मी दिनांक 2 मे 2022 रोजी जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर महामहीम श्री.ओलाफ श्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून जर्मनीतील बर्लिन, येथे भेट देणार आहे; त्यानंतर मी दिनांक 3 ते 4 मे 2022 दरम्यान डेन्मार्कचे पंतप्रधान महामहीम मेट फ्रेडरिकसेन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगन, डेन्मार्क येथे होणाऱ्या द्विपक्षीय बैठकांना हजर रहाणार आहे तसेच दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.भारतात परत येताना, मी फ्रान्समध्ये पॅरिस येथे थोडा वेळ थांबून फ्रान्सचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन,यांची भेट घेईन.
बर्लिनमध्ये माझी भेट ही चान्सलर श्कोल्झ यांच्याशी तपशीलवार द्विपक्षीय चर्चा करण्याची संधी असेल. गेल्या वर्षी जी -20 परिषदेत ते व्हाइस चान्सलर आणि अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले असताना आम्ही भेटलो होतो. जर्मनीसोबत द्वैवार्षिक स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा सहाव्या भारत-जर्मनी इंटर-गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स (IGC) च्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवू. .अनेक भारतीय मंत्री देखील जर्मनीला जाणार आहेत आणि त्यांच्या जर्मन समकक्षांशी सल्लामसलत करणार आहेत.
जर्मनीत नवीन सरकारची स्थापना झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत आयोजित होणारी आयजीसी बैठक (IGC) ही आमचे मध्यम कालावधीसाठी आणि दीर्घकालीन असलेले प्राधान्यक्रम ओळखण्यास उपयुक्त ठरेल,असे मी मानतो.
2021 मध्ये, भारत आणि जर्मनी यांच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण झाली असून 2000 पासून ते एकमेकांचे धोरणात्मक भागीदार आहेत. मी चान्सलर श्कोल्झ यांच्यासोबत दोन्ही देशांच्या धोरणात्मक, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे.
भारत आणि जर्मनी यांच्यातील दीर्घकालीन व्यावसायिक संबंध हे आमच्या धोरणात्मक भागीदारीतील एक स्तंभ आहेत आणि चॅन्सेलर श्कोल्झ आणि मी आमच्या विविध उद्योगांना सहकार्यासाठी ऊर्जा देण्याच्या उद्दिष्टासह एकत्रितपणे सहाय्य करणाऱ्या एका व्यावसायिक बैठकीला संबोधित करू, ज्यामुळे कोविडपश्चात दोन्ही देशांतील आर्थिक सुधारणा बळकट करण्यात मदत होईल.
कॉन्टिनेन्टल युरोपमध्ये भारतीय वंशाचे दहा लाखांहून अधिक लोक राहतात आणि जर्मनीमध्ये या स्थलांतरित देशवासियांचे प्रमाण लक्षणीय आहे. स्थलांतरित भारतीय हे युरोपसोबतच्या आमच्या संबंधांमधील महत्त्वाचे स्तंभ आहेत आणि म्हणून मी या खंडातील माझ्या आपल्या बंधू-भगिनींना भेटणार आहे.
बर्लिनमधून, मी कोपनहेगनला जाईन जिथे माझी पंतप्रधान फ्रेडरिकसेन यांच्याशी द्विपक्षीय बैठक होईल जी डेन्मार्कसोबतच्या आमच्या अद्वितीय 'ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'मधील प्रगतीचा तसेच आमच्या द्विपक्षीय संबंधांतील इतर पैलूंचा आढावा घेण्याची संधी देईल. मी भारत-डेन्मार्क बिझनेस राऊंडटेबलमध्येही भाग घेईन तसेच डेन्मार्कमधील भारतीय समुदायाशी संवाद साधेन.
डेन्मार्कसोबतच्या द्विपक्षीय बैठकांव्यतिरिक्त, मी डेन्मार्क, आइसलँड, फिनलंड, स्वीडन आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांसह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतही भाग घेईन जिथे आम्ही 2018 मधे झालेल्या पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेपासून आतापर्यंतच्या आमच्या सहकार्याचा आढावा घेऊ. या शिखर परिषदेत महामारीनंतरची आर्थिक सुधारणा , हवामान बदल, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, आणि आर्क्टिक क्षेत्रातील बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीसंदर्भात भारत-नॉर्डिक सहकार्य या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
शिखर परिषदेच्या निमित्ताने, मी इतर चार नॉर्डिक देशांच्या नेत्यांनाही भेटेन आणि त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेईन.
नॉर्डिक देश हे भारतासाठी शाश्वतता, अक्षय ऊर्जा, डिजिटायझेशन आणि नवोन्मेष क्षेत्रात महत्त्वाचे भागीदार आहेत. या भेटीमुळे नॉर्डिक प्रदेशातील आमचे बहुआयामी सहकार्य विस्तारण्यास मदत होईल.
माझ्या परतीच्या प्रवासादरम्यान, मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना भेटण्यासाठी पॅरिसमध्ये थांबेन. अध्यक्ष मॅक्रॉन यांची नुकतीच फेरनिवड झाली आहे आणि निकालानंतर फक्त दहा दिवसांनी होणाऱ्या या माझ्या भेटीमुळे मला त्यांचे प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक अभिनंदन करता येईल, इतकेच नव्हे तर, दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्रीही ते बळकट करेल. यामुळे आम्हाला भारत-फ्रान्स एकात्मिक भागीदारीच्या पुढच्या टप्प्याची दिशा निश्चित करण्याची संधी मिळेल.
अध्यक्ष मॅक्रॉन आणि मी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आमचे मूल्यांकन सामायिक करू आणि द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेऊ. माझा ठाम विश्वास आहे, की जागतिक व्यवस्थेसाठी समान दृष्टी आणि मूल्ये असलेल्या दोन देशांनी एकमेकांच्या सहकार्याने काम केले पाहिजे.
माझा युरोप दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा या प्रदेशाला अनेक आव्हाने आणि निवडींचा सामना करावा लागत आहे. माझ्या भेटींद्वारे, भारताच्या शांतता आणि समृद्धीच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे सहकारी असलेल्या आमच्या युरोपियन भागीदारांसोबत सहकार्याची भावना मजबूत करण्याचा माझा मानस आहे.