पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याआधी आज नवी दिल्लीतल्या भारत कृषी संशोधन संस्था येथे पिकांच्या अत्यंत सुपीक, हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या 109 वाणांचे वाटप केले.
पंतप्रधानांनी यावेळी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. या नवीन पिकांच्या वाणांच्या महत्त्वाबाबत चर्चा करताना पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रात मूल्यवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला. ही नवीन वाणे अत्यंत फायदेशीर ठरतील, कारण त्यामुळे आपला शेतीमधील खर्च कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी बाजरीच्या महत्त्वावर चर्चा केली तसेच लोक आता पौष्टिक आहाराकडे कसे वळत आहेत हे अधोरेखित केले. नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रीय शेतीबद्दल सामान्य लोकांचा वाढता विश्वास याबद्दलही त्यांनी सांगितले. लोक सेंद्रीय पदार्थांचे सेवन आणि मागणी करू लागले आहेत असेही ते पुढे म्हणाले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांचे शेतकऱ्यांनी कौतुक केले.
जनजागृतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांनी (KVK) घेतलेल्या भूमिकेचेही शेतकऱ्यांनी कौतुक केले. कृषी विज्ञान केंद्रांनी त्यांच्या लाभांबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी दर महिन्याला विकसित केल्या जाणाऱ्या नवीन वाणांच्या फायद्यांविषयी शेतकऱ्यांना स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
या नवीन पिकांच्या वाणांच्या विकासाबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचीही प्रशंसा केली. वापरात नसलेली पिके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण काम करत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
पंतप्रधानांनी वाटप केलेल्या 61 पिकांच्या 109 वाणांमध्ये 34 शेती पिके आणि 27 फळ बागायती पिकांचा समावेश आहे. शेतातील पिकांमध्ये बाजरी, चारा पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तृणधान्ये आणि इतर फायदेशीर पिकांसह विविध बियाण्यांचे वाटप करण्यात आले. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाजीपाला पिके, लागवड पिके, कंदमुळे, मसाले, फुले आणि औषधी पिकांचे वाटप करण्यात आले.