: सर, आमच्या कुटुंबात दोन मुलं आहेत, मी, माझे पती आणि माझी आई आहे.

 

मा.मोदी-: सुनीताजी, तुमचं शिक्षण किती झालंय?

सुनीतादेवी -: सर बीए फायनल.

 

मा.मोदी-: आणि घरी तसा व्यवसाय वगैरे काय?

सुनीतादेवी -: व्यवसाय म्हणजे शेतीवाडीशी संबंधित कामं करतो, शेती वगैरे..

 

मोदीजी -: बरं सुनीताजी, ड्रोन दीदी होण्याचा तुमचा प्रवास सुरू तरी कसा झाला? तुम्हाला प्रशिक्षण कुठे मिळालं, काय काय बदल घडून आले, काय घडलं.. मला सगळं पहिल्यापासून ऐकायचंय.

सुनीतादेवी -: हो सर, आमचं प्रशिक्षण फूलपुर IFFCO company मध्ये झालं होतं, अलाहाबादमध्ये. तिथेच आम्ही शिकलो.

 

मोदीजी -: मग तोपर्यंत तुम्ही कधी ड्रोनबद्दल ऐकलं होतं?

सुनीतादेवी -: सर, ऐकलं तर नव्हतं.. पण एकदा सीतापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात बघितलं होतं. तेव्हा पहिल्यांदा ड्रोन बघितला होता.

 

मोदीजी -: सुनीताजी, मला असं सांगा, की समजा तुम्ही पहिल्या दिवशी तिथे गेलात..

सुनीतादेवी -: हो..

मोदीजी -: पहिल्या दिवशी तुम्हाला ड्रोन दाखवला असेल, मग फळ्यावर काहीतरी शिकवलं असेल, कागदावर शिकवलं असेल, मग मैदानात नेऊन सराव झाला असेल, काय काय झालं असेल! तुम्ही मला सगळं पूर्ण वर्णन करून सांगाल?

सुनीतादेवी -: हो, हो, सर. पहिल्या दिवशी आम्ही सगळे तिकडे पोहोचलो नि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचं प्रशिक्षण सुरू झालं. आधी तर थिअरी शिकवली. दोन दिवस वर्ग चालले. वर्गात खूप गोष्टी शिकवल्या- ड्रोनचे भाग कोणते, तुम्ही कसं-कसं काय-काय करायचं आहे, हे सगळं थिअरीमध्ये शिकवलं. तिसऱ्या दिवशी ना सर, आमची एक परीक्षा घेतली. नंतर सर परत computer वरही एक पेपर झाला. म्हणजे, आधी वर्ग झाला, मग परीक्षा घेतली. मग आमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतलं- म्हणजे ड्रोन कसा उडवायचा, काय करायचं, नियंत्रण कसं करायचं, अशी प्रत्येक गोष्ट practical च्या माध्यमातून शिकवली गेली.

 

मोदीजी -: मग, ड्रोन काम काय करणार, ते कसं शिकवलं?

सुनीतादेवी -: सर, ड्रोन काम करणार म्हणजे जसं बघा की- आता पीक वाढतंय. पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा असं काही, पावसाळ्यात अडचणी येतात - आम्ही शेतात उभ्या पिकाच्या आत जाऊच शकत नाही, तर मग मजूर तरी कसा आत जाईल? अशा वेळी ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप फायदा होईल आणि शेतात शिरावंही लागणार नाही. आम्ही मजूर लावून जे काम करतो, ते काम ड्रोनच्या मदतीने बांधावर उभं राहून आपलं आपण होऊ शकतं. शेतात काही किडे वगैरे झाले तर त्यापासूनही आपल्याला सावध राहावं लागतं. मग काही त्रास होत नाही आणि शेतकऱ्यांना देखील हे आवडतंय. सर, आम्ही आतापर्यंत 35 एकरवर फवारणी केली आहे.

 

मोदीजी -: म्हणजे, शेतकऱ्यांनाही याचा फायदा पटतोय?

सुनीतादेवी -: हो सर, शेतकरीदेखील याबद्दल खूप समाधानी आहेत. खूप आवडतंय म्हणून सांगतात. "वेळही वाचतो. सगळी सोय तुम्ही स्वतः बघता, पाणी, औषधं सगळंच तुम्ही बरोबर घेऊन येता, आणि आम्हाला येऊन फक्त शेत दाखवायचं काम असतं- म्हणजे कुठून कुठपर्यंत माझं शेत आहे" बास. मग माझं सगळं काम अर्ध्या तासात आटोपतं.

 

मोदीजी-: मग, हे ड्रोन बघायला इतर लोकही येत असतील.. ना?

सुनीतादेवी -: हो सर, खूप गर्दी उसळते. ड्रोन बघायला खूप लोक येतात. मोठे मोठे शेतकरी नंबरपण घेऊन जातात, सांगतात- "आम्हीपण बोलवू तुम्हाला फवारणी करायला".

 

मोदीजी -: अच्छा! असं बघा, माझी एक मोहीम आहे - लखपती दीदी घडवण्याची. आज जर देशभरातल्या भगिनी ऐकत असतील, तर एक ड्रोन दीदी आज पहिल्यांदाच माझ्याशी गप्पा मारत आहे.. मग काय सांगाल तुम्ही?

सुनीतादेवी-: आज मी जशी एकटी ड्रोन दीदी आहे तशा हजारो भगिनी पुढे याव्यात म्हणजे त्याही माझ्यासारख्या ड्रोन दीदी होतील. मला खूप आनंद होईल, म्हणजे मी आत्ता एकटीच असले तरी पण माझ्यासोबत जेव्हा हजारो महिला उभ्या असतील तेव्हा छान वाटेल- की मी एकटी नाही खूप जणी माझ्याबरोबर ड्रोन दीदी म्हणून ओळखल्या जातायत.

 

मोदीजी -: चला सुनीताजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! या नमो ड्रोन दीदी आपल्या देशात शेतीला आधुनिक करण्यासाठी खूप मोठं माध्यम म्हणून काम करतायत. माझ्या खूप खूप शुभेच्छा !

सुनीतादेवी -: थॅंक यू, थॅंक यू सर !

मोदीजी -: थॅंक यू .

 

मित्रहो, आज देशात नारीशक्ती कुठेतरी मागे पडली आहे असं एकही क्षेत्र नाही. आणखी एका क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या नेतृत्व क्षमता खूप सुंदर पद्धतीने दाखवून दिल्या आहेत. ते क्षेत्र म्हणजे- नैसर्गिक शेती, जलसंवर्धन आणि स्वच्छता. रसायनांमुळे आपला धरतीमातेला जो त्रास होतोय, जी पीडा, जे दुःख होत आहे, ते समजून घेऊन धरणीमातेला वाचवण्यासाठी देशातली मातृशक्ती महत्त्वाची भूमिका बजावतेय. देशाच्या कानाकोपऱ्यात आता महिला नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत. आज जर देशात 'जल जीवन मिशन'च्या अंतर्गत इतकं काम होतान दिसत असेल, तर त्यामागे पाणी समित्यांची खूप मोठी कामगिरी आहे. या पाणी समित्यांचं नेतृत्व महिलांकडेच आहे. त्याखेरीज आपल्या भगिनी, कन्या जलसंवर्धनासाठी चहूबाजूंनी प्रयत्न करतच आहेत. आता अशाच एक ताई माझ्याबरोबर फोन लाईनवर आहेत त्यांचं नाव- कल्याणी प्रफुल्ल पाटील. त्या महाराष्ट्रात राहतात. चला, कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी बोलून त्यांचा अनुभव जाणून घेऊया.

 

पंतप्रधान - : कल्याणीजी, नमस्ते.

कल्याणीजी- : नमस्ते सरजी नमस्ते.

पंतप्रधान-: कल्याणीजी, आधी थोडंसं तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या कामाबद्दल थोडं जरा सांगा ना.

कल्याणीजी- : सर मी एमएससी मायक्रोबायोलॉजी केलं आहे. माझ्या घरी माझे पती , सासुबाई आणि माझी दोन मुलं आहेत. गेल्या तीन वर्षापासून मी आमच्या ग्रामपंचायतीत काम करते.

पंतप्रधान - : आणि मग गावात शेतीचं काम सुरू केलं? कारण तुमच्याकडे शेतीचं बेसिक ज्ञानसुद्धा आहे , तुमचं शिक्षणही या क्षेत्रात झालंय. आणि आता तुम्ही शेतीच्या कामाला लागला आहात, तर मग तुम्ही कोणते नवीन प्रयोग केलेत?

