पंतप्रधान मोदी यांनी ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढविण्याच्या नवीन मार्गांचा शोध घेण्याच्या त्यांच्या निर्देशानुसार वायूरूप ऑक्सिजनच्या वापराचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली.
स्टील प्रकल्प, पेट्रोकेमिकल युनिटसह रिफायनरीज, ज्वलन प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे उद्योग, उर्जा संयंत्र इत्यादी अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प आहेत ज्यामध्ये वायूरूप ऑक्सिजन तयार होतो; ज्याचा वापर प्रक्रियेत केला जातो. हा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वापरला जाऊ शकतो.
आवश्यक त्या शुद्धतेचा वायुरूप ऑक्सिजनची निर्मिती करणारे उद्योग शोधून शहरे / दाट वस्तीचे भाग / मागणी केंद्रांच्या जवळ असलेले उद्योग निवडून त्या स्रोताजवळ ऑक्सिजनयुक्त खाटा असलेली तात्पुरती कोविड केअर सेंटर स्थापित करणे अशाप्रकारचे धोरण राबविले जात आहे. अशा 5 सुविधा प्रायोगिक तत्वावर यापूर्वीच सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्याची चांगली प्रगती आहे. हे प्रकल्प कार्यान्वयन करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा खासगी उद्योगांद्वारे आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून केले जात आहे.
अशा प्रकल्पांजवळ तात्पुरती रूग्णालये बनवून अल्पावधीतच सुमारे 10,000 ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
महामारीला सामोरे जाण्यासाठी ऑक्सिजनयुक्त खाटांसह अशा आणखी काही सुविधा स्थापित करण्यास राज्य सरकारांना प्रोत्साहित केले जात आहे.
पंतप्रधानांनी पीएसए प्रकल्प सुरू करण्याच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. पीएम केअर, पीएसयू आणि इतरांच्या योगदानाद्वारे सुमारे 1500 पीएसए प्रकल्प सुरू असल्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले. या प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, रस्ते वाहतूक व महामार्ग सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.