पंतप्रधानांच्या हस्ते 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचे प्रकाशन
“पंडीत मदन मोहन मालवीय यांच्या कार्यावरील परिपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन ही महत्वाची घटना”
महामना यांचे व्यक्तिमत्व म्हणजे आधुनिक विचारसरणी आणि सनातन संस्कृतीचा संगम
आपल्या सरकारच्या कामांमध्ये मालवीयजी यांच्या विचारांचा गंध दरळवतो.
महामना यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे हे आमच्या सरकारचे भाग्य होते "
देशाच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही मालवीयजीच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब उमटले आहे.
सत्ताकेंद्री न राहता सेवाकेंद्री असणे म्हणजेच सुशासन
भारत हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अनेक संस्थांचा निर्माता म्हणून उदयाला येत आहे

महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य ' च्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचं प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पांजली वाहिली. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींमत्वांमध्ये त्यांनी आघाडीचं स्थान प्राप्त केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट विद्वान आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले मदन मोहन मालवीय यांचं जनतेत  राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केलं जाते.

या कार्यक्रमाच्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच सगळ्यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. आजच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जंयंती अर्थात अटल जयंती आणि महामना पंडित मदनमोहन मालवीय यांचीही जयंती असल्यानं, आजचा दिवस म्हणजे भारत आणि भारतीयत्वात विश्वास असलेल्या लोकांसाठी प्रेरणा देणाऱ्या उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महामना पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर नतमस्तक झाले. अटल जयंतीच्या निमित्ताने आज देशभरात सुशासन दिन साजरा केला जात असल्याचं नमूद करत, त्यांनी देशवासीयांना सुशासन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

पंडित मदनमोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याचे  हे खंड देशाची युवा पिढी आणि संशोधकांसाठी महत्वाचे असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. मालवीय यांच्या  संकलित कार्याच्या या प्रकाशनामुळे बनारस हिंदू विश्वविद्यालयाशी संबंधीत अनेक मुद्दे, तसंच महामना यांचा काँग्रेस नेतृत्वाशी झालेला संवाद आणि ब्रिटिश नेतृत्वाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यावर प्रकाश पडू शकेल असं पंतप्रधान म्हणाले. महामना यांच्या दैनंदिनीशी संबंधित असलेले हे खंड, देशभरातील लोकांसाठी समाज, राष्ट्र आणि अध्यात्माच्या पैलूंबाबत मार्गदर्शक ठरू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे संकलित कार्य प्रकाशित  करण्यासाठी  मेहनत घेतलेल्या चमूची पंतप्रधानांनी प्रशंसा केली तसंच या प्रकाशनासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, महामना मालवीय मिशन आणि  राम बहादूर राय यांचं अभिनंदनही केलं.

"महामना यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वं शतकांमध्ये एकदाच जन्माला येतात आणि अनेक भावी पिढ्यांवर त्यांचा प्रभाव दिसून येतो", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंडीत मदन मोहन मालवीय हे ज्ञान आणि क्षमतेच्या बाबतीत आपल्या काळातील महान विद्वान व्यक्तीमत्वांच्या बरोबरीचे होते असं पंतप्रधानांनी अधोरेखीत केलं. महामना यांचं व्यक्तीमत्व म्हणजे आधुनिक विचारसरणी आणि सनातन संस्कृतीचा संगम होता असं ते म्हणाले. मालवीय यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसंच देशाच्या आध्यात्मिक आत्मभान पुनरुज्जीवीत करण्यात एकसमान योगदान दिल्याचंही पंतप्रधानांनी अधोरेखीत केलं. मालवीय यांनी कायमच राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिलं, आणि त्या अनुषंगानंच त्यांचा एक डोळा समकालीन आव्हानांवर आणि दुसरा डोळा भविष्यातील घडामोडींवर असायचा असं पंतप्रधान म्हणाले. महामना यांनी देशासाठी मोठ्या ताकदीनिशी लढा दिला आणि अत्यंत कठीण काळातही भविष्यातील शक्यतांची नवी बीजं पेरली, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. महामना यांनी दिलेलं हे  अगणित योगदान आता आज प्रकाशित झालेल्या ११ खंडांच्या माध्यमातून अधिकृतपणे उलगडलं जाईल असं ते म्हणाले. महामना यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला मिळणं, हे आपल्या नेतृत्वातल्या सरकारचं भाग्य आहे, असं ते म्हणाले. महामना यांच्याप्रमाणेच आपल्यालाही काशीमधल्या  जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. आपण जेव्हा काशीमधून निवडणूक लढवण्यासाठी आलो होतो, तेव्हा आपल्या नावाचा प्रस्ताव हा मालवीय यांच्या कुटुंबियांनीच समोर ठेवला होता या घटनेची प्रधानमंत्र्यांनी यावेळी आठवण करून दिली. महामना यांची काशीवर अपार श्रद्धा होती, आणि त्यांचं श्रद्धास्थान असलेलं हे शहर आता विकासाची नवी उंची गाठत असून, आपल्या गतकाळातल्या वारशाचं वैभव पुन्हा प्रस्थापित करू लागलं असल्याचंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.

