भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्यातील प्रयत्नांची रूपरेषा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
अंतराळ संशोधन विभागाने यावेळी गगनयान मोहिमेसह एक सर्वसमावेशक आढावा सादर केला ज्यामध्ये ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकल आणि सिस्टम क्वालिफिकेशन अशा आतापर्यंत विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ह्युमन रेटेड लाँच व्हेईकल (HLVM3) च्या 3 मानवरहित मोहिमांसह सुमारे 20 प्रमुख चाचण्या नियोजित आहेत. क्रू एस्केप सिस्टम चाचणी वाहनाचे पहिले प्रात्यक्षिक उड्डाण 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आजच्या बैठकीत मोहिमेच्या तयारीचे मूल्यांकन करण्यात आले आणि 2025 मध्ये ते प्रक्षेपित केले जाईल याचा पुनरुच्चार करण्यात आला.
चांद्रयान - 3 आणि आदित्य एल1 यांसारख्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या यशस्वी मोहिमांनंतर भारताने आता 2035 पर्यंत 'भारतीय अंतरिक्ष स्टेशन' (भारतीय अंतराळ स्थानक) स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवणे यासह अधिक महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत, असे पंतप्रधान म्हणाले.
हे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंतराळ संशोधन विभाग चंद्रावरील स्थितीच्या अभ्यासासाठी एक आराखडा विकसित करणार आहे. यामध्ये चांद्रयान मोहिमांची मालिका, नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल (NGLV) विकसित करणे, नवीन प्रक्षेपण पॅडचे बांधकाम, मानव-केंद्रित प्रयोगशाळा स्थापन करणे आणि संबंधित तंत्रज्ञान यांचा समावेश असेल.
याशिवाय पंतप्रधानांनी शुक्र ऑर्बिटर मोहिम आणि मंगळ लँडर यांचा समावेश असलेल्या आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने काम करण्याचे आवाहनही भारतीय शास्त्रज्ञांना केले.
पंतप्रधानांनी भारताच्या क्षमतांबद्दल विश्वास व्यक्त केला आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात नवीन उंची गाठण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.