कल्याणीजी- : सर आमच्याकडच्या दहा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत, त्या एकत्रित करून त्यातून आम्ही ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय फवारणी तयार केली आहे. आपण एरवी जे कीटनाशक वगैरे मारतो त्यातून उपद्रवी किडीसह आपल्याला उपयोगी अशी मित्रकीडही नष्ट होते आणि आपल्या मातीचं प्रदूषण होतं. ती रसायनं पाण्यामध्ये मिसळल्यावर त्यांच्यामुळे आपल्या शरीरावरही हानिकारक परिणाम दिसून येतात. हे सगळं लक्षात घेऊन आम्ही पेस्टिसाइडचा कमीत कमी वापर करतो.

 

पंतप्रधान - : म्हणजे एक प्रकारे तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करत आहात.

कल्याणीजी- : हो आपली जी पारंपरिक शेती आहे, तशी केली आम्ही मागच्या वर्षी.

पंतप्रधान - : मग कसा अनुभव आला नैसर्गिक शेतीचा?

कल्याणीजी- : सर, आमच्या स्त्रियांना तो जो खर्च आला तो कमी वाटला. आणि जे उत्पादन मिळालं ना सर त्यातून समाधान मिळालं- आम्ही कीटकनाशक न वापरता हे केलं. कारण आता कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. शहरी भागात तर ते आहेच, पण गावांमध्येही त्याचं प्रमाण वाढतंय. तर मग त्याचा विचार केल्यास आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षित ठेवायचं असेल तर हा मार्ग आवश्यक आहे. असा विचार करून त्या स्त्रियाही यामध्ये सक्रिय सहभागी होतायत.

 

पंतप्रधान - : बरं कल्याणी जी तुम्ही जलसंवर्धनातही काहीतरी काम केलंय ? काय केलं आहे त्यामध्ये तुम्ही?

कल्याणीजी- : सर, रेन वॉटर हार्वेस्टिंग. सर आमच्या इथल्या जेवढ्या शासकीय इमारती आहेत - जसं प्राथमिक शाळा ,अंगणवाडी, आमच्या ग्रामपंचायतीची वास्तू- तिथलं पावसाचं पाणी सगळं एकत्र करून आम्ही एका जागी गोळा केलंय. आणि रिचार्ज शाफ्ट असतो ना सर, तो वापरलाय. जेणेकरून पावसाचं पाणी जमिनीच्या आत झिरपलं पाहिजे. अशाप्रकारे आम्ही 20 रिचार्ज शाफ्ट आमच्या गावात बसवले आहेत आणि 50 रिचार्ज शाफ्टना मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच तेही काम चालू होईल.

पंतप्रधान - : वा कल्याणी जी, तुमच्याशी बोलून अगदी छान वाटलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

कल्याणीजी- : धन्यवाद धन्यवाद सर , मलाही तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. म्हणजे असं वाटतंय की माझं आयुष्य पूर्णपणे सार्थकी लागलं.

पंतप्रधान - : सेवा करत राहा, बस! .. चला तुमचं नावच कल्याणी आहे तर तुम्ही कल्याण तर नक्कीच करणार! धन्यवाद ताई , नमस्कार!

कल्याणीजी- : धन्यवाद सर, धन्यवाद !

 

मित्रहो, सुनीताजी असोत की कल्याणीजी, वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या नारीशक्तीच्या यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या नारीशक्तीमधल्या या चैतन्याचं अंतःकरणापासून कौतुक करतो.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचं महत्त्व खूप वाढलंय. मोबाईल फोन, डिजिटल उपकरणं ही आपल्या सर्वांच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक बनलेत. पण आता वन्य प्राण्यांशी जुळवून घेण्याबद्दलही डिजिटल उपकरणांची मदत होते आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता? काही दिवसातच, तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे. वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे च्या मध्यवर्ती संकल्पनेत डिजिटल इनोव्हेशन म्हणजे डिजिटल अभिनवतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग होत आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. गेल्या काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांनी देशात वाघांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर मधल्या टायगर रिझर्व मध्ये वाघांची संख्या अडीचशे पेक्षा जास्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मनुष्य विरुद्ध वाघ असा संघर्ष कमी करण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे. तिथे गाव आणि जंगलाच्या सीमेवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. जेव्हा एखादा वाघ गावाजवळ येतो तेव्हा एआयच्या मदतीने स्थानिक लोकांच्या मोबाईलवर सावधगिरीचा इशारा पाठवला जातो. आज या व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या तेरा गावांमध्ये, या व्यवस्थेतून लोकांचीही सोय झाली आहे आणि वाघांनाही सुरक्षा मिळाली आहे.

 

मित्रांनो,

आज युवा उद्योजकही वन्य जीव संरक्षण आणि पर्यावरण पर्यटन यासाठी नवोन्मेषी संकल्पना पुढे आणत आहेत. उत्तराखंडमध्ये रूडकीमध्ये ‘रोटोर प्रीसिझन ग्रुप्स‘नं  वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्यानं  एक वैशिष्ट्यपूर्ण ड्रोन तयार केला आहे. त्या ड्रोनच्या मदतीनं केन नदीमधील मगरींवर लक्ष ठेवता येतं. अशाच पद्धतीनं बंगलुरूच्या एका कंपनीनं  ‘बघिरा’ आणि ‘गरूड’ या नावांची  अॅप तयार केली आहेत. बघीरा अॅपच्या माध्यमातून जंगल सफारीच्यावेळी वाहनाचा वेग आणि इतर कोणत्या गोष्टी केल्या जातात, त्यावर पाळत ठेवता येते. देशातील अनेक व्याघ्र संवर्धन प्रकल्पामध्ये त्याचा उपयोग केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्यावर आधारित गरूड अॅप एखाद्या सीसीटीव्हीला जोडल्यानंतर रियल टाइम अॅलर्ट म्हणजे अगदी त्या क्षणी सूचनेची घंटी मिळते. वन्य जीवांच्या संरक्षणासाठी अशा पद्धतीनं  सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्यामुळे आपल्या देशाची जैव विविधता आणखी समृद्ध होत आहे.

मित्रांनो,

भारतामध्ये तर निसर्गाबरोबर समतोल साधणे, ही गोष्ट आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. आपण हजारों वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीव यांच्याबरोबर सह-अस्तित्वाच्या भावनेनं वास्तव्य करीत  आलो आहोत. जर तुम्ही कधी महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये गेलात तर तिथं या गोष्टीचा तुम्हाला  अनुभव घेता येईल. या व्याघ्र प्रकल्पाजवळच खटकली गावामध्ये वास्तव्य    करणा-या  आदिवासी कुटुंबांनी सरकारच्या मदतीनं आपलं  घर ‘होम स्टे’ बनवलं  आहे. हे घर त्यांच्या उत्पन्नाचं  मोठं  साधन बनत आहे. याच गावामध्ये वास्तव्य करणा-या कोरकू आदिवासी समाजातील प्रकाश जामकर जी, यांनी आपल्या  दोन हेक्टर जमिनीवर सात खोल्यांचं  ‘होम स्टे’ तयार केलं  आहे. त्यांच्याकडे मुक्कामाला येणा-या पर्यटकांच्या भोजनाची व्यवस्था जामकर कुटुंबीय करतात. आपल्या घराच्या सभोवती त्यांनी औषधी रोपांबरोबरच आंबा  आणि कॉफीची झाडंही लावली आहेत. यामुळे पर्यटकांना  आकर्षण वाटतं ,  त्याचबरोबर इतर लोकांनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी पशुपालनाविषयी चर्चा केली जाते,त्यावेळी नेहमीच गाय, म्हैस यांच्यापर्यंतच ही चर्चा होते. परंतु बकरी सुद्धा एक महत्वपूर्ण पशूधन आहे. याविषयी फारशी चर्चा केली जात नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये असंख्य लोक बकरी पालन व्यवसाय करतात. ओडिशातील कालाहांडीमध्ये बकरी पालन हा व्यवसाय, गावातील लोकांच्या उत्पन्नाचं  साधन तर बनला आहेच, त्याचबरोबर त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्याच्या कामामध्ये  मोठं , महत्वपूर्ण माध्यम बनत आहे. या प्रयत्नांमागे जयंती महापात्रा जी आणि त्यांचे पती बीरेन साहू जी यांनी घेतलेला एक मोठा निर्णय आहे. हे दोघेही बंगलुरूमध्ये मॅनेजमेंट प्रोफेशनल होते. परंतु त्यांनी या कामातून  ब्रेक घेवून कालाहांडीच्या सालेभाटा या गावी येण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील समस्यांवर तोडगा निघावा, आणि त्याचबरोबर गामस्थ सशक्तही व्हावेत, यासाठी काहीतरी वेगळं, भरीव कार्य करण्याची या मंडळींची इच्छा होती. सेवा आणि समर्पण या भावनेनं  विचार करून त्यांनी ‘माणिकास्तू अॅग्रो’ची स्थापना केली आणि शेतकरी बांधवांबरोबर काम सुरू केलं. जयंती आणि बीरेन यांनी एक अभिनव उपक्रम म्हणून – ‘माणिकास्तू गोट बॅंक’  ही सुरू केली. त्यांनी सामुदायिक स्तरावर बकरी पालनाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या गोट फार्ममध्ये सध्या जवळपास डझनभर बक-या आहेत. माणिकास्तू गोट बॅंकेनं  शेतक-यांसाठी एक संपूर्ण कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यानुसार शेतक-यांना 24 महिन्यांसाठी दोन बक-या दिल्या जातात. दोन वर्षांमध्ये बक-या 9 ते 10 कोकरांना-करडूंना जन्म देतात . त्यापैकी 6 कोकरांना बॅंकेकडे ठेवलं जातं. आणि राहिलेल्या कोकरांना बकरी पालन  करणा-या त्या परिवाराकडं  सोपवलं  जातं.   इतकंच नाही, बक-यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा- सेवाही पुरवल्या जातात. आज 50 गावातील एक हजारांपेक्षा जास्त शेतकरी  ही योजना चालवणा-या दांपत्याबरोबर जोडले गेले आहेत. त्यांच्या मदतीनं गावातील लोक पशूपालन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत. विविध क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक लहान शेतक-यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवनवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत, हे पाहून मला खूप चांगलं वाटतं. या मंडळींकडून केला जाणारा प्रयत्न प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या संस्कृतीनं  शिकवलं  आहे की - ‘परमार्थ परमो धर्मः’ याचा अर्थ इतरांना मदत करणं  हे, सर्वात महान कर्तव्य आहे. याच भावनेनं  विचार करून,  त्यानुसार जगणारी मंडळी आपल्या देशात अगणित आहेत. ही मंडळी निःस्वार्थ भावनेनं  इतरांची सेवा करण्यासाठी आपलं  जीवन समर्पित करतात. अशाच एक व्यक्तीविषयी  थोडी माहिती देतो. हे आहेत -  बिहारमधील भोजपूर इथं वास्तव्य करणारे  भीम सिंह भवेश जी! त्यांच्या भागातल्या मुसहर जातीच्या लोकांमध्ये त्यांच्या कार्याची खूप चर्चा आहे. म्हणूनच आज त्यांच्याविषयी तुमच्याशी बोलावं, असं मला वाटलं. बिहारमध्ये मुसहर हा एक अतिशय वंचित राहिलेला समुदाय आहे. हा समाज खूप गरीब आहे. भीम सिंह भवेश जींनी या समुदायातील मुलांच्या शिक्षणावर आपलं  ध्यान केंद्रीत केलं . शिक्षण घेतलं तर या मुलांचं  भविष्य उज्ज्वल बनू शकेल, असा विचार त्यांनी केला. त्यांनी मुसहर जातीच्या जवळपास आठ हजार मुलांना शाळेत प्रवेश घेवून दिला. त्यांनी मुलांसाठी मोठं  ग्रंथालयही  तयार केलं. या ग्रंथालयामध्ये मुलांच्या शिक्षणाची- अभ्यासाची चांगली सुविधा केली. भीम सिंह जी, आपल्या समुदायातील सदस्यांची  आवश्यक असणारी सर्व कागदपत्रं  तयार करण्यासाठी  तसंच त्यांचे अर्ज भरण्यासाठी मदत करतात. यामुळे आवश्यक गरजांची  पूर्ती करणारी  साधन सामुग्री गावातल्या लोकांपर्यंत पोहोवणं  सुकर बनलं आहे. गावातल्या लोकांना वेगानं जीवनावश्‍यक  सामुग्री मिळू शकते.  यामुळे आता लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी झाल्या आहेत.  लोकांचं  आरोग्य सुधारण्यासाठी, त्यांनी 100 हून अधिक वैद्यकीय शिबिरे भरवली आहेत. ज्यावेळी कोरोना महामारीचं संकट आलं  होतं, त्यावेळी भीम सिंहजी यांनी त्यांच्या क्षेत्रांतील सर्व लोकांनी लस घ्यावी, यासाठी  खूप प्रोत्साहन दिलं. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्‍ये भीम सिंह भवेश जीं सारखे अनेक लोक आहेत, जे समाजामध्ये अशी अनेक चांगली कामं करण्यामध्ये गुंतली आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही आपल्या कर्तव्याचं  पालन केलं तर, ती गोष्ट  एक सशक्त राष्ट्र निर्मितीमध्ये खूप चांगली, मोठी मदत ठरणार आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, विविधता आणि आपल्या संस्कृतीचे वेगवेगळे रंग या गोष्टी   भारताच्या  सौंदर्यामध्ये  सामावलेल्याच आहे. कितीतरी लोक निःस्वार्थ भावनेनं  भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाच्या कार्यामध्ये गुंतले आहेत आणि तिचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे पाहून मला खूप चांगलं वाटतं. तुम्हाला असं कार्य करणारे लोक भारताच्या प्रत्येक भागामध्ये असल्याचं दिसून येईल. यामध्ये भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे. जम्मू -काश्मीरमध्ये गान्दरबलचे मोहम्मद मानशाह हे गेल्या तीन दशकांपासून गोजरी भाषा संरक्षित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. ते गुज्जर बकरवाल समुदायातील आले आहेत. हा समाज आदिवासी समाजांपैकी एक आहे. त्यांना शालेय वयामध्ये शिक्षण घेण्यासाठी अतिशय कठीण परिश्रम घ्यावे लागले. शिकायला जाण्यासाठी त्यांना रोज 20 किलोमीटर अंतर पायी जावं लागत होतं. अशा अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी  मास्टर डिग्री मिळवली. शिकण्यासाठी संघर्ष करत असतानाच त्यांनी  आपली भाषा संरक्षित करण्याचा दृढ निश्‍चय केला. साहित्य क्षेत्रामध्ये मानशाह जी यांनी केलेल्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्यासाठी  जवळपास 50 ग्रंथाची निर्मिती करून,  त्यामध्ये त्यांचे कार्य जतन करून ठेवलं आहे. यामध्ये त्यांच्या कविता आणि लोकगीतंही आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद गोजरी भाषेत केला आहे.