 

अमृत काळात भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे वाटचाल करत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “मालवीयजींच्या विचारांचा दरवळ आमच्या सरकारच्या कामातही तुम्हाला कुठेतरी जाणवेल. मालवीयजींनी आम्हाला अशा राष्ट्राची दृष्टी दिली आहे ज्यामुळे राष्ट्राचा प्राचीन आत्मा आधुनिक संरचनेत सुरक्षित आणि संरक्षित आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. मालवीय यांनी भारतीय मूल्यांचा समावेश असलेल्या शिक्षणासाठी केलेल्या शिफारसीची तसेच बनारस हिंदू विद्यापीठ निर्मितीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांनी भारतीय भाषांचा केलेला पुरस्कार या गोष्टींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरी लिपी चलनात आली आणि भारतीय भाषांना मान मिळाला.  आज मालवीयजींचे हे प्रयत्न देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही दिसून येतात”, असे पंतप्रधान म्हणाले.

“कोणत्याही राष्ट्राला सशक्त बनवण्यात तेथील संस्थांनाही तितकेच महत्त्व असते.  मालवीयजींनी आपल्या आयुष्यात अशा अनेक संस्था निर्माण केल्या जिथे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी बनारस हिंदू विद्यापीठ व्यतिरिक्त, हरिद्वारमधील ऋषीकुल ब्रह्मशारम, भारती भवन पुस्तकालय, प्रयागराज, सनातन धर्म महाविद्यालय यांचाही उल्लेख केला.  सहकार मंत्रालय, आयुष मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक चिकित्सा पद्धतीचे जागतिक केंद्र, भरड धान्य  संशोधन संस्था, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी, आपत्ती काळात टिकून राहणाऱ्या लवचिक पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आघाडी , ग्लोबल साउथसाठी दक्षिण, भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर, इन-स्पेस आणि सागरी क्षेत्रातील सागर यासारख्या विद्यमान सरकारच्या अंतर्गत अस्तित्वात आलेल्या संस्थांच्या यादीचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. “भारत आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या अनेक संस्थांचा निर्माता बनत आहे.  या संस्था केवळ 21व्या शतकातील भारतालाच नव्हे तर 21व्या शतकातील जगालाही नवी दिशा देण्याचे काम करतील”, असे पंतप्रधान म्हणाले.

 

महामना आणि अटलजी या दोघांनाही प्रभावित करणाऱ्या विचारसरणींमध्ये साधर्म्य दर्शवत पंतप्रधानांनी अटलजींनी महामना यांच्यासाठी उच्चारलेल्या शब्दांची आठवण काढली आणि पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी मदतीशिवाय काहीतरी करायला निघते तेव्हा महामनाचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य एखाद्या मशालीप्रमाणे त्याचा मार्ग उजळून टाकते." सुशासनावर भर देऊन मालवीय जी, अटलजी यांच्यासह प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.  “सुशासन म्हणजे सत्ताकेंद्रित न राहता सेवाकेंद्रित असणे”, असे सांगुन पंतप्रधान पुढे म्हणाले, “ जेव्हा स्पष्ट हेतूने आणि संवेदनशीलतेने धोरणे आखली  जातात आणि कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याचे पूर्ण अधिकार मिळतात ती स्थिती म्हणजे सुशासन.”  जिथे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी या कचेरीतून त्या कचेरीत धावण्याची गरज पडत नाही असे सुशासनाचे तत्त्व हीच आजच्या सरकारची ओळख बनली आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  सरकार लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचून तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.  पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा उल्लेख केला आणि  सर्व सरकारी योजनांची परिपूर्णता साधणे आहे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले.  ‘मोदी की गारंटी ’ रथाचा प्रभाव अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी केवळ 40 दिवसांत पूर्वी वंचित राहिलेल्यांना कोट्यवधी नवीन आयुष्मान कार्डे वितरित  केल्याची माहिती दिली.

