नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या महामारीच्या काळात देशवासियांना सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. भारतीय नौदलाने सर्व राज्यांच्या प्रशासनांना, रुग्णालय खाटा,वाहतूक आणि अशा इतर बाबींसंदर्भात सहाय्य देऊ केल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. विविध शहरातली नौदल रुग्णालये जनतेसाठी खुली करण्यात येत असल्याची माहीतीही त्यांनी यावेळी दिली.
नौदलात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटी व्यवस्थापनासाठी देशात विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहे. कोविड विषयक ड्युटीसाठी तैनात करण्यात येणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांना रणभूमी सुश्रुषा सहाय्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर, ऑक्सिजन उपलब्धता वाढवण्यासाठी नौदल करत असलेल्या सहाय्याबाबत नौदल प्रमुखांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
बहारीन, कतार,कुवेत आणि सिंगापूर मधून भारतात ऑक्सिजन कंटेनर आणि इतर सामग्रीची वाहतूक करत असल्याबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.