भारतातील लोकशाही केवळ राज्यघटनेतील कलमांचा संग्रह नाही;तर तो आपला जीवनप्रवाह आहे: पंतप्रधान
संसद टीव्ही देशाची लोकशाही आणि लोकप्रतिनिधींचा नवा आवाज सिद्ध होईल: पंतप्रधान
‘दर्जेदार, अर्थपूर्ण साहित्य लोकांना आपल्याशी जोडते’, हे संसदीय व्यवस्थेतही तितकेच लागू आहे- पंतप्रधान

 

नमस्कार!

आपल्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यसभेचे  माननीय सभापती आणि देशाचे   उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी, लोकसभेचे  माननीय अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे  माननीय उपसभापती हरिवंश जी, लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते, उपस्थित मान्यवर, पुरुष आणि महिला वर्ग!

आजच्या दिवशी आपल्या संसदीय व्यवस्थेमध्ये  एक आणखी महत्वपूर्ण अध्याय जोडला जात आहे.

संसद टीव्हीच्या रूपाने देशाला संवाद आणि संचार याचे असे माध्यम प्राप्त होत आहे जे देशाची लोकशाही आणि लोक प्रतिनिधी यांचा नवा आवाज म्हणून काम करेल.

आपणा सर्वाना, हा विचार साकारणाऱ्या संपूर्ण चमूला मी शुभेच्छा देतो. आताच सांगितल्याप्रमाणे आज दूरदर्शनच्या स्थापनेला  62 वर्षे झाली. हा प्रदीर्घ प्रवास आहे. हा प्रवास यशस्वी करण्यामध्ये अनेक व्यक्तींचे योगदान आहे. दूरदर्शनशी निगडीत  सर्वांचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो,

झपाट्याने बदलणाऱ्या या काळात माध्यमे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांची भूमिकाही वेगाने बदलत आहे. 21 वे शतक तर विशेष करून संचार आणि संवादाच्या माध्यमातून क्रांती घडवत आहे. अशामध्ये आपल्या संसदेशी संबंधित वाहिनीनेही या आधुनिक व्यवस्थेला अनुरूप स्वतःमध्ये परिवर्तन करणे  स्वाभाविकच आहे.

संसद टीव्हीच्या माध्यमातून आज एक नवी सुरवात होत आहे याचा, मला आनंद होत आहे. आपल्या नव्या स्वरुपात, संसद टीव्ही सोशल मिडिया आणि ओटीटी मंचावरही राहील आणि त्याचे स्वतःचे ॲपही असेल, असे मला सांगण्यात आले आहे.यामुळे आपला संसदीय संवाद आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडला जाईलच त्याचबरोबर  सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याची व्यापकता पोहोचेल.

15 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो हा सुखद योग  आज आहे. लोकशाहीविषयी बोलताना भारताची जबाबदारी अधिकच वाढते. भारत लोकशाहीची जननी आहे. भारतासाठी लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नव्हे तर विचार आहे. भारतात लोकशाही केवळ संविधानिक रचना नव्हे तर देशाचा गाभा आहे. भारतात लोकशाही केवळ संविधानाच्या कलमांचा  संग्रह नव्हे तर ती आपली जीवन धारा आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी संसद टीव्हीचा प्रारंभ होणे  समर्पक ठरते.

भारतात आपण सर्वजण आज अभियंता दिन साजरा करत आहोत. एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचा हा  पवित्र दिन भारताच्या सर्व मेहनती आणि कुशल अभियंत्यांना समर्पित आहे.  दूरचित्रवाणी विश्वात तर ओबी अभियंते, साउंड इंजीनियर, ग्राफिक्स डिझायनिंगशी संबंधित लोक,   पॅनल सांभाळणारे लोक, स्टूडियो डायरेक्टर्स, कॅमरामन, व्हिडिओ एडिटर्स,अशा अनेक व्यावसायिकामुळे प्रसारण शक्य होते. संसद टीव्ही समवेत देशाच्या सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या विशेष करून अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आज देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना आपल्यासमोर भूतकाळाचा अभिमान आणि भविष्यासाठी संकल्पही आहेत. या दोन्ही क्षेत्रात माध्यमांची भूमिका मोठी आहे. स्वच्छ भारत अभियाना प्रमाणे एखादा विषय माध्यमे जेव्हा मांडतात, तेव्हा तो विषय लोकांपर्यंत झपाट्याने पोहोचतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशवासीयांचे प्रयत्न प्रसिद्ध आणि प्रसारित करण्याचे काम माध्यमे अतिशय समर्पकरित्या करू शकतात.  उदाहरणार्थ दूरचित्रवाणी वाहिन्या,  स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित 75 भागांचे नियोजन करू शकतात. वर्तमान पत्रे, अमृत महोत्सवाशी संबंधित पुरवण्या प्रकाशित करू शकतात.  डिजिटल मीडिया, प्रश्नमंजुषा, स्पर्धा यासारख्या माध्यमातून युवकांना थेट सहभागी करून घेऊ शकतात. संसद टीव्हीच्या चमूने या दृष्टीने अनेक कार्यक्रम आखले असल्याची माहिती मला मिळाली आहे. अमृत महोत्सवाची भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  हे कार्यक्रम मोठी मदत करतील.

मित्रहो,

आपण सर्वजण, संवाद क्षेत्रातले सृजनशील लोक आहात. “कन्टेंट इज़ किंग” असे आपण नेहमीच म्हणता. आपल्याला  मी माझ्या अनुभवाची आणखी एक गोष्ट  सांगू इच्छितो.  माझा अनुभव आहे ,  “कन्टेंट इज़ कनेक्ट”. म्हणजे आपल्याकडे उत्तम आशय असेल तर लोक स्वतःहून आपल्याशी जोडले जातात. ही गोष्ट माध्यमांसाठी जितकी लागू होते तितकीच आपल्या संसदीय व्यवस्थेलाही लागू होते. कारण संसदेत केवळ राजकारण नव्हे तर धोरणेही असतात.

 आपल्या संसदेचे अधिवेशन सुरु असते, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु असतात तेव्हा युवकांना माहिती आणि शिकण्यासाठी बरेच काही असते. आपल्या सन्माननीय सदस्यांना जेव्हा माहिती असते की  देशवासीय आपल्याला पाहत आहेत तेव्हा संसदेत उत्तम आचरण, उत्कृष्ट चर्चा करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळते. यातून संसदेची  कार्य क्षमताही वाढते आणि जनहिताच्या कामांना लोकप्रियताही प्राप्त होते.

म्हणूनच सदनाच्या कामकाजात जनताही जोडली जाणे आवश्यक आहे, देशाच्या कोणत्याही भागातली जनता असो, संसदेच्या कामकाजातला ती भाग झाली पाहिजे. संसद टीव्हीलाही आपल्या कार्यक्रमांची निवड लोकांची खास करून युवा वर्गाची रुची लक्षात घेऊन करावी लागेल. यासाठी भाषेकडे लक्ष पुरवावे लागेल,उत्कंठावर्धक  कार्यक्रम अनिवार्य राहतील. 

संसदेत झालेली ऐतिहासिक भाषणे घेता येतील. तर्कशुद्ध चर्चेबरोबरच कधी-कधी हलके-फुलके क्षणही दाखवता येतील. खासदारांविषयी माहिती दिली जाऊ शकते ज्यायोगे जनतेला त्यांच्या कामाचे तुलनात्मक विश्लेषण करता येईल.  अनेक खासदार वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशंसनीय काम करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न देशासमोर ठेवल्यास त्यांचा उत्साह वाढेल आणि दुसऱ्या  लोक प्रतिनिधीना सकारात्मक राजकारणाची प्रेरणा  मिळेल.

मित्रहो,

अमृत महोत्सवात आपण आणखी एक महत्वाचा विषय उपस्थित करू शकतो तो म्हणजे आपले संविधान आणि नागरिकांचे  कर्तव्य! देशाच्या नागरिकांची कर्तव्य काय आहेत याबाबत अखंड जागरूकतेची आवश्यकता आहे. माध्यमे यासाठी एक महत्वाचे साधन आहेत. संसद टीव्ही यादृष्टीने अनेक कार्यक्रम घेऊन येणार असल्याची माहिती मला देण्यात आली आहे.

या कार्यक्रमातून आपल्या युवा वर्गाला, आपल्या लोकशाही विषयी, लोकशाहीच्या कार्य पद्धतीविषयी आणि नागरिक कर्तव्याबाबतही खूप काही शिकायला मिळेल. त्याच प्रमाणे कार्यकारी समित्या, संसदीय कामकाजाचे महत्व, विधानसभांचेकामकाज याबाबत मोठी माहिती मिळेल ज्यातून  भारताची लोकशाही सखोल जाणून घेण्यासाठी मदत होईल. लोकशाहीचा पाया म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत विषयक कार्यक्रमही संसद टीव्हीमध्ये निर्माण होतील अशी मला आशा आहे. हे कार्यक्रम भारताच्या लोकशाहीला, नवी उर्जा, नवी प्रेरणा देतील.

मित्रहो,

आपली संसद, वेगवेगळे राजकीय पक्ष, आपली माध्यमे, आपल्या संस्था, सर्वांचे कार्य क्षेत्र वेगवेगळे आहे. मात्र देशाच्या संकल्पांच्या पुर्ततेसाठी  सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे, एकत्रित  प्रयत्नांची आवश्यकता आहे.

आपण सर्व वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सामायिक संकल्पासह पुढे वाटचाल करत  नव भारताचे स्वप्न पूर्ण करू याचा मला विश्वास आहे.

याच विश्वासाने रवी कपूर यांचेही मी अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांचे हे कार्य क्षेत्र नव्हे मात्र गेल्या काही काळात त्यांनी जगभरातल्या लोकांशी सल्ला मसलत केली, त्यांचे मार्गदर्शन घेतले, कल्पना घेतल्या आणि ज्याप्रकारे त्यांनी रचना केली .. ते एकदा मला सांगण्यासाठी आले तेव्हा मी खुपच प्रभावित झालो. रवी आणि यांच्या संपूर्ण चमूला  मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपणा सर्वांचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा. 

धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage