पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण) (PMAY - G)च्या एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.
छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील मनकुंवारी बाई या आपल्या पतीसोबत शेतकाम करणाऱ्या महिलेने पंतप्रधानांना सांगितले की ती बचत गटांमध्ये सहभागी होऊन डोना पट्टल तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहे आणि त्याचवेळी पीएम-जनमन संबंधित जनमन संगी यांसारख्या योजनांबाबत घरोघरी जाऊन प्रचाराच्या माध्यमातून जनजागृती देखील करत आहे. दीप समूह नावाच्या 12 सदस्यांच्या बचत गटाची ती सदस्य आहे. वन धन केंद्रांमध्ये बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करण्याचा तिचा विचार असल्याची माहिती देखील मनकुंवारी बाईने पंतप्रधानांना दिली.तिने पुढे बोलताना तिला मिळालेल्या लाभांविषयी सांगितले आणि पक्के घर, पाणी, गॅस आणि वीज जोडणी आणि आयुष्मान कार्डचा उल्लेख केला ज्यामधून तिच्या पतीला कानाच्या आजारासाठी आणि मुलीसाठी 30 हजार रुपयांचे उपचार मोफत मिळाल्याची माहिती दिली. वन अधिकार कायदा(FRA), किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान सन्मान निधी या योजनांशी संबंधित लाभ मिळत असल्याचे देखील तिने सांगितले. नळाने मिळणाऱ्या पाण्यामुळे तिचे रक्षण होत आहे आणि त्यामुळे तिचा आणि तिच्या कुटुंबाचा पाण्यातून होणाऱ्या आजारांपासून बचाव होत आहे, गॅस कनेक्शनमुंळे तिचा वेळ वाचत आहे आणि सरपणाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुरापासून तिचे रक्षण होत आहे, अशी माहिती देखील मनकुंवारीने दिली. तिने पंतप्रधानांचे आभार मानले आणि म्हणाली, “ गेल्या 75 वर्षात जे काम हाती घेण्यात आले नव्हते ते आता 25 दिवसात पूर्ण झाले आहे.” पंतप्रधान मोदी यांनी यावेळी खेळांमधील रुचीबाबतही विचारणा केली आणि उपस्थित असलेल्या गर्दीतील तरुण महिला आणि मुलींना हात वर करून दाखवण्यास सांगितले. खेळांमध्ये सहभागी होण्यावर त्यांनी भर दिला आणि सांगितले की अलीकडच्या काळात आदिवासी समुदायाच्या खेऴाडूंनी खेळांमध्ये बहुतेक पदके पटकावली आहेत. मनकुंवारीला विविध योजनांचे लाभ मिळत आहेत आणि त्यामुळे तिचे जीवन सुकर झाले आहे याबाबत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “ तुम्ही केवळ योजनांचे लाभच मिळवले नाहीत तर त्याबद्दल तुमच्या समुदायात जनजागृती देखील केली आहे”, ज्यावेळी लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा सरकारच्या योजनांचा प्रभाव कित्येक पटींनी वाढतो असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक लाभार्थ्याला सामावून घेण्याच्या आणि कोणालाही मागे राहू न देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार करत आपल्या संवादाचा समारोप केला.
मध्य प्रदेशाताली शिवपुरी येथील सहारिया आदिवासी समुदायामधील ललिता आदिवासी ही तीन अपत्यांची माता असलेली महिला आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, पीएम किसान निधी या योजनांची लाभार्थी आहे. तिची मुलगी सहाव्या इयत्तेत आहे आणि तिला लाडली लक्ष्मी योजनेसोबत शिष्यवृत्ती, गणवेश आणि पुस्तके मिळत आहेत. तिचा मुलगा दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे आणि त्यालादेखील शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा मिळत आहेत. तिचा सर्वात लहान मुलगा अंगणवाडीत आहे. शीतला मैया स्वयम सहायता समूह या महिला बचत गटाची ती सदस्य आहे. तिला कस्टम हायरिंग सेंटरकडून पाठबळ दिले जात आहे. पक्क्या घराचा पहिला हप्ता मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचे अभिनंदन केले. आदिवासींच्या समस्यांचा इतक्या संवेदनशीलतेने विचार केल्याबद्दल ललिता यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि जनमन अभियानामुळे आदिवासी लोकांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडून येत आहे आणि उपलब्ध असलेल्या योजनांचे लाभ घेणे त्यांना शक्य होत आहे याची माहिती त्यांना दिली. तिने पंतप्रधानांना सांगितले की तिला जनमन अभियान आणि इतर योजनांची बचत गटांच्या बैठकीत माहिती देण्यात आली आणि म्हणाली की तिला पक्क्या घरासारख्या योजनांचे लाभ मिळू लागले आणि तिच्या सासऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे लाभ मिळाले आहेत. जनमन अभियानादरम्यान 100 अतिरिक्त आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली. तिच्या गावामध्ये उज्ज्वला योजना पूर्णपणे राबवण्यात आली आणि नव्या कुटुंबांना देखील अभियानांतर्गत सामावून घेण्यात आले. आदिवासी आणि ग्रामीण महिलांमध्ये असलेल्या नेतृत्वगुणांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. स्थानिक पंचायत सदस्य विद्या आदिवासी या महिलेने पंतप्रधानांना गावाचा नकाशा आणि विकासाचा आराखडा यांची सविस्तर माहिती गावाच्या मॉडेलच्या मदतीने सांगितली. पीएम जनमन योजनेचा तळागाळापर्यंत परिणाम दिसत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनांचे फायदे पोहोचवण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.
मूळची नाशिकची असलेली भारती नारायण रन ही महाराष्ट्रातील पिंपरी येथील एकलव्य आदर्श निवासी शाळेतील इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी असून तिच्या हिंदी भाषेच्या कौशल्याने तिने पंतप्रधानांना प्रभावित केले. तिच्या शाळेतील सोईसुविधांबद्दल पंतप्रधानांनी चौकशी केली असता तिने शाळेतील मोठे क्रीडांगण, निवासी वसतिगृह आणि स्वच्छ आहाराची माहिती दिली. भारती हिला मोठेपणी सनदी अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा असल्याचे आणि याची प्रेरणा तिला आश्रमशाळेत शिक्षक असलेल्या तिच्या भावाकडून मिळाल्याचे तिने सांगितले. भारतीचा भाऊ, पांडुरंग यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत एकलव्य आदर्श शाळेत शिक्षण घेतले आणि नाशिकमधून पदवी प्राप्त केली. तसेच इतर मुलांना देखील एकलव्य आदर्श शाळेत शिक्षण घेण्यासाठी आपण प्रेरणा देत असून विशेषकरून ज्या विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होण्याची इच्छा आहे, त्यांना आपण याबद्दल सांगत असल्याचे पांडुरंग यांनी सांगितले. आतापर्यंत मिळालेल्या लाभांविषयी बोलताना पांडुरंग यांनी पी एम ए वाय अंतर्गत पक्के घर, शौचालय, मनरेगा अंतर्गत रोजगार, उज्ज्वला गॅस जोडणी, वीज कनेक्शन, नळपाणी पुरवठा, वन नेशन वन रेशन कार्ड आणि आयुष्मान कार्ड यांचा उल्लेख केला. त्याचबरोबर पी एम - जन मन योजनेअंतर्गत 90,000 रुपयांचा पहिल्या हफ्त्याबद्दल देखील त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली जेणेकरून ते देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन देशसेवा करू शकतील.