सुशासनामध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या भूमिकेवर भर देत पंतप्रधानांनी कल्याणकारी योजनांवर लाखो कोटी रुपये खर्च करूनही घोटाळामुक्त प्रशासनाचे कार्य विशद केले.  गरिबांसाठी मोफत अन्नधान्य वाटपावर 4 लाख कोटी रुपये, गरिबांसाठी पक्क्या घरांवर 4 लाख कोटी रुपये आणि प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या कामी  3 लाख कोटींहून अधिक खर्च केला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  “एखाद्या प्रामाणिक करदात्याचा प्रत्येक पैसा सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रहितासाठी खर्च केला जाणे हे सुशासन आहे.  सुशासनामुळे 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत”, असेही ते म्हणाले.

 

संवेदनशीलता आणि सुशासनाचे महत्त्व सांगून पंतप्रधान म्हणाले की, आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाने मागासलेपणाच्या अंधारात पिचत असलेल्या 110 जिल्ह्यांचा कायापालट केला आहे .  आता हेच लक्ष महत्त्वाकांक्षी गटांवर केंद्रित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की “जेव्हा विचार आणि दृष्टीकोन बदलतो तेव्हा परिणाम देखील बदलतात”. सीमावर्ती भागाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या व्हायब्रंट व्हिलेज योजनेचा  त्यांनी उल्लेख केला.  नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळात मदतकार्य पुरविण्याच्या सरकारच्या दृढ दृष्टिकोनावरही त्यांनी प्रकाश टाकला आणि कोविड महामारी आणि युक्रेन युद्धादरम्यान केलेल्या मदतीचे उदाहरण दिले.  "शासनातील बदलामुळे आता समाजाच्या विचारसरणीतही बदल होत आहेत", असे ही पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जनता आणि सरकार यांच्यातील वाढलेला विश्वास अधोरेखित केला.  "स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये हा विश्वास देशाच्या वाढलेल्या आत्मविश्‍वासातून दिसून येतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी ऊर्जा बनतो” असेही मोदींनी यावेळी सांगितले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये महामना आणि अटलजींच्या विचारांचा स्पर्श शिरोधार्य मानून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यावर भर दिला.  देशातील प्रत्येक नागरिक निर्धाराने यशाच्या वाटेवर जाण्यासाठी योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, महामना मालवीय अभियानाचे सचिव प्रभुनारायण श्रीवास्तव आणि  पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संपूर्ण वाङ्मयचे मुख्य संपादक रामबहादूर राय उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

राष्ट्रसेवेत अतुलनीय योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अमृत काळामध्ये,  उचित सन्मान  देणे हा पंतप्रधानांचा संकल्प आहे. ‘पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्य ’ चे प्रकाशन हा याच दिशेने केलेला प्रयत्न आहे.

सुमारे 4,000 पृष्ठांचे 11 खंडांमध्ये द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) साहित्य  पंडित मदन मोहन मालवीय यांच्या लेखन आणि भाषणांचा संग्रह आहे, जो देशाच्या कानाकोपऱ्यातून गोळा केलेला आहे. या खंडांमध्ये त्यांची अप्रकाशित पत्रे, लेख आणि भाषणे यांचा समावेश आहे. यात1907 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या 'अभ्युदय' या हिंदी साप्ताहिकाची संपादकीय सामग्री, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, पत्रिका आणि पुस्तिका , 1903 ते 1910 दरम्यान आग्रा आणि अवध या संयुक्त प्रांतांच्या विधान परिषदेत दिलेली सर्व भाषणे, रॉयल कमिशनसमोर दिलेली विधाने, 1910 आणि 1920 दरम्यान इम्पीरियल विधान परिषदेमध्ये विधेयकांच्या सादरीकरणादरम्यान दिलेली भाषणे, बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी आणि नंतर लिहिलेली पत्रे, लेख आणि भाषणे, आणि 1923 ते 1925 दरम्यान त्यांनी लिहिलेली रोजनिशी यांचा समावेश आहे.

पंडित मदन मोहन मालवीय यांनी लिहिलेल्या आणि भाषण केलेल्या दस्तावेजांचे संशोधन आणि संकलित करण्याचे काम, महामना पंडित मदन मोहन मालवीय यांचे आदर्श आणि मूल्ये प्रसारित करण्यासाठी समर्पित असलेल्या महामना मालवीय मिशनने हाती घेतले होते. प्रख्यात पत्रकार राम बहादूर राय यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमअंतर्गत  एका समर्पित चमूने भाषा आणि मजकूर न बदलता पंडित मदन मोहन मालवीय यांच्या मूळ साहित्यावर काम केले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रकाशन विभागाने केले आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
25% of India under forest & tree cover: Government report

Media Coverage

25% of India under forest & tree cover: Government report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi