मित्रांनो,
आज आपण कोरोना संकटाविषयी बोलत असतांना देशाच्या आरोग्यविषयक इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, हा योगायोगच आहे.
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा प्रारंभ झाला होता.
केवळ दोनच वर्षात, या योजनेंतर्गत सव्वा कोटींहून अधिक गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरिबांची सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष कौतुक करतो.
मित्रांनो,
आजच्या आपल्या या चर्चेतून समोर आलेल्या अनेक गोष्टींमुळे पुढच्या रणनीतीच्या आखणीसाठी वाट अधिक स्पष्ट होऊ शकली आहे.
भारतात प्रादुर्भावामध्ये सातत्याने वाढ होत आहे, हे खरे आहे. परंतु आज आपण दररोज दहा लाखांपेक्षा अधिक चाचण्याही करीत आहोत आणि कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.
अनेक राज्यांमध्ये आणि राज्यांतर्गत स्थानिक पातळीवरही best practices – कामाच्या सर्वोत्कृष्ट पद्धती पाहावयास मिळत आहेत.
या अनुभवांना या प्रचीतीला आपण अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे.
मित्रहो,
गेल्या काही महिन्यांत कोरोनावरील उपचारांसंबंधी ज्या सुविधा आपण विकसित केल्या आहेत, त्यांची आता आपल्याला कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठी मदत होत आहे.
आता आपल्याला एकीकडे कोरोनाशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर- पायाभूत सुविधा तर भक्कम करायच्या आहेतच, शिवाय, आरोग्याशी संबंधित तसेच ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगचे जे नेटवर्क आहे, त्यांना अधिक चांगले प्रशिक्षण मिळेल याची खबरदारीही आपण घ्यायची आहे.
आजच, कोरोना विशिष्ट पायाभूत सुविधांसाठी state disaster response fund -SDRF – म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या उपयोगाविषयीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक राज्यांनी याविषयी आग्रह धरला होता. आता असे ठरविण्यात आले आहे की, SDRF च्या उपयोगाची मर्यादा 35 टक्क्यावरून वाढवून 50 टक्के करण्यात यावी. या निर्णयामुळे राज्यांना कोरोनाच्या प्रतिकारासाठी अधिक रक्कम उपलब्ध होऊ शकेल.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. जे एक-दोन दिवसांचे लॉकडाउन घेतले जात आहेत ते कोरोनाला आळा घालण्यासाठी कितपत प्रभावी ठरत आहेत, याचे निरीक्षण प्रत्येक राज्याने आप-आपल्या पातळीवर केले पाहिजे. यामुळे आपल्या राज्यात आर्थिक व्यवहार सुरु होण्यास त्रास होत आहे, असे तर नाही ना? सर्व राज्यांनी याविषयी गांभीर्याने विचार करावा असे माझे आग्रहाचे सांगणे आहे.
मित्रहो,
प्रभावी चाचण्या, शोध, उपचार, सर्वेक्षण आणि सुस्पष्ट नि:संदिग्ध संदेश यावरच आपल्याला आता अधिक भर दिला पाहिजे.
प्रभावी पद्धतीने संदेश देण्याची गरज असण्याचे आणखी एक कारण म्हणजे लक्षणविरहित प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत अफवा पसरू लागतात. 'चाचण्या सदोष तर नाहीत ना?' याविषयी सामान्य माणसाच्या मनात शंका येऊ लागतात. इतकेच नाही तर, अनेक जण 'प्रादुर्भावाचे गांभीर्यच कमी आहे' असे समजण्याची चूकदेखील करू लागतात.
सर्व अभ्यासांतून हेच दिसून येत आहे की, प्रादुर्भावाला आळा घालण्यामध्ये मास्कची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. मास्कची सवय करून घेणे अतिशय कठीण आहे, परंतु त्याला दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनविल्याशिवाय आपल्याला प्रतिबंधाविषयी हवा तसा परिणाम दिसून येणार नाही.
मित्रांनो,
गेल्या काळातील अनुभवांवरून आणखी एक तिसरा मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे, एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे सेवा आणि वस्तू येण्या-जाण्यात अडथळे आल्यामुळे सर्वसामान्य माणसाला विनाकारण होणारा त्रास.
यामुळे जनजीवनावरही परिणाम होतो आणि उपजिविकेवरही.
उदाहरणार्थ, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून गेल्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये तणाव आल्याचे दिसत आहे.
प्राणरक्षक ऑक्सिजनच्या अडथळा-विरहित पुरवठ्यासाठी आपल्याला आवश्यक ती पावले उचललीच पाहिजेत.
भारताने अशा कठीण काळातही पूर्ण जगाला जीवन-रक्षक औषधांचा पुरवठा होत राहील, याची खबरदारी घेतली. असे असताना, आपल्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात औषधे सहज पोहोचतील याची काळजी आपण सर्वांनी मिळूनच घेतली पाहिजे.
मित्रांनो,
संयम, संवेदना, संवाद आणि सहयोग याचे जे दर्शन या कोरोनाच्या काळात देशाने घडविले आहे ते आपल्याला यापुढेही असेच सुरु ठेवायचे आहे.
कोरोना प्रादुर्भावाशी दोन हात करतानाच आता आपल्याला आर्थिक आघाडीवरही पूर्ण शक्तीनिशी पुढे जायचे आहे.
आपले सर्वांचे एकत्रित प्रयत्न निश्चितपणे सफल होतील, अशी इच्छा करतो, आणि याबरोबरच आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद !