महामहीम- अध्यक्ष बायडेन
पुरवठा साखळी लवचिकता या महत्त्वाच्या विषयावर शिखर परिषदेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्ही पदभार स्वीकारताच म्हणाला होतात , "अमेरिका इज बॅक ". आणि इतक्या कमी वेळेत आम्ही सर्वजण हे घडताना पाहत आहोत, आणि म्हणूनच, मी म्हणेन, वेलकम बॅक !
महामहीम,
महामारीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये आपणा सर्वाना लस, आरोग्य उपकरणे आणि आवश्यक औषधे तयार करण्यासाठी कच्च्या मालाची कमतरता जाणवली. आता जग आर्थिक सुधारणेसाठी सज्ज झाले असताना सेमीकंडक्टर आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्याच्या समस्या विकासाच्या आड येत आहेत. जगात कोणाला वाटले होते की शिपिंग कंटेनरची कमतरता भासेल ?
लसींचा जागतिक पुरवठा सुधारण्यासाठी भारताने लसींच्या निर्यातीला गती दिली आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात अधिक चांगली आणि किफायतशीर कोविड-19 प्रतिबंधक लस पुरवण्यासाठी आम्ही आमच्या क्वाड भागीदारांसोबत काम करत आहोत. भारत पुढील वर्षी जगासाठी 5अब्ज कोविड लसीच्या मात्रा तयार करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यासाठी कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा न येणे हे देखील खूप महत्वाचे आहे.
महामहीम,
माझ्या मते जागतिक पुरवठा साखळी सुधारण्यासाठी तीन बाबी सर्वात महत्वाच्या आहेत - विश्वसनीय स्रोत, पारदर्शकता आणि कालमर्यादा . आपला पुरवठा विश्वसनीय स्रोतांकडून असणे आवश्यक आहे. आपल्या सामायिक सुरक्षेसाठीही ते महत्त्वाचे आहे. विश्वसनीय स्त्रोत असे असले पाहिजेत की त्यांच्याकडे प्रतिक्रियात्मक प्रवृत्ती नसावी जेणेकरुन पुरवठा साखळी जशास तसे दृष्टिकोनातून सुरक्षित राहील. पुरवठा साखळीच्या विश्वासार्हतेसाठी, त्यात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. पारदर्शकतेच्या अभावामुळे आज जगातील अनेक कंपन्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा तुटवडा जाणवत असल्याचे आपण पाहत आहोत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेवर न झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. कोरोनाच्या काळात औषध निर्मिती आणि वैद्यकीय पुरवठ्यामध्ये हे आपल्याला स्पष्टपणे जाणवले आहे. त्यामुळे ठराविक मुदतीच्या आत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, आपल्याला आपल्या पुरवठा साखळ्यांचे वर्गीकरण करावे लागेल. आणि त्यासाठी विकसनशील देशांमध्ये पर्यायी उत्पादन क्षमता विकसित करावी लागेल.
महामहीम,
भारताने औषध निर्मिती , माहिती तंत्रज्ञान आणि इतर वस्तूंचे विश्वसनीय स्त्रोत म्हणून विश्वासार्हता निर्माण केली आहे. आम्ही स्वच्छ तंत्रज्ञान पुरवठा साखळीतही आमची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक आहोत. माझी सूचना आहे की आपल्या सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित, एका विशिष्ट कालमर्यादेत पुढील कृती योजना तयार करण्यासाठीआपण आपल्या कृतीगटांना त्वरित भेटण्याचे निर्देश द्यावेत.
धन्यवाद !