तिन्ही सैन्यदलांचे समन्वयक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात कोविड महामारीचा सामना करण्यात सहकार्याबाबत, सैन्यदलांची तयारी आणि सज्जतेचा पंतप्रधानांनी या बैठकीत आढावा घेतला.
लष्करी दलातून,जे वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले आहेत, किंवा ज्यांनी गेल्या दोन वर्षात स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, अशा सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाच्या आसपास असलेल्या कोविड सुविधा केंद्रात सेवा देण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती रावत यांनी, यावेळी पंतप्रधानांना दिली. त्याआधी निवृत्त झालेल्या इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील, वैद्यकीय आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकावरून वैद्यकीय सल्ला आणि उपचार करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी संगितले.
तिन्ही सैन्यदलांची विविध मुख्यालये, विभागीय मुख्यालये आणि आणि इतर सर्व कार्यालयांमध्ये असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती रुग्णालयांमध्ये करण्यात आली असल्याची माहितीही रावत यांनी पंतप्रधानांना दिली.
डॉक्टरांना सहकार्य करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात परिचारिका/परिचारक कर्मचारी रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे. तसेच, लष्करी दलाच्या विविध संस्थांमध्ये असलेले ऑक्सिजन सिलेंडर्स देखील रुग्णालयांना उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
तसेच, नागरिकांना आवश्यक त्या लष्करी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी, सैन्यदलांचे जवान या सुविधा उभारत आहेत, अशी माहिती देखील रावत यांनी यावेळी दिली.
भारतीय हवाई दलाची विमाने भारतातून आणि परदेशातूनही ऑक्सिजन आणि इतर अत्यावश्यक ती वाहतूक करत असून, या कामाचीही पंतप्रधानांनी माहिती घेतली.
केंद्रीय आणि राज्य सैनिक कल्याण मंडळे तसेच विविध ठिकाणच्या सेवानिवृत्त विभागांचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना देखील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून दुर्गम भागापर्यंत मदत पोचवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचनाही यावेळी पंतप्रधानांनी केली.