मित्रांनो, अरूणाचल प्रदेशमध्ये तिरप इथले बनवंग लोसू हे शिक्षक आहेत. त्यांनी वांचो भाषेच्या प्रसारामध्ये आपलं  महत्वपूर्ण योगदान दिलं  आहे. ही भाषा अरूणाचल प्रदेश, नागालॅंड आणि आसामच्या काही भागामध्ये बोलली जाते. त्यांनी एक भाषाशाळा बनविण्याचं काम केलं  आहे. या वांचो भाषेची एक लिपीही त्यांनी तयार केली आहे. ही भाषा लुप्त होवू नये, तिचं  संवर्धन व्हावं , यासाठी भावी पिढ्यांनाही वांचो भाषा ते शिकवतात.

मित्रांनो, गीत आणि नृत्य या माध्यमांतून आपली संस्कृती आणि भाषा जतन करण्याचं काम करणारी अनेक मंडळी आपल्या देशामध्ये आहेत. याबाबतीत   कर्नाटकातील वेंकप्पा अम्बाजी सुगेतकर यांचं जीवनही खूप प्रेरणादायक आहे. बागलकोट इथं वास्तव्य करणारे सुगेतकर एक लोकगीत गायक आहेत. त्यांनी एक हजारांपेक्षा जास्त गोंधळी गाणी गायली आहेत. त्याचबरोबर, या भाषेमध्ये असलेल्या कथांचाही खूप प्रचार- प्रसार केला आहे. त्यांनी कोणतंही शुल्क न घेता, अगदी मोफत शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं आहे. भारतामध्ये आनंदी, उत्साही लोकांची कधीच कमतरता भासत नाही. अशा लोकांमुळे आपल्या संस्कृतीची धारा निरंतर वाहत असून, ती समृद्ध बनत आहे. तुम्हीही अशा मंडळींकडून प्रेरणा घ्यावी, आणि आपलं - वेगळं काहीकरण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्हाला निखळ  आनंद मिळत असल्याची प्रचिती येईल.  

माझ्या प्रिय देशवासियांनो, दोनच दिवस आधी मी वाराणसीमध्ये होतो. वाराणसीत मी एक अनोख्या  छायाचित्रांचं  प्रदर्शन पाहिलं. काशी आणि परिसरातील युवकांनी कॅम-यातून जी क्षणचित्रं  टिपली होती, ती अतिशय अद्भूत होती. यामध्ये अनेक छायाचित्रे  तर  मोबाइल कॅमे-यानं  टिपलेली होती. खरोखरीच, आज; ज्याच्या हातात मोबाइल आहे, ती व्यक्ती एक कन्टेट क्रिएटर म्हणजेच ‘आशय  निर्माण करणारी‘   बनली  आहे. लोकांसमोर  आपल्यातील कौशल्य आणि प्रतिभेचं प्रदर्शन करण्यासाठी समाज माध्यमांनीही   खूप मोठी मदत केली आहे. भारतातील आपले  युवा सहकारी ‘कटेंट क्रिएशन’ म्हणजेच आशय निर्मिती क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करीत आहेत. मग यामध्ये कोणत्याही समाज माध्यमाचे व्यासपीठ असो, आपल्या वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळा आशय सामायिक करणारे आपले युवक सहकारी भेटतातच. पर्यटन असो, समाजकारण असो, सार्वजनिक सहभाग असो, अथवा एखादा प्रेरणादायक जीवन प्रवास असो, यांच्याशी संबंधित अनेक प्रकारचा मजकूर, आशय  समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे आशय निर्मिती करणा-या देशाच्या युवावर्गाचा आवाज आज खूप प्रभावी बनला आहे. त्यांच्या प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी देशामध्ये ‘नॅशनल क्रिएटर्स अॅवॉर्ड’ म्हणजेच राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार सुरू केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाअंतर्गत आपल्या आशयामुळे परिवर्तन घडवून आणणा-यांचा सन्मान करण्याची तयारी केली जात आहे. यामध्ये सामाजिक परिवर्तन घडून यावं,  यासाठी प्रभावी आवाज बनला पाहिजेआणि त्यासाठी जे तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत, यांचा विचार पुरस्कारासाठी केला जाईल. ही स्पर्धा ‘माय गव्ह’ वर आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्व कंटेट क्रिएटर्सनी म्हणजेच आशय निर्मात्यांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. जर तुम्हाला अशा मनोरंजक, आकर्षक आशय निर्मिती करणा-यांविषयी काही माहिती असेल, तर त्यांचं  नाव  तुम्हीही ‘नॅशनल क्रिएटर्स अॅवॉर्ड’साठी पाठवू शकता. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं  ‘ मेरा पहला वोट - देश के लिए’ अशी  आणखी एक मोहीम सुरू केली आहे, त्याचा मला आनंद वाटतो. या मोहिमेच्या माध्यमातून जी युवामंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याची विनंती केली आहे.  अतिशय उत्साही, अतिशय जोशात असलेल्या आपल्या युवाशक्तीविषयी भारताला खूप अभिमान वाटतो. आपले युवा सहकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये जितक्या जास्त प्रमाणात सहभागी होतील, त्याचा परिणाम देशाच्या दृष्टीनं, तितका जास्त लाभदायक ठरेल. पहिल्यांदाच मतदान करणा-या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, त्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं. वयाची  18 वर्ष झाल्यानंतर तुम्हा युवकांना 18 व्या लोकसभेसाठी सदस्य निवडण्याची संधी मिळत आहे. याचा अर्थ 18 वी लोकसभासुद्धा युवकांच्या आकांक्षांचं प्रतीक असेल. म्हणूनच तुमच्या मताचं  महत्व अधिक वाढलं  आहे. सर्वसाधारण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही तरूण मंडळींनी फक्त राजकीय कार्यक्रमांचा भाग बनलं पाहिजे, असं नाही तर या काळात होणा-या चर्चा आणि वादविवाद यांच्याविषयीही जागरूक बनावं.  आणि एक महत्वाची गोष्ट स्मरणात ठेवावी - ‘मेरा पहला वोट -देश के लिए‘!!  देशामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्फ्लूएन्सर म्हणजेच प्रभावक आहेत, अशा व्यक्तींनाही मी विनंती करतो. त्यांनी या मोहिमेमध्ये उत्साहानं सहभागी व्हावं. यामध्ये मग हे प्रभावक क्रीडा क्षेत्रातील असतील, सिने जगतातील असतील, साहित्य क्षेत्रातील असतील किंवा इतर व्यावसायिक असतील, किंवा  आपल्या इन्स्टाग्रॅम आणि यूट्यूब माध्यमामध्ये प्रभावी

असतील, त्यांनीही या अभियानामध्ये सहभागी होवून पहिल्यांदाच मतदान करणा-याआपल्या मतदारांना प्रोत्साहन द्यावं.

मित्रांनो, ‘मन की बात’ च्या या भागामध्ये माझ्याकडून इतकंच!  देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं  वातावरण आहे. आणि गेल्यावेळेप्रमाणेच मार्च महिन्यामध्ये निवडणूक आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. ‘मन की बात‘ या  कार्यक्रमांचे 110 भाग झाले.  या कार्यक्रमावर सरकारची सावलीही पडणार नाही, इतका तो दूर ठेवला. ही गोष्ट म्हणजे, एक मोठं यश आहे. ‘मन की बात‘ मध्ये देशाच्या  सामूहिक शक्तीविषयी चर्चा होते. देशानं  केलेल्या कामगिरीची, देशानं मिळवलेल्या यशाची चर्चा होते.  एक प्रकारे जनतेचा, जनतेसाठी, जनतेव्दारे तयार होणारा हा कार्यक्रम आहे. तरीही राजकीय मर्यादेचं पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या काळामध्ये आता आगामी तीन महिने ‘मन की बात’ चं  प्रसारण होणार नाही. आता ज्यावेळी आपल्याबरोबर  ‘मन की बात’ मध्ये संवाद साधला जाईल, तो ‘मन की बात’ चा 111वा भाग असेल. यानंतरच्या ‘मन की बात’चा  प्रारंभ 111 या शुभ अंकानं  होईल, यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असणार? तरीही, मित्रांनो, तुम्हा मंडळींना माझं एक काम करीत रहायचं आहे. ‘मन की बात’ भलेही तीन महिने थांबणार आहे, तरीही देशाची कामगिरी काही थांबणार नाही. म्हणूनच तुम्ही ‘मन की बात‘ हॅशटॅगवर (#) सह समाजाच्या कामगिरीची, देशानं मिळवलेल्या यशाची माहिती समाज माध्यमांवर पोस्ट करीत रहा. काही दिवसांपूर्वी एका युवकानं मला खूप चांगला सल्ला दिला होता. हा सल्ला असा होता की, ‘मन की बात’च्या  आत्तापर्यंतच्या भागांचे  लहान-लहान व्हिडीओ, यू ट्यूब शॉर्टस् या स्वरूपामध्ये सामायिक केले पाहिजेत. म्हणूनच मी ‘मन की बात’च्या श्रोत्यांना विनंती करतो की, असे शॉर्टस् तुम्ही भरपूर सामायिक करावेत.

मित्रांनो, ज्यावेळी पुढच्यावेळी आपल्याशी संवाद साधला जाईल, त्यावेळी पुन्हा एकदा नवीन चैतन्यानं,  नवीन माहिती घेवून तुम्हाला भेटेन. तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. खूप खूप धन्यवाद ! नमस्कार !!

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to distribute over 50 lakh property cards to property owners under SVAMITVA Scheme
December 26, 2024
Drone survey already completed in 92% of targeted villages
Around 2.2 crore property cards prepared

Prime Minister Shri Narendra Modi will distribute over 50 lakh property cards under SVAMITVA Scheme to property owners in over 46,000 villages in 200 districts across 10 States and 2 Union territories on 27th December at around 12:30 PM through video conferencing.

SVAMITVA scheme was launched by Prime Minister with a vision to enhance the economic progress of rural India by providing ‘Record of Rights’ to households possessing houses in inhabited areas in villages through the latest surveying drone technology.

The scheme also helps facilitate monetization of properties and enabling institutional credit through bank loans; reducing property-related disputes; facilitating better assessment of properties and property tax in rural areas and enabling comprehensive village-level planning.

Drone survey has been completed in over 3.1 lakh villages, which covers 92% of the targeted villages. So far, around 2.2 crore property cards have been prepared for nearly 1.5 lakh villages.

The scheme has reached full saturation in Tripura, Goa, Uttarakhand and Haryana. Drone survey has been completed in the states of Madhya Pradesh, Uttar Pradesh, and Chhattisgarh and also in several Union Territories.