पंतप्रधानांनी देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भागात या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाप्रती असलेल्या त्यांच्या पालकांच्या वचनबद्धतेसमोर ते नतमस्तक झाले. भारती आपले स्वप्न नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच देशात ठिकठिकाणी एकलव्य शाळांचा विस्तार करण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेचा भाग होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आंध्र प्रदेशातील अलुरीसिथराम राजू जिल्ह्यातील स्वावी गंगा या दोन मुलांची आई आहेत आणि त्यांना जनमन योजने अंतर्गत घर, गॅस कनेक्शन, वीज जोडणी आणि पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. त्यांचा भाग , अराकू व्हॅली हा कॉफीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्या स्वतः कॉफीची लागवड करतात. केंद्र सरकारच्या योजनांमुळे त्यांना त्यांच्या उत्पादनांना उत्तम दर मिळणे शक्य झाले आहे आणि त्यांना पीएम किसान सन्मान निधी लाभांसह शेती, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि विपणनासाठी कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. वन धन योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नात तर वाढ झाली आहेच शिवाय मध्यस्थांपासूनही सुटका मिळाली, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे लखपती दिदी झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि देशभरातील दोन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठी सुरु असलेल्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल सांगितले. स्वावी यांनी गावातील नवीन रस्ते, त्यांच्या गावात आलेले पाणी आणि विद्युत सुविधांबद्दल आनंद व्यक्त केला. अतिशय कडाक्याची थंडी असलेल्या त्यांच्या खोऱ्यात पक्के घर मिळाल्यामुळे जीवनात आमूलाग्र बदल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प नक्कीच साध्य होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला
झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील शशी किरण बिरजिया यांच्या कुटुंबात सात जण आहेत, त्यांनी पंतप्रधानांना बचतगटात सहभागी होण्याबाबत, फोटोकॉपीअर आणि शिलाई मशीन खरेदी करण्याबाबत आणि शेतीच्या कामाबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या योजनांमधून आपल्याला मिळालेल्या लाभांविषयी माहिती देताना त्यांनी नळाद्वारे पेयजल , वीज, पीएम किसान सन्मान निधी आणि त्यांच्या आईला पी एम ए वाय (जी ) अंतर्गत पी एम -जन मन अंतर्गत पक्के घर मिळाल्याचे सांगितले. तसेच किसान क्रेडिट कार्ड मिळाल्याचा आणि त्या वन धन केंद्रांशी निगडित असल्याचा उल्लेख केला.
स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या कर्जाबद्दल पंतप्रधानांनी विचारले असता, शशी यांनी अलीकडेच फोटोकॉपीअर मशीन विकत घेतल्याचे सांगितले, जे त्यांच्या गावामध्ये क्वचितच उपलब्ध असायचे. 12 सदस्यांचा समावेश असलेल्या एकता अजीविका सखी मंडळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्या पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत दोना पट्टल आणि विविध प्रकारचे लोणचे तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याची विक्री वन धन केंद्रांद्वारे केली जाते असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनांचा परिणाम तळागाळातील घटकांपर्यंत होत असल्याचे दिसत आहे, मग ते कौशल्य विकास असो, मूलभूत सोईसुविधा असोत किंवा पशुसंवर्धन अशा सर्व क्षेत्रात होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. पीएम जनमनच्या अंमलबजावणीमुळे या परिणामाचा वेग आणि प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे, असेही ते म्हणाले. "गेल्या 10 वर्षांपासून, आमचे सरकार सर्व सरकारी योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत सोप्या पद्धतीने आणि वेळेत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे". केंद्र सरकारच्या योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील, ही मोदींची हमी आहे." असेही ते म्हणाले. शशी यांनी पी एम -जन मन आणि इतर सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबद्दल गुमला जिल्ह्यातील सर्व रहिवाशांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले.
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल आणि बिहू सणांचा उल्लेख करून देशातील उत्सवी वातावरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. आजचा कार्यक्रम उत्सवी वातावरण अधिक उल्हसित करणारा असून लाभार्थ्यांशी झालेल्या संवादामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पक्की घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी थेट वर्ग होत असून त्याबद्दल या प्रसंगी त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले, “एकीकडे, अयोध्येत दिवाळी साजरी केली जात आहे, तर अत्यंत मागासलेल्या आदिवासी समाजातील 1 लाख लोक देखील दिवाळी साजरी करत आहेत.”
लाभार्थी यंदाची दिवाळी त्यांच्या हक्काच्या घरी साजरी करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा पावन प्रसंग नमूद करून, अशा ऐतिहासिक सोहळ्याचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्याच्या सन्मानार्थ त्यांनी केलेल्या 11 दिवसांच्या उपवास विधीत माता शबरीचे स्मरण होणे स्वाभाविक असल्याचे पंतप्रधान मोदींनी उद्धृत केले.
राजपुत्र राम ते मर्यादा पुरुषोत्तम राम पर्यंतच्या परिवर्तनात माता शबरीची महत्वपूर्ण भूमिका विशद करताना “माता शबरी शिवाय श्री रामाची कथा अधुरी आहे” हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आदिवासी माता शबरीची उष्टी बोरे खाल्ल्यावरच दशरथसुत राम दीनबंधू राम बनू शकल्याचा” उल्लेख त्यांनी केला. रामचरित मानसचा दाखला देत पंतप्रधानांनी भगवान श्रीरामाशी भक्तीचे नाते हे सर्वश्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले. गेल्या 10 वर्षांत गरिबांसाठी 4 कोटी कायमस्वरूपी घरे बांधल्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “त्रेता युगातील राजा रामाची गोष्ट असो किंवा सद्यस्थिती असो, गरीब, वंचित आणि आदिवासींशिवाय कल्याण शक्य नाही.” "कायम दुर्लक्षित राहिलेल्यांपर्यंत मोदी पोहोचले आहेत" अशी पुष्टी त्यांनी जोडली.
आदिवासी समाजातील प्रत्येक सदस्याला सरकारी योजनांद्वारे लाभ मिळवून देणे हे पंतप्रधान-जनमन महाअभियानाचे उद्दिष्ट असल्याचे सांगताना लोकांना स्वप्नवत वाटणाऱ्या पीएम-जनमन महाभियानाने दोन महिन्यात ठोस परिणाम दिल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पीएम-जनमनचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हाच्या आव्हानांची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी आदिवासी समुदायांचे निवासस्थान असलेल्या देशाच्या दुर्गम आणि सीमावर्ती भागात लाभ पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. दूषित पाणी, विजेचा अभाव, गॅस कनेक्शन, रस्ते आणि संपर्काचा अभाव या आव्हानांवर प्रकाश टाकत सध्याच्या सरकारनेच हे महाआव्हान पेलल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या योजनेला जनमन का म्हटले गेले हे स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, "'जन' म्हणजे जनता आणि 'मन' म्हणजे त्यांची 'मन की बात' किंवा त्यांचे अंतर्मन." आदिवासी समुदायांच्या सर्व इच्छा आता पूर्ण होतील कारण सरकार पीएम-जनमन महा अभियानावर 23,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्याची योजना आखत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
जेव्हा समाजात कोणीही मागे राहणार नाही आणि सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचेल तेव्हाच देशाचा विकास होऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील सुमारे 190 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मागासलेले आदिवासी समुदाय राहत असल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी दोन महिन्यांत 80,000 हून अधिक आयुष्मान कार्ड वितरित करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे सरकारने अत्यंत मागासलेल्या आदिवासी समाजातील सुमारे 30,000 शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधीशी जोडले आहे आणि अशा 40,000 लाभार्थ्यांची बँक खाती उघडण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 30,000 पेक्षा जास्त वंचित लोकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत आणि सुमारे 11,000 लोकांना वन हक्क कायद्यांतर्गत जमिनीचे पट्टे देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की ही केवळ काही आठवड्यांची प्रगती आहे आणि दररोज संख्या वाढत आहे. सरकारची प्रत्येक योजना आपल्या सर्वात मागासलेल्या आदिवासी समुदायांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. “मी तुम्हाला याची खात्री देतो आणि ही मोदींची हमी आहे आणि तुम्हाला माहित आहे की मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी,” असा भरवसा त्यांनी दिला.
विशेषत्वाने समस्याप्रवण आदिवासी समूहांना (PVTGs) पक्की घरे देण्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट वर्ग करण्यात येत आहेत. त्यांना एका पक्क्या घरासाठी 2.5 लाख रुपये मिळतील जे वीज, गॅस कनेक्शन, नळाद्वारे पाणी आणि शौचालयासह सन्माननीय जीवन जगण्याचे साधन असेल. हे एक लाख लाभार्थी ही फक्त सुरुवात असून शासन प्रत्येक पात्र उमेदवारापर्यंत पोहोचेल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आणि हे लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणालाही लाच न देण्याचे आवाहन त्यांनी केले.
आदिवासी समुदायांसोबतच्या त्यांच्या प्रदीर्घ सहवासाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान जनमन महाअभियानामधील त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर ते विसंबून आहेत. तसेच, त्यांनी मार्गदर्शनाचे श्रेय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले.
“जर योजना कागदावरच राहिल्या, तर खऱ्या लाभार्थींना अशा कोणत्या योजना अस्तित्वात आहेत हे कधीच कळणार नाही”, असे सांगत पंतप्रधानांनी या योजनांचा लाभ घेण्याच्या आव्हानांकडे लक्ष वेधले.पीएम-जनमन महाअभियान अंतर्गत, अडथळा निर्माण करणारे सर्व नियम सरकारने बदलले आहेत असे सांगत त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उदाहरण दिले. या योजनेने मागास जमातींच्या गावांपर्यंत रस्ते सहज उपलब्ध करून दिले, फिरत्या वैद्यकीय कक्षांशी संबंधित नियमांमध्ये बदल, प्रत्येक आदिवासी घराघरात वीज पोहोचावी यासाठी सौरऊर्जा जोडणी देण्यासह शेकडो नवीन मोबाइल टॉवर्स उभारून जलद इंटरनेट जोडणी सुनिश्चित करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
अन्न सुरक्षेसाठीच्या मोफत रेशन योजनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला या योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वंचित आदिवासी समूहांसाठी लसीकरण, प्रशिक्षण आणि अंगणवाडी यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली पुरवल्या जातील अशी 1000 केंद्रे निर्माण करण्याच्या योजनेचीही त्यांनी माहिती दिली.आदिवासी तरुणांसाठी केल्या जात असलेल्या वसतिगृह निर्मितीचाही त्यांनी उल्लेख केला. नवीन वन धन केंद्रेही सुरू होत आहेत, हे देखील त्यांनी सांगितले.
‘मोदी की गॅरंटी ’ वाहनांसह विकसित भारत संकल्प यात्रा देशातील प्रत्येक गावात पोहोचत असल्याकडे लक्ष वेधत विविध सरकारी योजनांशी लोकांना जोडण्यासाठी हे वाहन पोहोचत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आदिवासी समाजातील घटकांना आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाचा सर्वाधिक फायदा झाला आहे, असे पंतप्रधांनी या कार्यक्रमा संदर्भात बोलताना सांगितले. पंतप्रधांनी वीज जोडणी , एक राष्ट्र एक शिधापत्रिका आणि आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सिकलसेल अॅनिमियाच्या धोक्यांबद्दल बोलत आदिवासी समाजाच्या अनेक पिढ्या या आजाराने ग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. “विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सिकलसेलचीही तपासणी केली जात आहे. गेल्या 2 महिन्यांत 40 लाखांहून अधिक लोकांची सिकलसेल चाचणी करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
सरकारने अनुसूचित जमातींशी संबंधित योजनांच्या तरतुदींमध्ये 5 पटीने वाढ केल्याची माहिती मोदी यांनी दिली.आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी पूर्वी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या एकूण आर्थिक तरतुदीमध्ये आता अडीच पटीने वाढ करण्यात आली आहे.10 वर्षांपूर्वीपर्यंत देशात आदिवासी मुलांसाठी केवळ 90 एकलव्य आदर्श शाळा बांधण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत सध्याच्या सरकारने गेल्या 10 वर्षांत 500 हून अधिक नवीन एकलव्य आदर्श शाळा बांधण्याचे काम सुरू केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.“त्यासाठी आदिवासी भागातील वर्गांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि उच्च शिक्षणाची केंद्रे वाढवली जात आहेत”, असेही ते म्हणाले.
