इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण स्वीकारून इटलीतील अपुलिया प्रांतात 14 जून 2024 रोजी होणार असलेल्या जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी रवाना होत आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर माझा पहिला दौरा जी7 शिखर परिषदेसाठी इटली इथे होत असल्याचा मला आनंद आहे. जी20 शिखर परिषदेसाठी 2021 मध्ये केलेल्या इटलीच्या दौऱ्याची मला आठवण होत आहे. पंतप्रधान मेलोनी यांचे गतवर्षीचे भारताचे दोन दौरे द्विपक्षीय कार्यक्रमाला गती आणि सखोलता मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरले. भारत–इटली धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि हिंद-प्रशांत व भूमध्य प्रदेशांत सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
शिखर परिषदेतील सत्रांमध्ये होणाऱ्या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य प्रदेश या मुद्द्यांवर भर राहील. भारताच्या अध्यक्षतेखालील जी20 शिखर परिषदेचे फलित आणि आगामी जी7 शिखर परिषद यांच्यात समन्वय साधण्याची व ‘ग्लोबल साऊथ’साठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर चर्चा करण्याची ही चांगली संधी आहे.
शिखर परिषदेत सहभागी होणार असलेल्या इतर नेत्यांच्या भेटींसाठीही मी उत्सुक आहे.