2014 पूर्वी, केवळ 10 वन उत्पादनांसाठी हमीभाव निश्चित करण्यात आला होता, तर सध्याच्या सरकारने सुमारे 90 वन उत्पादनांना हमीभावाच्या कक्षेत आणले आहे, “वन उत्पादनांना अधिक भाव मिळावा म्हणून आम्ही वन धन योजना तयार केली”, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लाखो लाभार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असल्याचे मोदी यांनी सांगितले. “गेल्या 10 वर्षात आदिवासी कुटुंबांना 23 लाख पट्टे देण्यात आले आहेत. आम्ही आदिवासी समाजाच्या हाट बाजारलाही प्रोत्साहन देत आहोत.आपल्या आदिवासी बांधवांना आपला माल देशातील इतर बाजारपेठेत विकता यावा, यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत,” असे त्यांनी सांगितले.
“माझे आदिवासी बंधू आणि भगिनी दुर्गम भागात राहतात पण त्यांच्याकडे विलक्षण दूरदृष्टी आहे. आमचे सरकार आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या सन्मानासाठी कशाप्रकारे काम करत आहे हे आज आदिवासी समाज बघत असून त्यांना हे समजत आहे, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करण्याच्या सरकारच्या घोषणेचा आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या देशभरातील 10 मोठ्या संग्रहालयांच्या विकासाचा त्यांनी उल्लेख केला. आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी आणि त्यांना सोईसुविधा पुरवण्यासाठी निरंतर काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.
पार्श्वभूमी
शेवटच्या टप्प्यावर असलेल्या शेवटच्या माणसाला सशक्त करण्याच्या अंत्योदयाच्या दृष्टीकोनाच्या दिशेने पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने,15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त पीएम -जनमन अभियान हे विशेषत्वाने समस्याप्रवण आदिवासी समूहांच्या (पीव्हीटीजी ) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी सुरू करण्यात आले.
पीएम-जनमन, अंदाजे 24,000 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह 9 मंत्रालयांद्वारे 11 महत्वाच्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते. सुरक्षित घरे, शुद्ध पेयजल आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार संपर्क सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधीं उपलब्ध करून देणे यांसारख्या सुविधा पुरवत पीव्हीटीजी कुटुंबे आणि वस्त्या मूलभूत सुविधांनी परिपूर्ण करून पीव्हीटीजीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे हे उद्दिष्ट आहे.
सरकार की योजनाएं अति पिछड़े जनजातीय भाई-बहन तक पहुंचें, यही पीएम जनमन महाअभियान का उद्देश्य है। pic.twitter.com/D74fKrrFMl
— PMO India (@PMOIndia) January 15, 2024
हमारे देश का विकास तभी हो सकता है जब समाज में कोई छूटे नहीं, हर किसी तक सरकार की योजनाओं का लाभ पहुंचे। pic.twitter.com/ieLPEgIUNR
— PMO India (@PMOIndia) January 15, 2024
आज देश में वो सरकार है जो सबसे पहले गरीबों के बारे में सोचती है। pic.twitter.com/Wv0lnKnEI2
— PMO India (@PMOIndia) January 15, 2024
केंद्र सरकार जो आकांक्षी जिला प्रोग्राम चला रही है उसका सबसे बड़ा लाभ हमारे आदिवासी भाई-बहनों को ही मिला है। pic.twitter.com/P0iYymkqgm
— PMO India (@PMOIndia) January 15, 2024
विकसित भारत संकल्प यात्रा के दौरान भी सिकल सेल की जांच की जा रही है। pic.twitter.com/2OVmfBlDzu
— PMO India (@PMOIndia) January 15, 2024
आज आदिवासी समाज देख और समझ रहा है कि कैसे हमारी सरकार जनजातीय संस्कृति और उनके सम्मान के लिए काम कर रही है: PM @narendramodi pic.twitter.com/oilNc52Fat
— PMO India (@PMOIndia) January 15, 2024